कुठे शेतकरी कुटुंबाला मारताना, कुठे दंगलीत दंगेखोरांचे पाठीराखे, कुठे आंदोलकांवर हल्ला करणारे, विद्यार्थ्यांना मारहाण करणारे..अशा अनेक घटनांमध्ये दिल्ली-गुजरात आणि उत्तर भारतातील पोलीस आपण पाहतो.. तुलनेत मुंबई-महाराष्ट्राचे पोलिस सभ्य-कर्तव्यदक्ष..! अशा अन्यायकारक घटनांमध्ये त्यांचा थेट-उघड सहभाग दिसणार नाही. मुंबई पोलीस तर अधिक काटेकोर..मुंबई शहाराच्या अत्यंत गुंतागुंत असलेल्या जाळ्यातून गुन्हेगार उचलणारे.. सगळा हिशोब ठेवणारे.. म्हणून जागतिक दर्जाचे मानले जाणारे..पण सुशांतसिंग राजपूत या तरुण अभिनेत्याच्या आत्महत्येचा वेगाने तपास करण्यात मुंबई पोलिस कमी पडले. दरम्यान, चर्चा होत राहिली, अनेक खेळाडू मैदानात उतरत राहीले..प्यार-धोका-पैसा-नाम- काम-इच्छा- कहाणी- संघर्ष- घुसमट- न्याय-अन्याय- सुशांतच्या आत्महत्येला असे सर्व पैलू आहेत, ग्लॅमरच्या दुनियेचा थेट संबंध असल्याने हा विषय फार चघळला जाणार हे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीसांच्या लक्षात यायला हवे होते.. पण तसे झाले नाही, अखेर राजकीय डाव शिजला.. हा डाव शिवसेना आणि बॉलीवूडला जड जाणार आहे.. यासाठी जे नियोजन झाले आहे ते फार विचारपूर्वक झाले आहे.. एका अभिनेत्याच्या किवा एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येची जी साधारण कारणं असतात तीच सुशांतच्या आत्महत्येमागे आहेत.
गुरुदत्तपासून विनोद मेहरा, दिव्या भारती, श्रीदेवीपर्यंत अनेक आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू बॉलीवूडने पाहिले आहेत. तुलनेत सुशांतच्या घटनेत फार गूढ रहस्य असं काही दिसत नाही, त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेताना त्याच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक संबंधाचा शोध घेणे आणि त्यापूर्वीच आठवडाभर झालेल्या त्याच्या माजी तरुण मॅनेजरच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासाचा धागा जोडणे- तपास या दिशेने झाला असता तरी अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या.. मुंबई गुन्हे शाखेने तसा तपास केलाही असेल पण माहिती कुठे आहे..? अशा हाय प्रोफाईल केसमध्ये अधिकृत माहिती वेळोवेळी द्यावी लागते अन्यथा पतंग उडवले जातात, असा विषय नीटपणे, वेगाने क्लायमेक्सपर्यंत आणला नाही तर फाटे फूटतात किवा फोडले जातात, झालेही तसेच.. समाजमाध्यमवर आणि टिव्हीवर चर्चा घडत राहिल्या.. अनेक अब्बास-मस्तान निर्माण झाले. सगळ्यांची मेहरबानी घेतलेल्या पण तरीही परिवारवाद म्हणून सगळ्यांवर आरोप करणा-या कंगनाच्या मुलाखतीने विषयाला सुरुवात झाली. टिव्हीचे ठरलेले पत्रकार, बॉलीवुडचे पडेल बिहारी कलाकार आणि महाराष्ट्र तसेच बिहारचे भाजपचे राजकीय कलाकार जिथे तिथे वापरुन वातावरण निर्मिती झाली.. केंद्र सरकारचीच इच्छा असल्याने अपेक्षेप्रमाणे प्रकरण तपासासाठी सीबीआयला सोपवलं गेलं.. तीच सीबीआय, जी धड आरुषी मर्डर केसचा उलघडा करु शकली नाही, ना दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणात चांगला तपास करु शकली.. कित्येक खटल्याच्या तपासात हास्यास्पद ठरलेल्या सीबीआयने अनेक प्रकरणं बंद केली. तरीही सुशांतला कथित न्याय द्यायला सीबीआय का निवडली गेली..? काय साधायचे आहे सगळी गुंतागुंत निर्माण करुन..? याचे उत्तर थेटपणे कुणीही सांगू शकेल.. हा जो राजकीय डाव शिजलाय त्याचे लेखक आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा..! विरोध करणा-यांच्या ख-या-खोट्या फाईल निर्माण करुन त्यांना बांधून ठेवण्याची त्यांची गुजराती स्टाईल आता सर्वश्रुत झाली आहे.. सुशांत मृत्यू प्रकरणातून त्यांना चार गोष्टी साधायच्या आहेत.. बिहारच्या निवडणुकीत मूळ मुद्यापासून जनतेचे लक्ष दूर करणे, त्यामुळे बिहारच्या नितीश कुमार-भाजप युतीच्या कारभाराचे मुल्यमापन होणार नाही, दुसरे सुशांतसिंग ज्या समाजाचा आहे, त्या बिहारमध्ये प्रभावशाली असलेली राजपूत मते मिळवणे, तिसरे या प्रकरणातून थेट मातोश्रीला वेसण घालण्याची संधी निर्माण करणे, त्यामुळेच बॉलीवूडमध्ये रमणा-या आदित्य ठाकरेंबाबत जाणिवपूर्वक संशय निर्माण केला गेला आहे आणि चौथा फ़ायदा- बॉलिवूडच्या मोठ्या आवाक्यात न येणा-या कलाकार आणि निर्मिती संस्थाना दाबण्याची संधी घेणे.. एरवी बॉलीवूडमध्ये सरकारच्या विरोधात भूमिका घेणा-यांची संख्या अधिक आहे, मोठ्या निर्मिती संस्था मोदीच नव्हे तर कोणत्याही सरकारशी फटकून राहतात, त्यांना हुकुमतीखाली आणता येईल.. तसे झाले की निवडणुकीत प्रचाराला आणि इतर वेळी सरकारची वाहवाही करण्याच्या कामात वापरता येतील.. नाही म्हणणा-यांचे काय होते याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी… झारखंडच्या निवडणुकीत त्याने एका बाजुने उतरण्यास नकार दिला.. त्यानंतर त्याचा वाईटकाळ सुरु झाला आहे..
बॉलीवूडवर परिवारवादाचा आरोप झाला की मग कुणालाही पकडणे सोपे होते. फिल्मी जगतातील वाचणारे-चित्र मध्यमावर हुकुमत असलेले बहुतेकजण मानवतावादी भूमिका घेणारे लोक आहेत, मोदी सरकार विरोधात पहिल्याच वर्षी ‘पुरस्कार वापसी’ मोहिमेच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका घेऊन उभ्या राहिलेल्या कलाकारांचा मोदी-शहांना हिशोब चुकता करायचा होताच, बदला घेण्याची त्यांची प्रवृत्ती आणि पद्धत आता सगळ्यांना कळून चुकली आहे. सुशांतसिंगच्या मृत्यूच्या मध्यमातून असा अनेकांचा बदला घेण्याची त्यांना संधी दिसली आहे.. सरकारी चौकशी यंत्रणेला हाताशी धरलं की कुणाविषयीही संशय निर्माण करता येऊ शकतो. कुणीही चौकशीच्या फ़े-यात येईल अशी माहिती पसरवता येऊ शकते.. यासाठी पाळलेले माध्यमकर्मी आणि त्यांची ‘सूत्रं’ आहेतच.. सीबीआय चौकशीमध्ये निर्माण केलेल्या एसआयटी मध्ये तीनपैकी दोन प्रमुख हे गुजरात केडरचे आयपीएस आहेत. तसेच याच पथकाने विजय माल्ल्या प्रकरण आणि उत्तर प्रदेश खाण घोटाळ्याची चौकशी केली होती. खाण घोटाळ्याचे तार उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापर्यंत जातील अशी जोरदार चर्चा उडवून दिली गेली होती.. काय झाले नंतर..? अखिलेश यादव सापडले का..? त्यांना अटक झाली का..? माल्ल्याचे काय झाले..? आला का तो भारतात..? या एकूण तपासातून दोघांच्या फाईल्स बनल्या असतील.. त्यांना हवे तसे दाबता येईल किवा विरोध करणा-यांविरोधात वापरता येईल.. उत्तरप्रदेश जळतोय तरी अखिलेश यादव गप्प आहेत, बेहिशोबी मालमत्तेचा आरोप असलेल्या मायावती थेट भाजपच्या प्रवक्त्या वाटू लागल्या आहेत, न मागता मोदींना समर्थन देत आहेत. तसंच महाराष्ट्रात सिंचन घोटाळ्याच्या फाईल्सचे काय झाले..? झाली का अजित पवार आणि इतर नेत्यांवर कधी कारवाई..? गेली सहा वर्षे या प्रकरणात तसा धाक आणि कारवाईची शक्यता वारंवार निर्माण केली गेली, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला हवं तिथे वापरुन घेतल्याचे स्पष्टपणे दिसलं. अजित पवार यांनी भाजपला साथ करत त्या फाईल्सची तीव्रता कमी केली, म्हणजे भाजप बरोबर जाण्याची त्यांचीही मजबुरीच…जी काही सूट मिळाली आहे ती शरद पवार यांच्यामुळे.. पण हातातली सत्ता गेल्याची वेदना भाजपला आहेच.. तेव्हा महाराष्ट्रात मोठं संख्याबळ असूनही गेलेली सत्ता परत मिळवण्याची सुशांतसिंग प्रकरण सुरुवात असू शकते..
अशाप्रकारे प्रत्येक प्रकरणाचा वापर करुन एक एक करत सगळा विरोध मोडून काढला जातो आहे.. फार नाही, सत्ता हवी आहे..शांत बसला की वाचला, बोलला की मेला.. हे सूत्र…! त्यानुसार एका अभिनेत्याच्या मरणाचे राजकारण करुन हा शिजलेला डाव अनेकांना शांत करणार आहे आणि उद्ध्वस्तही..!
-रफ़ीक मुल्ला, मुंबई
लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत.
मोबाईल: 9920907744
ईमेल: rafiquejournalist@gmail.com