# परिवर्तनाचा आश्वासक वाटसरू: कुलगुरु डॉ.प्रमोद येवले.

जगातील एकमेव अटळ व निश्चित घडणारी अशी गोष्ट आहे, ती म्हणजे परिवर्तन. प्रत्येक व्यक्ती, संस्थेच्या वाटचालीत बदल घडत असतो. अनेकजण आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या संस्थेच्या इतिहासाच्या पानावर नोंदवित असतात. साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रगतीत अनेक जणांनी आपला वाटा उचललेला आहे. पहिले कुलगुरु डॉ.एस.आर. डोंगरकेरी ते विद्यमान कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचा यात समावेश आहे. बाबासाहेबांच्या नावाने आपले विद्यापीठ जगभर ओळखले जात आहे. वर्षभरापूर्वी (१६ जुलै २०१९ रोजी) दीक्षाभूमीला वंदन करुन कुलगुरुपदाची सूत्रे डॉ.प्रमोद येवले यांनी घेतली. असंख्य प्रश्न समोर असतांना एक खंबीर व दमदार सुरुवात त्यांनी केली. परमपूज्य बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर असून याच औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना तर नागपूरात त्यांनी धम्म दीक्षा घेतली. ‘शिक्षा भूमी ते दीक्षा भूमी‘ असा हा कुलगुरू यांचा परिवर्तनाचा प्रवास आहे. कुलगुरुपदाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा लेखाजोखा…

विदर्भाचे असल्यामुळे तिथले अन मराठवाड्याचे बरेचशे प्रश्न सारखे असल्याची जाणीव त्यांना आहे. दुष्काळ, बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न दोन्ही ठिकाणी अजूनही कायम आहेत. याची जाणीव ठेऊन पुढच्या पाच वर्षाचा ‘रोडमॅप‘ सरांनी तयार केला आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत ‘डॅमेज कंट्रोल‘ व ‘रिपेरिंग‘चे आव्हान आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. बरोबर एक महिन्यानंतर स्वातंत्र्यदिनी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत महत्वपूर्ण ठरले. आपण केवळ झेंडावंदनाची जागा बदलतोय असे नव्हे तर प्रशासन बदलते आहे, याचे हे संकेत आहेत, अशी भूमिका कुलगुरु यांनी मांडली. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेली बैठक महत्वपूर्ण ठरली. अधिका-यांनी कुलगुरु यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.

विद्यापीठाची अधिसभा , विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही सर्व सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला उत्तम काम करण्यासाठी सहकार्य केले. यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पदव्यूत्तरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यास व्यवस्थापन परिषदेतील सर्व सदस्यांनी एकमुखी मान्यता दिली. गेल्या सहा महिन्यात कुलगुरु यांनी विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. विद्यार्थी केंद्रीत कारभार व बाह्यशक्तीचा हस्तक्षेप कमी झाला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचा-यांत प्रचंड क्षमता आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात ‘प्रशासनाचा ढाचा‘ पूर्णत: ढासळल्याने विकास होऊ शकला नाही. गेल्या काही वर्षात विद्यापीठाची प्रतिमा व नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न कुलगुरु यांनी सुरु केला आहे. विस्कळीत झालेलं व विस्कटलेलं प्रशासन एकत्रित आणण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. वर्षानुवर्षे इथे ‘प्रभारीराज‘ सुरु होतं ते त्यांनी संपवलं . कुलसचिव, परीक्षा मंडळ संचालक, चार अधिष्ठाता, उपपरिसर संचालक अशा महत्वाच्या व संवैधानिक अधिकारी पदांवर पूर्णवेळ नियुक्त्या करण्यात आल्या. ही सर्व पदे भरण्यात आल्याने कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी तीन गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. यामध्ये अध्ययन-अध्यापन पध्दती , गुणवत्तापूर्ण व दर्जेदार संशोधन आणि पारदर्शक व गतिमान प्रशासन काळानुरुप अध्ययन-अध्यापन बदलणे गरजेचे असून अत्यंत बोजड असलेले अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहेत. अध्यापन प्रक्रिया अधिक ‘इंटरअ‍ॅक्टीव्ह‘ करण्यात येईल. जागतिकीकरणानंतर बदलाला सामोरे जाण्यास सक्षम असा हा अभ्यासक्रम असेल. तसेच मुलभूत व उपयोजित संशोधनासोबत समाजोपयोगी करण्याचाही प्रयत्न आहे. गतिमानता वाढवावी लागणार आहे. प्रचंड ऊर्जा व काम करण्याची क्षमता असलेल्या इथल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचा-यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करुन मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या विद्यापीठात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. येथील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचा-यांत प्रचंड गुणवत्ता व ऊर्जा असून त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन देण्याची गरज आहे, हे ते वारंवार सांगत आहेत. गेल्या वर्षभरात दीक्षांत समारंभ, वर्धापन दिन व युवक महोत्सवाचे नेटके आयोजन करुन एक ‘प्रोफेशनल टच‘ मिळवून दिला आहे.

यापुढील काळात ‘कोविड पूर्वी’चे जग आणि नंतरचे जग अशी विभागणी अटळ आहे. त्यामुळे आगामी काळ खडतर राहणार असला तरी योग्य ती दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करीत आहेत. आगामी काळात कोरोना (covid-19) नंतरचे शिक्षण खूप बदलणार असून यासाठी विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येईल. त्यांच्या नियमित बैठका घेण्यात येतील व महत्वपूर्ण विषय मार्गी लावण्यात येतील. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कशा पद्धतीने अध्यापन, प्रात्यक्षिके, संशोधन, परीक्षा व मूल्यांकन करावयाचे याबद्दलचा निर्णय या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन उच्च शिक्षण विभाग या सर्वांशी समन्वय ठेवून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाब लक्षात घेऊनच ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

वर्षभराचा लेखाजोखा:
डॉ. प्रमोद येवले यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, घेतेलेले निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.

-गेल्या पाच वर्षापासून रिक्त असलेले कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, उपपरिसर सरसंचालक, अधिष्‍ठाता यासह सात संविधानिक अधिकाऱ्यांची पूर्णवेळ पदे भरण्यात आली.
-प्रशासनात गतिमानता, कार्यक्षमता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब व्हावा यासाठी ‘फाईल ट्रॅकिंग सिस्टीम’ पहिल्याच महिन्यात राबविण्यात आली.
-अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची निश्‍चिती करून मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले.
-‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये देशात ८५ व्या स्थानावरून ६९ व्या स्थानावर आलो आहोत, आगामी वर्षात देशात ‘टॉप ५०’ मध्ये येण्याचा संकल्प व नियोजन करण्यात आले आहे.
-सर्व महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट व पीएचडी संशोधन केंद्र याची आढावा घेऊन नियमावली निश्चित करण्यात आली.
-गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय स्थापन परिषदेने एकमुखी घेतला.
-रिक्त जागा भरण्यास परवानगी नसल्यामुळे अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर दीडशेहून अधिक कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली.
-संलग्न महाविद्यालयाने स्वायत्तता (Autonomy) घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकांमध्ये संस्थाचालक व प्राचार्य यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
-अनेक महिन्यांपासून रखडलेला दीक्षांत समारंभ पदभार घेतल्यापासून दोन महिन्याच्या आत घेतला. वर्षभरात दोन शांत समारंभ घेण्यात आले.
-वर्धापनदिन जीवनगौरव पुरस्कारासाठी पहिल्यांदाच नियमावली ठरविण्यात आली.
-पदव्यूत्तर विभागातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील सुपर साडेसहाशे प्राध्यापकांचे ‘करिअर ॲडव्हान्स स्किम’ कॅस करण्यात आले.
-विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे तैलचित्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निविदा मंजूर करण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात आहे.
-सर्वात महत्वाचे म्हणजे औरंगाबाद परिसर उस्मानाबाद व परिसर या दोन्ही ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आलेल्या आहेत. जवळपास तीन कोटींचा निधी जिल्हा प्रशासन व उद्योजकांनी सीएसआर फंडातून यासाठी उपलब्ध करून दिला. औरंगाबादची लॅब सुरू झाली असून उस्मानाबादचे काम अंतिम टप्प्यात आहे.
-उस्मानाबाद उपपरिसरच्या लॅबसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला व नियमितपणे त्या कामाचा पाठपुरावा करीत आहेत.
-विद्यापीठातील अधिसभा, विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद परीक्षा मंडळ आदी अधिकार मंडळाच्या सर्व सदस्यांचे सकारात्मक सहकार्य वर्षभरात लाभले. शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी व व समाजाचे जबाबदार घटकांचे मोठे सहकार्य या काळात मिळत आहे. प्रसार माध्यमांची भूमिका खूप सकारात्मक राहिली. कोरोनानंतरची बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन पुढच्या काळात नियोजन करण्याचा संकल्प आहे.
-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्यासाठी व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक उंचावण्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, असेही कुलगुरू म्हणाले.

विद्यापीठाच्या प्रगतीचा मार्ग अत्यंत खडतर अर्थात ‘रोलर कोस्टर राईड‘ प्रमाणे चढ-उताराचा आणि खाच-खळग्याचा आहे. विद्यापीठाने गमावलेला समाजाचा विश्वास पुन्हा मिळवायचा आहे, प्रतिमा सुधरावयाची आहे. विद्यार्थ्यांना योग्य ती दिशा द्यायची आहे. हे सर्व बदलण्याची संधी नियतीने कुलगुरू यांच्यावर टाकली आहे, हे आव्हान मोठ्या आनंदाने त्यांनी स्वीकारले आहे. समाजाच्या भल्यासाठी चांगलं काम करणा-यांच्या मागे लोक उभे राहत असतात, याचा प्रत्यय येतो आहे. विद्यापीठाच्या कारभाराबद्दल लोक आता चांगलं बोलू लागले आहेत. औरंगाबादेतील सर्व प्रसारमाध्यमांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. वर्तमानपत्रे, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका विद्यापीठाच्या प्रगतीसाठी गरजेची आहे. एका अर्थाने ही बदलाची सुरुवात अर्थात ‘परिवर्तनाची नांदी’ आहे. पहिल्याच वर्षात ठरविलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी कुलगुरु यांना मनःपूर्वक शुभेच्छा..

-संजय शिंदे
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.
संपर्क क्रमांक: ९४०४०२४०४०
ई मेल: pro@bamu.ac.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *