चित्रकला शिक्षक हाडाचे कलावंत
पुंडलिक नागनाथ सोनकांबळे उर्फ सोनकांबळे गुरूजी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सेवा काळातील अंबाजोगाईतील योगेश्वरी शाळेतील असंख्य आठवणी आहेत. त्यांच्या मते, चित्रकारांचाच नव्हे तर कलाकारांचाच जाॅब हा Thankless job आहे. लोक तेवढ्यापुरती स्तुती करतात.. अशा काही अनुभवांनी ते अस्वस्थ होत असत. अशा या मनस्वी कलावंत असलेल्या सोनकांबळे गुरूजी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांचे विद्यार्थी सुरेंद्र कुलकर्णी यांनी…
त्यांच्याबद्दल खूप औत्सुक्य होते..भीतीही तेवढीच वाटायची.रागावतांना ते पुन्हा पुन्हा ‘दलिंदर’ ह्या शब्दाची गोळी झाडायचे तेव्हा हसू यायचे पण ते हसू दाबावे लागे..!कारण दुसऱ्याला ‘दलिंदर’ म्हणलेले ऐकून हसणाऱ्यालाही ‘तुला हसायला काय झालं, बे दलिंदर’असे म्हणण्याची शक्यता.अशा दोन-चार गोळ्या झाडून झाल्या की मग वर्गाला विश्वासात घ्यायचे व काही रहस्य सांगितल्यासारखे करायचे.ते म्हणायचे की, जो मुलगा हसतो त्याचे खांदे उडतात आणि लगेच कळते की तो हसत आहे.अशी ती रहस्ये!खूप टेन्शन असायचे त्यांच्या तासाचे.पण त्यांनी खडू हातात घेतला की फळा त्यांचा राग घालवण्यासाठी शांत उभा राहायचा. पाहता पाहता सुरेख रेषा आकार घ्यायच्या… त्यांनी काढलेल्या रेषा व आकार एवढे सुरेख असायचे की, आम्हाला हरखून जायला व्हायचे .आमच्या कागद फाटेपर्यंत खोडून काढलेल्या चित्रातील व सरांच्या बोर्डावरील चित्रातील तफावत एवढी असायची की, की त्यांचा तो ‘टिपिकल’ राग कसा योग्य आहे, हे पटायचे…!
“तुम्ही काय करा-..”की लगेच कागदाची दोन्हीही हातांनी महिरप साकारून काढण्याचे चित्र डोळ्यांसमोर आणण्याची सुरुवात करायचे. आपण काढलेले चित्र कसे दिसू शकेल हे कळावे, यासाठी सोनकांबळे सर ती अगदी ठेवणीतील आणि अचूक पहिल्या पायरीने सुरुवात करायचे.हे बोलत असताना समोरच्या विद्यार्थ्याने आगळीक केली की खडू तोडून त्याच्या कडे भिरकावलाच म्हणून समजा!बोलता बोलता मध्येच कशाबद्दल तरी नाराजी व्यक्त करायचे.आणि स्वतः न हसता राग व्यक्त करताना काहीही शब्द वापरायचे-त्यामुळे आणखी गंमत वाटायची.त्यांचा तास संपल्यावर अर्थातच बोलायला,हसायला खूप विषय मिळायचे…!’चूप बे दलिंदर’ हे त्यांचे खास वाक्य.. तास संपला की ज्याला ते वाक्य झेलावे लागले आहे त्याची ‘दलिंदर’ या शब्दावरून इतरांकडून टवाळी व्हायची. दुसऱ्या आठवड्यात ‘दलिंदर’ हा दगड कुणा तिसऱ्यालाच बसायचा. डोक्यात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात त्या विद्यार्थ्यांच्याच कंपास, वह्या आदळायच्या! नाही- नाही ती विशेषणे मिळायची, एखाद्याची ‘विचित्र’कला पाहून तर त्याच्या चित्राचा बोळाही व्हायचा क्वचित!
मला, सदानंदला आणि आमच्या मोठ्या भावाला ते ‘जोश्या’ म्हणायचे. बरं, त्यांना सांगायला जावे की, ‘जोशी नाही सर, मी कुलकर्णी’ तर चिडून सर अपमान करण्याची भीती.पण कसेबसे धैर्य गोळा करून सांगितलेच की “सर,मी कुलकर्णी…”
एखादे बटन दाबल्यावर तरी बल्ब तरी उशीर लागेल पण लगेच म्हणायचे
“तेच रे ते,जोशी काय न् कुलकर्णी काय…!” आता काय बोलणार?बसायचे आशा लावून की इथून पुढे तरी सोनकांबळे सर ‘कुलकर्णी’ म्हणतील अशी! कारण जिथे एक वाक्य बोलण्याची भीती तिथे दोन -तीन वाक्याच्या युक्तिवादाला संधीच नसायची. ‘जोशी काय न् कुलकर्णी काय’, हे सहन करायला लावणारे सोनकांबळे सर,समोर तपासायला चित्र सुंदर आल्यास मात्र मान वर करून हे कुलकर्णीचे की जोशीचे की आणखी कुणाचे, हे न पाहता ‘छान’,’सुंदर’ असा अभिप्राय अप्रतिम अशा हस्ताक्षरात द्यायचे.पण कळायचे नाही सर नेमके कशावर एवढे उखडून असतात.मला उमजलेले कारण हे की,चित्रकारांचाच नव्हे तर कलाकारांचा जॉब हा thankless job आहे,काम झाले की संपले ,तेवढ्यापुरते लोक ‘वा वा’ म्हणतात,आपली पाठ फिरली की आपण चित्रकलेचा भाव कसा केला,सोनकांबळे सरांकडून अमुक चित्र कसे काढून घेतले असे चारचौघांत सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतात,असे काहीसे आलेले अनुभव सोनकांबळे सरांना अस्वस्थ करत असावेत.विद्यार्थ्यांना ‘एवढे जीव तोडून सांगतो आहोत की, ‘असे काढा, तसे काढा’ आणि ही पोरे काय काढतात तर ‘हे असले काहीतरी’! हे एक त्यांच्या अस्वस्थतेचे आणखी एक कारण! आजूबाजूच्या गोष्टी पाहून इतरांना आपल्याइतका राग का येत नसावा,ह्याचा त्यांना पुन्हा एक स्वतंत्र राग यायचा! सोनकांबळे सरांना राग येण्याचे अशी तीन चार कारणे!यांच्या उद्वेग व रागाला वैतागून काही विद्यार्थी-पोट्टे त्यांना ‘सोन्या सर’ म्हणायचे! पण हा राग,त्रागा,नापसंती व चडफड हे सगळं जेव्हा रंगारंगांत मिसळून सोन्यासारखे कागदावर उतरायचे,तेव्हा त्यांच्या रागाबद्दल आदर वाटायचा. कारण त्या रंगांमुळे कागदाच्या शुभ्रपणाचे चीज व्हायचे !त्यांनी एकदा ‘सोनाली’ हे नाव होमवर्क म्हणून काढायला सांगितले होते.त्या नावाला मला ‘सुंदर’ असा शेरा मिळाला…मी तो शेरा घेऊन खूष होऊन बेंचवर बसण्यासाठी परत आलो व मित्र लालबहादूरला हळूच म्हणालो, ‘आज राग -रंग बरा आहे!अशी ही सोनकांबळे सरांनी निर्माण केलेली भीती! गणपती काढताना त्याच्या सुंदर रुपात जानवे काढताना मात्र सरांनी पाहिलेले सगळे ‘जोशी, कुलकर्णी’ हे सारे गणपतीच्या पोटावर ओघळायचे! इतका जीव ओतायचे चित्राच्या एकेका वळणांत व सूक्ष्म बाबींत की बस्स्! गोविंद काळेला त्याच्या भाषणासाठी काढून दिलेले एस् एल् व्ही सॅटेलाईटचे चित्र,शाळेच्या प्रवेशद्वारावर काढलेले योगेश्वरी नूतन विद्यालय, प्राथमिक विभाग ही अक्षरे, तसेच त्यांनी काढलेली ‘रिगल लॉज’ ही अक्षरे आठवतातच आठवतात.त्यांनी काढलेले प्राथमिकचे ‘प्रा’ फार भुरळ घालणारे असायचे!लांब खालपर्यंत आलेली ‘प’ची हॉकी स्टिक मूळ उभ्या रेषेकडे वळलेली आणि हे दोन्ही जिथे जुळतात तिथून ‘प’ च्या पोटातली ती तिरपी रेष!’Regal’ हे नाव लिहताना तांबड्या- पिवळ्या सूर्याच्या बॅक्ग्राऊंडवर कॅपिटल ‘R’ काढलेले असायचे आणि सोबत झाडाची फांदी! हा contrast मनाला खिळवून ठेवायचा. सॅटेलाईट काढताना निमुळते होत गेलेल्या त्याच्या दंडगोलाकार भागांवर सरांनी एक फिकट गुलाबी रंगाचा पट्टा वरपासून खालपर्यंत असा ओढला होता की,ते सॅटेलाईट एकदम त्रिमितीयच झाले होते! वाटले ,येस! गोलाकार वस्तूवर एकाच बाजूने प्रकाश पडतो तेव्हा अशीच शेड दिसते! खालची नावे तर किती सुंदर! मला ‘दारूबंदी’ च्या चित्रासाठी मिळालेले बक्षीस पाहून त्यांचा पहिला प्रश्न- तुला एलिमेंट्रिला ‘सी’ ग्रेडसुद्धा न मिळताही तुझ्या चित्राचा नंबर कसा आला? हा प्रश्न भर मैदानावर त्यांनी विचारला ! मग मी सरळ सांगितले-सर, दादा(डॉ प्रा संतोष कुलकर्णी)ने मदत केली होती…सर म्हणाले, मला वाटलेच तरी, हा ‘पाप्या’चा हात आहे..बरं जाऊ दे,झालं ते झालं, इथून पुढे तरी त्याच्याकडून ड्रॉईंग शिक, नुसतं आपलं लेटरिंग घोटत बसतो…!सरांचा दराराच एवढा की, मला दादाने मदत केली हे सांगावेच लागले..!बोलत बोलत त्यांनी समाधानाने मला एक जोरात चिमटा घेतला. हे समाधान माझ्या प्रामाणिकपणामुळे होते की शाळेचे नाव त्या चित्रामुळे आंतरशालेय स्पर्धेत झाले याचे मला कळले नाही. सोनकांबळे सरांकडे त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.ते घेतांना मी मनात म्हटले ‘सर,जोशी काय नी कुलकर्णी काय म्हणता ना,मग मी काढलेल्या चित्रात दादाने रंग भरले तर काय झाले?’ हे मी मनात म्हणले, बोलून दाखवले असते तर चिमटा घेतलेला माझा गाल रंगला असता!
एकदा ह्याच दादाच्या बॅचचा चित्रकलेचा तास चालू होता.सोनकांबळे सर चित्र कसे काढायचे, हे जीव ओतून सांगत असताना एकदम एक लुना भर्रकन वर्गाच्या बाजूने गेली. त्यावेळी एका बाजूला रेक्झिन व दुसऱ्या बाजूला वेलवेट अशा उन्हात व पावसात वापरण्याच्या कॅपची फॅशन होती.तशी कॅप घालून बी. एड्. कॉलेजमधील एक सर्वांच्या नेहमीच्या परिचयाची जेष्ठ व्यक्ती त्या लुनावरून गेली होती….अचानक आलेल्या त्या लुनाच्या कर्कश्श आवाजाने विद्यार्थ्यांचे लक्ष बाहेर गेले व सोनकांबळे सरांची बोलण्याची लय तुटली. सात्विक संताप- तोही सोनकांबळे सरांना आला तर तो कसा असायचा ते पहा.सोनकांबळे सरांना एवढा राग आला त्या आवाजामुळे लुनाचालकाचा….! बोलता बोलता सोनकांबळे सरांनी त्या लुनाचालकाने घातलेली टोपी व तिची पावसात वर ठेवायची बाजू उन्हात वर कशी ठेवली आहे, हे हेरले असावे.आपल्या चित्र समजावण्याच्या बोलण्याच्या लयीतच ते क्षणार्धात बोलले-
“हे बघा हे दलिंदर!…..भर उन्हाळ्यात रेक्झिन वर करून चाललंय…!” सरांचा संताप पाहून व त्यांनी केलेली टिपणी ऐकून मुलांची हसून हसून मुरकुंडी वळली!
त्याच बॅचची आणखी एक आठवण, अर्थातच दादा व त्याच्या मित्रांनी सांगितलेली. सोनकांबळे सरांनी एकदा मुलांना अतिशय गोडीत सांगितले की ‘आपण काय करू, वर्गणी करू…आणि स्थिर चित्रासाठी मॉडेलमध्ये ठेवण्यासाठी फळे, वस्तू आणू…!ज्याने आजवर चित्रकलेचे क्लास बुडवले आहेत आहे त्याने प्रतितास 25 पैसे भरायचे…आता मी एकेकाचे नाव सांगतो..कारण माझ्या लक्षात आहे ,कुणी चित्रकलेचे किती तास बुडवले आहेत..!’ असे म्हणून ते एकेक करून ते कुणाला दोन तास बुडाले असतील तर ‘पन्नास पैसे’,चार तास बुडवले असतील तर ‘एक रुपया’ असे सांगत सांगत ते आमच्या दादाला म्हणाले ..”तू दोन रुपये आण..” आता दादाला वाटले ‘मी आठ तास कधी बुडवले?’ कारण ’25 पैसे प्रतितास’ या हिशोबाने ‘दोन रुपये’ म्हणजे मी चित्रकलेचे आठ तास कुठे-कधी बुडवले?..अशा अर्थाने त्याने आश्चर्याने विचारले, “दोन रुपये…? ”
या फजूल प्रश्नाला कुठे उत्तर देत बसायचे किंवा आपला हिशोब वा विद्यार्थी चुकला असे वाटून गेलेले सोनकांबळे सर, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्याच
टोनमध्ये म्हणाले,
“बरं जाऊ दे, एक आण!”
आजही त्या बॅचची मित्रमंडळी आठवणी निघाल्या की ही आठवण सांगून ज्या वेगात सोनकांबळे सरांनी ‘बरं जाऊ दे, एक (रुपया) आण’ असे एकमेकांना म्हणून सरांनी चूक सुधारून संवाद कसा आटोपता घेतला व ते दुसऱ्या विद्यार्थ्याकडे वळले हे आठवतात व हसतात…!
एक मुलगा भर वर्गात मार बसला म्हणून सोनकांबळे सरांवर चिडला.एकतर सरांमुळे त्याची चित्रकला सर्वांना समजली व मारही बसला होता! वर्गात ‘फू फू’ करणाऱ्याला सरांकडून मार बसला की त्याने प्रस्थापित होण्यासाठी व ‘लई कडूय्’ ही पदवी मिळण्यासाठी आजवर घेतलेल्या मेहनतीचा उपमर्द होत असतो. काही दिवसांतच नगरपालिकेच्या मैदानावर हीss सभा भरली होती.तिथे सर गेले होते.सरांची सायकल जी कुठूनही ओळखू यायची ,ती पाहून त्या मुलाने सभेत सर्वजण समोर बघत आहेत हे हेरून हळूच सायकलची हवा सोडून द्यायला सुरुवात केली….हवेचा ‘स् स्सूsss’ आवाज येताच कसे काय की, पण सरांचे दुरून लक्ष गेले असावे.त्यांनी कसेबसे ‘कोणय, कोणय’ करून त्या मुलाला तिथून सायकलपासून पिटाळले.दुसऱ्या दिवशी त्या मुलाने ‘जन-गन-मन’ व्हायच्या आधी सरांच्या सायकलची हवा सोडून त्या दिवशी बसलेल्या माराचा कसा वचपा काढला हे सगळ्यांना सांगितले…कुणी हसले,कुणी त्याच्या हिंमतीला दाद दिली…हे सारे सारे झाले.’जन-गन-मन’ होताच सगळेजण एकेक करून वर्गात जाऊ लागले… सोनकांबळे सर कुठून आले कुणास ठाऊक….त्यांनी त्या पोराला “तू थांब बे” असे म्हणून थांबवले.तो गर्भगळीत झाला…वर्गात आलेली सगळी मुलं घाबरून बाहेर दोघांकडे पाहू लागली..सोनकांबळे सरांनी तिथूनच ओढत त्याला वर्गात आणले…
“हे दलिंदर…..काल नगरपालिकेच्या ग्राउंडवर माझ्या सायकलची हवा सोडत होतं..”असे म्हणून क्लासटीचर यायच्या आतच त्याला दोन धपाटे दिले आणि त्याच्या बसायच्या जागेकडे “आता बस, जागेवर” असे म्हणून तो वर्गात बसत होता ती रांग सोडून दुसऱ्याच बेंचच्या रांगेत ढकलले!!!!
काही वेळापूर्वी सरांना कसा धडा शिकवला हे फुशारकीने सांगून हशा मिळवणाऱ्याचा तेजोभंग कसा झाला, हे वेगळे काय सांगावे? तर असे हे सोनकांबळे सर-भयंकर दक्ष! रागीट आणि धडकी भरवणारे.पण काहीही झाले तरी शेवटी हसूच यायचे,व मर खाल्लेलाही,त्यांचे बोलणे बसलेलाही त्या हसण्यात सहभागी व्हायचा!
हेच असे गणपतीचे दिवस होते….
हौसिंग सोसायटीतला देखावा मला मित्र
अनरथ बरूळे दाखवत होता.गुंग होऊन आम्ही तो हलता देखावा पाहात होतो…एक नवविवाहित स्त्री खाली पडली आहे…,तिचा पती,दीर, काठ्या, लाठ्या घेऊन बाजूला उभे आहेत,ती खाली पडून कुणाचा तरी हात झटकत आहे …आणि चिमणी हातात घेऊन सासू तिला पेटवत आहे…सासूचा चिमणी घेतलेला हात मागे पुढे होत आहे.. ह्या कट
आऊट्सच्या बाजूला स्टेजच्या खाली पंखा लावून लाल बेगडाच्या पट्ट्या त्याच्या वाऱ्यावर उडत्या ठेवून धगधगत्या सरणाचा आभास केला होता,आणि त्याखाली पर्शियन ब्ल्यू मध्ये अक्षरे लिहीली होती,’हुंड्यासाठी केलेले हे बलिदान वाया जाणार का’ सोनकांबळे सरांनी काढलेल्या चित्रांच्या कट-आऊटस् मुळे हा देखावा एवढा जिवंत वाटत होता की बस्स्!त्या विवाहितेच्या कपाळावरचे विस्कटलेले जाड-पातळ बटा ,त्या आडून दिसणारे कुंकू,प्रतिकार रोखताना मंगळसूत्र खांद्यावर हिंदकळतेय,पदर कसाबसा धरलेला आणि ओली हळदही न उतरलेल्या चेहऱ्यावर संत्रस्त, भेदरलेले भाव! तेवढीच सासू कजाग..डोळ्यांच्या वरच्या कडा सोडून बुबुळे सुनेवर रोखलेली…नऊवारीतील त्या सासूच्या हातातील चिमणीची मध्यभागी पिवळी व बाजूने केशरी असलेली ज्योत… अख्खा मंडप ‘हुंडाबळी’ च्या ज्वलंत समस्येने गिळलेल्या समाजाचा उभा छेद घेऊन गणरायाच्या मूर्तीसमोर उभा!प्रेक्षकांच्या गर्दीत ज्याच्या त्याच्या तोंडी सोनकांबळे सरांचे नाव!सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यांची स्पर्धा त्यावेळीही व्हायची. परीक्षकांपैकी एक लोहिया भाभी होत्या.हे मला माहीत होते त्यामुळे खांद्यावर हात टाकून उभ्या असलेल्या मित्र अनरथला मी म्हटले,ह्या देखाव्याला- म्हणजे तुमच्या सोसायटीला पहिला नंबर मिळणार! …आणि तसेच झाले…!
सरांना खूप समाधान वाटले. हे मला कसे कळले? तर त्यांच्या टिंगण्या सायकलवरून उतरून ते कुणाशी तरी हसत बोलत होते व त्याच्याकडून अभिनंदन स्वीकारत होते, ते मी ऐकले होते.
…गेट टुगेदरला पाच वर्षांपूर्वी आलेले सोनकांबळे सर आठवतात…किती शांत दिसत होते… ! आमच्या मित्रांनी इतर सरांबरोबर त्यांचाही सत्कार केला होता..काल नेमके गणपतीच्या दिवसांतच सर गेल्याचे कळले..सांसर्गिक वातावरणामुळे देखावे व गर्दी होत नसल्यामुळे हिरमुसलेल्या गणपतीने एखादा देखावा स्वर्गातच करून द्यावा, म्हणून तर सरांना बोलावले नसेल..?
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
9767202265