# माता जया व भगिनी उर्मिला यांना कोपरापासून नमस्कार.! -सुरेंद्र कुलकर्णी.

काही लोक बोलत नव्हते म्हणून सुसह्य होते ….आणि ते बोलले की एवढे असह्य होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जया बच्चन! हे सत्तरच्या दशकात सिप्पीजींच्याही लक्षात आलं असावं आणि त्यांनी यांना शोले मध्ये फक्त शांतपणे दिवे मालवायला सांगितलं असावं…!

काल उर्मिला मार्तोंडकर यांनी ते दिवे पुन्हा उजळवले! सुरुवातीला वाटले त्या काही अ,ब,क असे काही बोलून काही विश्लेषणात्मक बोलत आहेत…पण नंतर नंतर त्या एवढे काहीही बोलू लागल्या की चर्चेतील वैचारिक बैठकीचे अ,ब,क,ड ही त्यांना येत नाही, हे समजले!  ABP माझाचे कुटुंब रास्त शब्दात कौतुक करून पुन्हा पुन्हा त्यांना मुद्याजवळ ओढत होते, उर्मिलाची प्रतिमा आणखी उजळावी, मराठी माणसांना तिच्याकडून दिलासा मिळावा, ही त्या चॅनेलची रास्त इच्छा!! तरीही उर्मिलाजींना एका वाक्याचा दुसऱ्याशी संबंध लावणे त्यांना उत्तरोत्तर कठीण जात होते. ते भरून काढण्यासाठी उर्मिलाजी नको तेवढे हावभाव, हेल, हातवारे करून अनावश्यक ठिकाणी एखादी वैचारिक व्यक्ती बोलत आहे असे आव आणू लागल्या. एका ठिकाणी तर त्या कंगनाबाबत म्हणाल्या ‘अगं, मग बोल ना बाई…, नाही कोण म्हणतंय…? मग कंगना बोलतच होती ना? पुढे त्यांनी एका वाक्यात इतक्या वेळा हे,ह्या,ही, हे सारे वापरले की कळेचंना नेमके ‘हे’ म्हणजे काय आणि ‘ह्या’ म्हणजे काय! हे म्हणजे ‘काहीही हं ऊर्मिला जी’ म्हणावे असे वाटण्यापर्यंत गेले…!कंगना ही मुंबईत कित्येक वर्षांपासून राहते. घरात खूप अस्ताव्यस्तपणा आला, की आपणही म्हणतो, काय ‘पसारा पडलाय्..’तेव्हा बायको लगेच आपल्याला म्हणत नाही घराची बदनामी केली म्हणून! एवढे हे साधे प्रकरण असेल/नसेल म्हणून आम्ही आपले ‘बॉलिवूड’ मध्ये काम करणारी आपली एक मराठी अभिनेत्री काहीतरी असे सांगेल जेणे करून आपल्या मनातील शंका दूर होतील असे वाटले होते, झाले तिसरेच!

तर ऊर्मिलाजी मध्येच ‘बॉलिवूड’बद्दल बोलत होत्या आणि मध्येच सामाजिक होऊ लागल्या. कोरोनाने एक सोय करून ठेवली आहे अशा विचारवंताची.”एवढं सगळं होत असताना….. “असं म्हटलं की आता वाटतं सरकार कोरोनाविरुद्ध काहीच करत नसावे !! पहिल्या दिवसापासून जीव तोडून मास्क ते distansing याबद्दल मुख्यमंत्री, विविध मंत्री, पदस्थ, राजकारणी नेते सर्वांनी सांगितले. दौरे केले, सेंटर उभारले, सुविधा दिल्या, खाजगी हॉस्पिटलमधील बिलांसंदर्भात कारवाई केली, खिल्ली उडवली तरी जनतेशी संवाद साधला. काय आहे, अपश्रेय घ्यायलाही किंवा कुणीतरी वाईट व्हायलाही आम्हा भारतीयांना कुठलीतरी संस्था, यंत्रणा, व्यक्ती पाहिजे असते. एवढ्या लोकसंख्येच्या घनतेत बरेच काम करूनही संख्या वाढतच आहे.. असो, तो स्वतंत्र विषय होईल..!पण उर्मिलाजी सामाजिक इत्यादी बोलताना ‘डॉक्टर्स, पोलीस यांच्या सेवेबद्दल काहीच बोलल्या नाहीत. प्रेतांच्या अदलाबदल होईपर्यंतच्या गोंधळाबद्दल, हॉस्पिटलमधील अपुऱ्या व्यवस्थेबद्दल आणि त्यातून नर्सेस, डॉक्टर्स आणि कर्मचारी संभाव्य रुग्ण होत होत काम कसं काम करत असतील, पोलीस आपल्या कुटुंबियांना रोज ड्युटीवर जाताना कसे निरोप देत असतील, घरी आल्यावर त्यांना कुटुंबीय कसे सामोरे जात असेल, अशा कुठल्याच मध्यमवर्गीय भिडणाऱ्या बाबींबद्दल बोलल्या नाहीत!

कंगनाबद्दल बोलताना या विदुषी अशा विदुषकी आशयाचे बोलल्या की, ‘मला अमुक माणसे आवडत नाहीत म्हणून मी इथल्या लोकांना बदनाम करायचं का इत्यादी असे कंगनाचे बोलणे आहे! -अहो ऊर्मिलाजी, पण पडद्याआड चालणाऱ्या गोष्टींविरुद्ध बोलून आता तर तिने सर्वच जणांचा रोष पत्करला ना! आणि तिची मागणी व लढा कसा बरोबर आहे ते रोज सीबीआय नावाची पॅथॉलॉजी लॅब एकेकाची ‘रक्त व लघवी’ तपासून व आत टाकून सिद्ध करतंय ना! तुम्हाला हे जमत नसेल तर गप्प बसून पहा ना किमान!पण नाही!!!

‘वाय प्लस’ सुरक्षेबद्दल बोलताना त्या सामान्यांच्या टॅक्स मधून हा खर्च झाला व तो कोण देणार असा त्यांनी कानाला गोड वाटेल असा प्रश्न विचारला. उद्या समजा कंगनाला विरोध करणारे आणि तिला पाठिंबा देणारे यांच्यात कुणाचाही उद्देश तिला इजा पोहोचवण्याचा किंवा तिला पाठिंबा देऊन अलगद घरी पोहोचवण्याचा उद्देश नसतांनाही, चुकूनमाकून चेंगराचेंगरी झाली असती तर ‘सुरक्षा व्यवस्थेचा पैसा कोण देणार’ म्हणणाऱ्यांनी कंगनाचे किंवा दोन्ही बाजूच्या एखाददुसऱ्या कार्यकर्त्यांचे प्राण चेंगराचेंगरीत गेले असते तर ते प्राण कोण देणार होते? मग याला कंगनाच कशी जबाबदार विचारायला तर कणगी भरून शाई भरलेले पेन घेऊन संचच्या संच आहेतच बसलेले! पण कंगनाची ‘ड्रग्ज’ बाबत भूमिका अयोग्य कशी या प्रश्नाला कुणाकडेच उत्तर नसल्याने तिला ‘बघून घेऊ, राहायचा अधिकार नाही’, मुंबईची बदनामी, महाराष्ट्राची बदनामी चालू द्या गोंधळ!! अरे बाबा, ती तसे कधी बोलली? राज्यात संविधानाची शपथ घेऊन पदे भूषवणारे नेते ‘तिला इथे राहायचा अधिकार नाही’ असे बोलल्यावर व सत्तेतले संघटनात्मक नेते ‘बघून घेऊ’ असे बोलल्यावरच बोलली ना! त्यात तिनेही मूर्खपणा करून POK शी तुलना केली! बायका बोलतात वैतागाने पोटच्या मुलालाही ‘मरं ना एकदाचं’ तसं! खेद प्रकट करणे, निषेध करणे हेही मान्य! पण सामाजिक विषयात बोलताना तिचा अनुभव कमी पडला! शिवाय POK शी तुलना केल्यामुळे उत्तर प्रदेशातील विकास दुबे, कर्नाटक मधील वीरप्पनच्या समर्थकांच्या व इतरत्र अराजकता माजवलेल्यांच्या आणि पार्ट्या घेऊन प्रचार केलेल्यांच्या भावना दुखावल्या! त्यात वाचाळवीरांना शब्द सोयीप्रमाणे फिरवता येतात, त्यांचा सोयीप्रमाणे अर्थ लावता येतो, करायची ती कारवाई सोडून त्यामागच्या भावभावनांचे ही सोयीप्रमाणे भांडवल करता येते. मुळात मुंबईतील बॉलीवूडमध्ये ‘ड्रग्ज माफिया’ ही वस्तुस्थिती हीच मोठी बदनामी किंवा कलंक आहे हे न समजणारे किंवा समजून उमजूनही कंगनाच्या त्याच वाक्याला घेऊन तिचेच ऑफिस तोडून बसले!!! बेकायदेशीर होते तर त्या ऑफिस मधल्या हलवता येणाऱ्या वस्तू बेचिराख करायचा अधिकार कुणालाही कोणीही कसा दिला?यावर पुन्हा गळा काढणार -‘बाहेर एवढा कोरोना असताना……!’

उर्मिलाजींचा आणखी एक आक्षेप की ही कंगना की कोण हिने तिच्या हिमाचल प्रदेशात काही सुधारणा करावी, आम्हाला शिकवू नये!शाब्बास !!!जे काम तुम्ही करायला पाहिजे व त्या क्षेत्रात असल्यामुळे तुमची भूमिका पाहिजे की आमच्या मुंबईत मग ते बॉलिवूड असो की कुठंही असो गैरप्रकार चालणारच नाहीत…! अशी भूमिका मराठी माणसाने घेतली तर तो तुमचा आमचा मराठी बाणा! तेही असू द्या! पण कंगनाचे काय चुकले? आपण जिथे काम करतो,तिथल्याच गोष्टी बद्दल बोलतो ना! आणि यंत्रणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. शिवायू आपल्याला ‘बॉलिवूड’ हे नाव कौतुकाने मिळवावे वाटते. पण तिथल्या गैरप्रकार व गुन्हेगारीबद्दल बोलताना जीभ लुळी पडते. ह्याच ‘बॉलिवूड’ मधल्या ‘ड्रग्ज व्यवस्थे’बद्दल, नेपोटीझम का काय ते याबद्दल कंगना बोलली आणि तिचे करियर तिने पणाला लावले. आणि उर्मिलाजी, मुख्य म्हणजे सारे गैरप्रकार तिथे आहेत हे तुम्ही मान्य करूनही त्याविरुद्ध विरोधाचे, लढ्याचे काम, तुम्ही करायच्या वेळेस गप्प बसलात-हे राहिले बाजूला!!!! का हो, तिथे तसे होते म्हणून तुम्ही वर्षा उसगांवकर, आश्विनी भावे, सचिनजी, अशोकजी व सर्वप्रिय लक्ष्मीकांत बेर्डेजी यांच्याप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतही असे किती योगदान दिले हो? कमीपणा वाटला की करियरची भीती वाटली??? वेळ, सत्ता आणि परिस्थिती पाहून मुंबईचा अनादर, अवमान, अपमान….!!!!! संतापले, पेटले सगळे!!!! आणखी एक! सध्याचा स्वाभिमानाच्या फुटलेल्या पेवात तुमच्या पातळीला येऊन विचारावे वाटते की, नाना पाटेकर, विक्रम गोखले, निळू फुले, डॉ लागू अशी नावे सोडली तर प्रामुख्याने नोकरांच्या, गरीब, पिचलेल्या किंवा लांगुलचालन करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिका मराठी माणसाच्या वाट्याला यायच्या तेव्हा तुमचा स्वाभिमान कुठं जात होता? बेटा, हम आपके है कौन, मैने प्यार किया ह्यात लक्ष्मीकांत ना आणि प्रतिघात, करण-अर्जुन मध्ये अशोक सराफ यांना मिळालेल्या भूमिका पहा! काही चांगली उदाहरणेही आहेत, पण तुम्ही वेळ पाहून अंगावर ओढलेला स्वाभिमान पाहून हा ‘नोकरांच्या भूमिका’ किंवा दुय्यम भूमिकांचा ही बाब मांडली..असो…

नंतर नंतर तर उर्मिलाजी असे काही बरळू लागल्या की, त्यांच्या पुढे खांडेकरांनी थांबत थांबत, हे कशाबद्दल बोलत आहेत हे विसरेपर्यत अडखळत अडखळत पॉजेस घेऊन विचारलेले प्रश्न बरे वाटू लागले!!!!

कार्यक्रमाचे शीर्षक असे होते
मराठमोळ्या उर्मिला कडून कंगनाला मिळाली सणसणीत उत्तरं! तिला तर एकही उत्तर मिळालं नाही-आम्ही आपला मध्यमवर्गीय आणि मध्यमबुद्धीय गाल वेळ गेला म्हणून बसलो चोळत!!!

आता जयाजी!!!! सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे ह्या बोलत नाहीत तेव्हा बऱ्याच बऱ्या असतात. अमिताभ नावाच्या हिमालयाच्या पायथ्याशी ह्या राहतात. त्यांना अमिताभ व रेखाबद्दलच्या मायापुरी व इतर पाक्षिकांमधल्या व साप्ताहिकामधल्या कथित चर्चेमुळे सहानुभूती मिळते इथपर्यंत हे सारे ठीक आहे! ह्या ज्येष्ठ वृद्धेने काय म्हणून जुन्या पोतडीतील ‘जिस थाली मे खाते हो उसीमे …’ ही म्हण आत्ता बाहेर काढावी? वय झाले की बोलतांना कुणाच्याही भुवया आक्रसल्या जातात, हिरव्या- निळ्या शिरा दिसतात. यांच्या जरा उशिरा दिसल्या! अहो बाईसाहेब, थाळीत खाताना ती थाळी खाणाऱ्यांनीच साफ करायची असते ना! की बॉलिवूड ची थाळी हॉलिवूडमधील पाहुणे कलाकार करणार??? उद्या आम्हाला ‘पोळीबरोबर काय’ असे म्हटल्यावर आमच्या आईने ‘ड्रग्ज’ची चटणी वाढली, तर आम्हीच ती खड्यासारखी बाजूला करणार किंवा ‘हे काय’ म्हणणार ना!!! तुम्ही खूप पायाभूत म्हण बोलून दाखवली म्हणून हे उदाहरण द्यावे लागले! तुम्ही दिवे बंद करत होता तेच बरे होते, लावायला कुणी सांगितले???आपला अविर्भाव पाहून शंका वाटते, की तुम्हीही गैरप्रकाराच्या लाभार्थी आहात की काय? अन्यथा आपल्याच क्षेत्रातील कुणीतरी हा विषय लावून धरला व आज रोज ‘ड्रग्ज’ संदर्भात चौकशीअंती कुणी ना कुणी गजाआड जात आहे, याबद्दल तुम्ही समाधान व्यक्त केले असते!

खरे तर देशात पाणी, जमीन, जंगलव्याप्त जमिनी, ऊर्जेचे व्यवस्थापन, अर्थकारण, समाजकारण यावर चिंतन करण्यात, पुस्तके लिहण्यात, मार्गदर्शन करण्यात हजारो विचारवंतांचे आयुष्य गेले असताना हे ‘चेहऱ्यां’च्या जोरावर नाव कमावलेले व स्थापित झालेले चेहरे काय म्हणून देशाच्या संसदेत दिसतात? ह्यांचे कार्य कळेल का कधी?…करत असतील तर आदर आहे, पण एखादी Movement, सुधारण्यासाठी केलेली मागणी, त्या अनुषंगाने एक महिला उभी करू पाहत असलेली छोटीमोठी लढाई- या साऱ्या बाबींना तुम्ही पारंपरिक म्हण वापरून undervalue करता??? आणि उद्याच्या पोरासोरांबाबत काय? तुम्ही जाताल राज्यसभेचे भत्ते घेऊन! तुम्ही माता, भगिनी आहेत म्हणून विचारतो की, आत्ता ‘ड्रग्ज’ माफियांना आळा बसला नाही तर उद्या तुमचीच पोरे ‘ड्रग्ज’ घेऊन गाड्या चालवून उच्छाद करतील त्याचे काय?मानवतावादी विचारवंतांच्या व युक्तिवादी वकिलांच्या (अपवाद सन्माननीय विधिज्ञ) फौजा तर बलात्कारांच्याही व बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्याही मागे उभ्या राहतात. कारण त्यांना वाटते ‘निरपराध्या’ला शिक्षा होऊ नये! पण काळाचे भान व बदलत्या जगातील संभाव्य धोके हे आजी आजोबांच्या वयातील माणसांनी ओळखून मार्गदर्शन करायचे राहिले बाजूला. आणि केवळ आपण मुंबईत राहतो व आपले कवच सुस्थितीत व सुरक्षित राहावे म्हणून आवाज चढवून ‘जिस थाली मे खाते हो उसीमे…म्हणून मोकळे व्हायचे का? म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको ‘हे गप्प कसे?’ म्हणून ‘चूक का होईना’ बोलून दाखवायचे का?

तेव्हा उर्मिलाजी आणि जयाजी -दोघींनाही सादर प्रणाम- शुभेच्छा व कोपरापासून साष्टांग नमस्कार!!!

-सुरेंद्र मध्यमवर्गीय कुलकर्णी, पुणे
मोबाईल: 9767202265
ईमेल: surendrakul@rediffmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *