# हा निराशेचा ठाव गळून पडो.. -श्रीकांत देशमुख.

नांदेड:  मानवी समाजाचा इतिहास हा अत्यंत चढ-उताराचा, ताण-तणावाचा, जय-पराजयाचा, हिंसा-अहिंसेचा राहिला आहे. असंख्य संकटांच्या मालिकातून माणूस आजवर सावरत आला आहे. सगळी दु:खे आजच आलेली आहेत असे नाही. यापूर्वीही अनेक साथीचे रोग माणसांनी झेलली आहेत. जिवाच्या भितीने गावेच्या-गावे ओस पडून माणसांनी कधी काळी माळराने जवळ करीत तिथे आश्रय घेतला. हा निराशेचा ठाव आजच आहे, असे अजिबात नाही. पूर्वीही लोकांच्या मनाने निराशा जवळ केली असेलच मात्र त्यावर मात करण्यासाठी आशेची किरणे जरुर जपून ठेवली असतील ! हा निराशेचा ठाव गळून पडो, या शब्दात साहित्य आकादमी पुरस्कार सन्मानित साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी कोरोनाच्या या भयप्रद वातावरणातून सावरण्याला बळ दिले. जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या अभियानासाठी त्यांनी आपली भूमिका ठेवली.

आजचा भवताल कोरोनामुळे एका नैराश्येच्या तावडीत सापडला आहे. कोरोना सारख्या आजारांनी गरीब-श्रीमंताची दरी केंव्हाच गळून पडली आहे. जिथे निष्काळजी झाली तिथे हा आजार शहराच्या, गावांच्या सिमा ओलांडून दुर्गम भागातही पोहचला आहे. अनेक लोकांचे आर्थिक चक्र बिघडून गेले आहे. मुलांच्या शाळा ऑनलाईन झाल्याने त्यांचेही वेळापत्रक आणि मानसिकता प्रचंड आव्हानात्मक स्थितीतून जात असेल यात शंका नाही. या आजाराने सुरक्षित अंतराची अट घातल्याने आजवर समूह शक्तीने राहणाऱ्या माणसासाठी मोठी अडचण झाली आहे. बोलायलाच कोणी नसल्यामुळे ऐकणे थांबले आहे. संवाद हा ठराविक व्यक्तीपुरता मर्यादित होत जाणे हे तसे मुक्त वातावरणात वावरणाऱ्या भारता सारख्या देशातील लोकांना नैराश्याच्या समीप नेऊन ठेवल्यासारखेच आहे.

कितीही आव्हाने आली तरी आजवर प्रत्येक पिढ्यातील लोकांनी मार्ग हा काढलाच आहे. मग यात प्लेग असो अथवा देवीची साथ. काखेत गाठ आली की, त्याचा जगायचा प्रश्नच नव्हता. त्याकाळी आजच्या एवढ्या ना प्रगत तपासण्या होत्या ना प्रगत इलाज होते. असंख्यांनी आपले गनगोत आपल्या डोळ्यासमोर गमावले. परंतु यातूनही माणसे सावरलीच. कालांतराने विज्ञानाच्या प्रगतीमुळे यावर तत्काळ लस विकसीत झाली. यातूनच मानवी समाजाला प्लेगच्या गंभीर आजारातून मुक्ती मिळाली. कोरोना आजही याच वळणावर आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून लस विकसित झाली. टप्प्या-टप्प्याने तिचे डोस सर्वत्र उपलब्ध होतील. यातूनही मानवी समाज सावरेल यात शंका नाही. भवताल कितीही आव्हानात्मक असू द्यात, पण वेळेवर उपचार घ्या. विलगीकरणात स्वत:ला ठेवा. हा आजारही लवकर संपेल यात शंका नाही, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी कोरोनाग्रस्तांना दिलासा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *