# वाहिन्यांची नैतिकता हरवल्याने जीवन मरणाच्या प्रश्नांना बगल- सुरेंद्र कुलकर्णी.

सुशांत चे मारेकरी समजल्याशिवाय लस येऊनही काही उपयोग नाही, असे दिसते..! कारण जीवनमरणाचा प्रश्नच मीडियाने बदलून टाकला आहे..! चौकशी झाली पाहिजे, न्याय झाला पाहिजे, अपराधी जेलमध्ये लटकलेच पाहिजेत पण याची चर्चा एखाद्या हिरोचाच संशयास्पद मृत्यू झाल्यावरच का? हे विचारण्याचे आणखी एक कारण असे की, गुन्हेगारीच्या ज्या ज्या शक्यतांची आज चर्चा होताना दिसते आहे त्या चर्चा, हिरो म्हणजे सुशांत गेला नसता तर दबल्याच असत्या, असे दिसते. म्हणजेच आठच दिवस आधी तितक्याच संशयास्पद रितीने गेलेल्या दिशा सलियनबद्दल कुणाला काहीही वाटले नसते! सुशांतच्या जाण्याच्या चर्चेला आधार म्हणून तिच्या जाण्याचा उल्लेख! या घटनांचा व झडणाऱ्या चर्चेचा अन्वयार्थ असा की, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या,’लो प्रोफाइल’च्या म्हणजे कमी कमाई असलेल्या, पडद्यावर न झळकलेल्या व्यक्ती जेव्हा आकस्मिकपणे व घातपाताने ‘पाठवल्या’ जातात तेव्हा गुन्हेगारीचा कुणाला गंधही येत नाही. आणि प्रस्थापित अभिनेता किंवा अभिनेत्री गेली रे गेली, की ह्या sss चर्चा! त्या चर्चेद्वारा केला जाणार उहापोह रास्त असेलही, पण ज्या बाबींवर चर्चा झाली आहे, होत असते त्या बाबींचा मुळापासून शोध घेतला जातो का? तो तसा शोध घेऊन त्या गोष्टी उपटल्या गेल्या, आळा बसला, काही सर्व आलबेल झाले, किंवा घसरण रोखली गेली असे ऐकायला मिळते का?

कितीही बळी गेले, कोणी स्वतःहून संपले तरी हे प्रकार थांबणार नाहीत याची कलाकारांना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, वितरकांना खात्री असते! कारण यांना तीन तासाच्या करमणूकीसाठी जोपासणारा स्रोत म्हणजे प्रेक्षक हा घटक ही गुन्हेगारी, ही खदखद व गैरप्रकारांच्या माहिती पासून खूप दूर असतो. म्हणून ठराविक अंतराने लोकांचे बळी जातातच- कित्येक प्रश्न अनुत्तरित ठेऊन.

अभिनेत्री श्रीदेवी जेव्हा आकस्मिक पणे गेली तेव्हा अमितजींची प्रतिक्रिया फार बोलकी होती.”एक अजीबसी घबराहट हो रही है”. एवढा मोठा कलाकार, स्टार ऑफ द मिलेनीयम, करोडो चाहते-तितकेच followers असलेला, पण काही सूचित करणारे गर्भित सत्य भीतीदायक बोलून गेला होता. मायानगरीचा पडदा ज्या जमिनीवर उभा असतो त्या जमिनीखाली होणारी गडगड, धडधड त्याच्या बोलण्यात जाणवत होती. श्रीदेवीच्या अपघाती जाण्यामागे गुंगीची शक्यता होतीच जिने तिला बधिर केले असेल-आणि गुंगी म्हटले की द्रव्य आलेच, कसली तरी पावडर आली, हुंगणे -ओढणे-चाखणे हे आलेच. त्या हुंगण्या-चाखण्याचे कारण काय बाह्य जगाचे विसमरण व ताण! हा ताण मोठा विचित्र असतो! मिळकत नसल्यामुळेही ताण असतो किंवा ती खूप असल्यावर कुणाचा तरी त्या मिळकतीवर डोळा असण्याचाही ताण असतो!

अनेक दुसरेही गुन्हेगार हे मायानगरीत दबा धरुन बसलेले असतात. त्यांच्यातील गुन्हेगारी सावज टप्प्यात येण्याची वाट पाहत टपून बसलेली असते. आर्थिक व्यवहार (डील्स), हितसंबंध, एकमेकांचे प्रतिस्पर्धी, पुरस्कार, जाहिरातींचे करारनामे, कलाकारांचे मानधन, त्यांच्या सवयी, प्रत्येकाचा कच्चा-पक्का दुवा, त्यांचे सोबती, निवासस्थान, हिंडण्याफिरण्याची साधने व ठिकाणे या व अनेक बाबी गुन्हेगारीला खडानखडा माहीत असतात. त्यामुळे यंत्रणांना चकवणे हे गुन्हेगारीला सुलभ होते व गुन्हा घडून उघडकीस आलाच तर पोलिसांना प्रकरणाच्या मुख्य केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालावधी जातो. म्हणून एखादा घातपात घडला की ती व्यक्ती जेवढी प्रसिध्द असते त्या प्रमाणात चर्चा लांबते. ह्या दरम्यान, प्रेक्षकांचे हजारो मॅनअवर्स जातात-बिघडत कुणाचे नाही तर बातम्यांचा मारा करणाऱ्या मीडियाचे!

‘सच सामने लाने के सब कुछ’ ह्या बाबीला कोणत्याही सूज्ञ व जबाबदार नागरिकांचा पाठिंबा असणारच. परंतु सध्याच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा शोध लावण्याचा सपाटा काही औरच आहे. दोन बाबी प्रकर्षाने जाणवतात. त्यांचे नेमके इंटरेस्ट्स हे वेगळेच असतात हे एखाद्या मुलालाही कळेल! सध्या तर त्या इंटरेस्ट्सचा ऊतमात चालू आहे. तो प्रत्येक वाहिनीवर जाणवतो, म्हणून त्यांना समोर ठेवून विचारावे, बोलावे वाटते.

एक: सत्य शोधताना, चर्चा करताना, उहापोह करताना, ह्यांनी हे जसे केले, त्यांनी ते कसे टाळले हे चालू असताना रियाचे नृत्य, व्यायाम, विविध पोझेस, रॅम्प वॉक हे दाखवण्यातून तुम्ही काय साधत असता? तुमच्या चॅनलला बॉलिवूड मधील ‘ड्रग्ज’, ‘रॅकेट’ इत्यादींचा पर्दाफाश करायचा आहे ना? ते करताना ‘हे’ प्रदर्शन कशात बसते?मान्य आहे, तुम्ही लावून धरल्यामुळेच या प्रकरणातील जनतेच्या शंका, तर्क, उत्सुकता, हे सारे बाहेर आले. ते तुम्ही प्रामाणिकपणे मांडलेही, पण बॉलिवूडमध्ये करमणूकीच्या व्यवसायातून ड्रग्ज चा धंदा केला जातो, तसाच तुम्हीही सीबीआयची मागणी किंवा आरोपींकडून खुलासा मागताना ग्लॅमरस अशी दृश्ये दाखवून धंदा करता. जे बॉलिवूड मध्ये मुख्य व्यवसायाच्या आड होते होते, तेच तुम्ही बातम्या देताना करता! असा धंदा हीच मुळात नशा आहे! ‘ मादक द्रव्यांची नशा’ हा तुमच्या बातम्यांचा विषय. बॉलिवूड मधील सर्व भुका भागल्यावर मोजके लोकच नशा इत्यादी करत असतील. त्यातले काळे व्यवहार जे देश हिताला मारक आहेत ते उघडे करताना, त्या नशेसारखीच बातम्या तयार करून देण्याची चटक तुम्हाला लागली आहे! जाहिरातींतून होणाऱ्या कमाईसाठी आणि नंबर one होण्याच्या धुंदीत ती चटक तुम्ही प्रेक्षकांना लावता. ही धुंदी घराघरात जात आहे याची जबाबदारी तुम्ही घेणार का? एकवेळ माणूस, त्याचे कुटुंब सिनेमाला जाण्यासाठी काही प्लॅन करते, सर्वांना वेळ आहे नाही, ते पाहते, चार-दोन फोन केले जातात व तो कार्यक्रम पार पडतो! पण तुमचा मात्र प्रेक्षकांना घरबसल्या व वेळ मिळताच खिळवून ठेवण्यासाठी अहोरात्र कर्कश्श आटापिटा चालू असतो!

दोन: तुम्हाला सीबीआयद्वारे चौकशी हवी होती. मान्य!!! ती चालू असताना आपले रिपोर्टर्स आरोपी लोकांना का घेरत असतात? तुमच्या मते, आरोपी जर एवढे पाताळयंत्री आहेत तर तुमच्या रिपोर्टरला रस्त्यावर किंवा गाडीत बसून उत्तरे देतील का? आणि ते निष्पाप असतील तर, त्यांनी तुम्हाला दिलेले कोर्टात टिकणार आहे का? मुळात तुमचे प्रश्न थांबणार आहेत का?आरोपींनी एखादे उत्तर दिलेच तर तुमचे त्यावर तर्क वितर्क! हे सगळं न संपणारं असंच आहे. तेव्हा तुम्हाला खडसावून विचारावे वाटते की, तुम्ही रिपोर्टिंग कशाचेही करा पण आरोपींना घेरता कशाला? आरोपींनी तुम्हाला झिडकारलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया दिवसभर लूप मध्ये टाकून दाखवायला त्यांच्या अंगावर जाता का? म्हणजे, जी यंत्रणा कामाला लागली आहे, तपास, प्रश्न विचारण्यात, माहिती मिळवण्यात आणि मिळवलेल्या माहितीचा अर्थ लावण्यात तासनतास गुंतली आहे, तिच्यावर तुम्हा माध्यमांचा विश्वास नाही!

आता नाव घेऊन बोलायचे झाल्यास, ‘आजतक’ ने रियाची मुलाखत घेतली..यात तुम्हा ‘रिपब्लिक भारत’वाल्यांना अडचण काय होती? त्यांनी मुलाखत घेतली म्हणूनच तिचे खोटे बाहेर आले ना?आज रियाला अटक झाल्यावर ती खोटे बोलत होती हे त्या मुलाखतीच्या आधारेच तुम्हाला सांगता येत आहे! तुमचे दोन्ही बाजूने फावले! ती खोटी पडली आणि तिला ‘आजतक’ कसे निष्पाप म्हणून प्रोजेक्ट करत होते, हे ही सांगायची तुमची सोय झाली! लगेच तुम्ही धुतल्या तांदळाचे झाले!! किमान ‘आजतक’ चे वार्ताहर त्या आरोपींच्या अंगावर तर जात नव्हते! तुम्हीच म्हणता की,’ ये बडी साजिश थी’,’इतने महिने से ये चल रहा रहा’,’इसका कनेक्शन यहाँ भी है, वहाँ भी है…’ जर असे असेलच तर ‘इतनी बडी साजिश करनेवाले’ तुम्हाला रस्त्यावर, पोलीस त्यांची ने-आण करताना त्यांना सोडून तुम्हाला काही सांगतील का? आरोपी पोलीसांच्या पासून जे लपवतात ते चॅनेलला सांगत असतात का? मग आरोपीच्या अंगावर जाण्याला काय अर्थ होता? तुम्ही मग वेगवेगळ्या यंत्रणाद्वारे चौकशीची मागणी करता कशाला? ही मागणी करताना तुम्हाला सत्य पाहिजे की, कुठल्यातरी चॅनेलपेक्षा आपला नंबर वरचा आहे हे ओरडून ओरडून सतत सांगायचे आहे?

विविध चॅनल्सवर ज्याच्यावर चर्चा व्हायला हव्यात त्या अभावानेच दिसतात. आज इलेक्ट्रॉनिक मीडियात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी किती प्रमाणात येते? कोरोनामुळे बेरोजगारीच्या त्सुनामीची बातमीही अभावानेच दिसते. लघुउद्योगातील हरवलेलं मनुष्यबळ, व्यवहार जो तीन ते पाच महिने ठप्प होता- त्यामुळे थकलेली देयके, हफ्ते यावरच्या चर्चा रोडावल्या आहेत. उपाययोजना किमान कागदावर आणण्याचाही दबाव नाही. सरकारी उपाय वाढत्या संसर्गाने कमीच पडताहेत, त्याची त्याप्रमाणात चर्चा नाही. याचा परिणाम असा की, बेमुदत अस्वस्थता सर्वत्र आहे. बेरोजगारी आहे, म्हणतात मग आम्हाला कामाला माणसे कशी मिळत नाहीत, हे एक आम्हा सूक्ष्म उद्योगाला पडलेले तहह्यात कोडे, ह्याबद्दल कुठेही भाष्य नाही. ‘आपले माणसं कुठले काम करतात हो’ हे परवलीचे वाक्य ही नेमकी अडचण का आहे, त्यावर चर्चा ना मार्गदर्शन. नाही म्हणायला धुगधुगी दिसते आहे आणि सर्वांनीच कोरोनाचे संकट झुगारून देण्याचे ठरवले आहे. पण पुन्हा, पाच महिन्यात पडलेला खड्डा बुजवण्यात खूप वेळ व ऊर्जा जाणार आहे, याबाबत विश्लेषण व्हायला हवे. यासोबतच, वैद्यकीय सुविधा, वीजबिल, हॉटेल्स ,वाहतूक सुरू होणे, रुग्णालयाची वाढीव बिले, त्यांचा परतावा याबद्दलच्याही चर्चा तेवढ्याच अहमिकेने व्हायला हव्यात. ह्या खऱ्या ‘हार्टब्रेकिंग न्यूज’ आहेत! या थेट जीवनाला भिडणाऱ्या विषयांबद्दल तुम्ही त्याच तीव्रतेने सोयरसुतक व गांभीर्य दाखवले पाहिजे. अन्यथा, आभासी दुनियेतला अधूनमधून होणारा घातपात झाल्यावर, विविध यंत्रणेद्वारा चौकशीची मागणीही तुमचीच आणि त्यावरचे निष्कर्ष ही तुमचेच! हेच ऐकत बसायचे आणि तुमचे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’ मुळे पांढरे होत असलेले उखळ पाहत बसायचे का?

-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
मोबाईल: 9767202265
ईमेल: surendrakul@rediffmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *