# लोकशाही: नवीन तंत्र व मंत्र -सुरेंद्र कुलकर्णी.

स्वतःचे अपयश झाकण्यासाठी कौतुकाच्या ‘तेजा’त न्हाऊन निघायचे!

यावेळी निमित्त आहे, नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीचे. पुन्हा मोदी शहा बसले कुणाला तरी खांद्यावर घेऊन उरावर!

पण दरवेळी हे असे कसे होते? बरे, गोची होते कुठे? तर ती होते लोकशाही मार्गाने ते उरावर बसतात, ही ती गोची! पण विरोधी पक्ष बिहार सोडून इतरत्रही कसा लोळतो?

थोडे मागे जाऊ! नोटाबंदी व GST हे दोन राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय म्हणजे मूर्खपणा, दुष्टपणा, अविचारीपणा, फसवणूक, लूट आणि जे जे काय लोकशाहीत म्हणता येईल ते ते या मोदी (यालाही भरपूर विशेषनामांनी संबोधता येईल) नामक सौदागराने लादलेल्या या दोन अविवेकी निर्णयांत असूनही आजही राज्यात निवडणूक होवो की पोटनिवडणूक होवो -मोदींचा करिष्मा व भाजपचा रणगाडा चालतोच चालतो-हे कसे काय??? विरोधक वरील निर्णयातील फोलपणा लक्षात आणून द्यायला कमी पडतात का? जेवढी समाजमाध्यमे व प्रचारतंत्रे मोदींना व भाजपला उपलब्ध आहेत, तेवढी विरोधकांना जनजागृती करायला उपलब्ध नाहीत का? उलट, देशाची वाट लावणारे निर्णय जर मोदींनी घेतले असतील तर ते विरोधकांच्या पथ्यावरच पडायला हवे होते ना??? त्याहून सोपे होते ते म्हणजे 15 लाखाचे खोटे बोलणे, याचा प्रचार! वडिलांनी ‘संध्याकाळी अमुक गोष्ट आणतो’ म्हणले आणि ती आणली नाही तर घंटाभर लहान मूलसुद्धा दुसरे आश्वासन मिळेपर्यंत त्या पित्याजवळ जात नाही! इथे तर डझनभर विरोधीपक्ष असूनही 130 कोटींच्या जनतेची मोदींनी चालवलेली धूळफेक जनतेच्या लक्षात येत नाही? धादांत खोटे बोलून आता सहा- सात वर्षे होतील तरीही जिकडे तिकडे एकतर किंग किंवा किंगमेकर मोदी व भाजपाच कसे??? बरे, ते रोजच खोटे बोलतात तरी विरोधकांना तो खोटेपणा उघडा पाडण्याचा सराव कसा होत नाही? उत्तर नाही!!! आता जनतेला कोडगे म्हणावे तरी अवघड! कारण मग काँग्रेसनेही अनेक दशके राज्य केले ते त्या कोडगेपणाच्या जोरावर केले, हे मान्य करावे लागणार! हजारो बेकायदेशीर स्वयंसेवी संस्था निकालात निघाल्या, नोटांनी भरलेल्या कित्येक गाड्या सापडल्या, अनेक नदीकाठी नोटा सापडल्या- ही मोदीशहांची जोडगोळी काय करेल काही सांगता येत नाही, ही काळ्या बाजारात धडकी भरली, देशात एक सर्वव्यापी निर्णय घेता येतो व तो राबवता येतो, हे फायदे अगदी किरकोळ होते!त्यांची भलामण करण्याचा इथे उद्देश नाहीच !

मुद्दा आहे, विरोधक कुठे आणि कसे कमी पडतात?

या प्रश्नांची उत्तरे नाहीत म्हणून आता वेगळाच उतारा चालू आहे! तो म्हणजे वर उल्लेखलेला कौतुकाच्या तेजाच्या न्हाहून निघण्याचा! त्यावेळी हे विसरायचे की, तेजस्वीच्या अल्पशिक्षणाचे कौतुक करताना आपला शिक्षितपणा 70 जागा लढवून 18-20 ला येऊन थांबतो, असा उघड पडत असतो. त्याच्या अल्पवयाचे कौतुक करताना हे विसरायचे की, आपला राष्ट्रीय पक्ष असूनही त्याला प्रदेशात दुय्यम भूमिका घ्यावी लागते! हे तर झालेच अंतर्मुख होण्याचे मुद्दे!

वैचारिक दिवाळखोरीचे व दुटप्पी व सोयीच्या राजकारणाचे मुद्दे वेगळे आहेत. ते असे की, नितीशकुमार हे भाजपच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री होणार म्हणायचे आणि महाराष्ट्रात आपण कुणाच्या विसंवादाच्या परिणामाने इथे सत्तेत सहभागी होऊन मंत्री संत्री झालो आहोत, ते विसरायचे! सोनियाजींनी अनेक तास घेतले सेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यासाठी! कारण पराभूत झालो तरी विचारसरणीशी तडजोड करण्यासाठी त्यांचे मन वळत नव्हते!ह्या बाई खऱ्या राष्ट्रीय नेत्या असे म्हणण्यास वाव आहे! एरवी फुकाचा देशाभिमान आणि ‘वेळ मारू’ व ‘कातडे पांघरु’ स्वाभिमान पाहिला की सोनियाजींचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे लक्षात येते. मग त्यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष मोदींचा सप्तवार्षिक खोटेपणा जनतेच्या लक्षात का आणून देऊ शकत नाही? तेजस्वी यादवचे कौतुक करताना लालू पाठोपाठ तेजस्वी यादवचाच कसा उदय होतो??? ही लोकशाही विरोधकांना कशी चालते? उत्तर प्रदेश म्हटले की मुलायम आणि पाठोपाठ अखिलेश- बिहार म्हटले की लालू आणि पाठोपाठ तेजस्वी ! हा देश-आणि लोकशाही काय घरचा माल आहे का? भाजपमध्येही हाच प्रकार अनेक ठिकाणी! तरीही जेटली, सुषमाजी गेल्या व सुदैवाने त्यांच्या जागी भावनेच्या बळावर त्यांची मुले-भाचे आल्याचे ऐकिवात नाही. पण जनतेने एक पाहिले आहे ते म्हणजे मोदींच्या पश्चात कोणी नाही. ह्या व्यक्तीने आणखी दाढी वाढवली काय, इकडच्या तिकडचे शिरपेच घातले काय, बरे-वाईट निर्णय घेतले काय, जे काही करेल ते त्याच्या याच जन्मापुरते आहे! आणि तो या परंपरागत नेत्यांच्या घराणेशाहीवर चांगला वरवंटा फिरवत आहे!

आधीच मूल्ये इत्यादी वेळ पाहून आठवणाऱ्या पक्षीय राजकारणात एक प्रकार आता स्थापित होऊ पाहत आहे. परवापरवापर्यंत आधी निवडून आलेला पक्ष दिलेले आश्वासन पाळणे वा न पाळणे यामुळे प्रशंसेस पात्र किंवा टीकेचा धनी होई. आता नवीन प्रकार आला आहे! सगळ्या पक्षांनी मिळून जनतेला फसवायचे! त्यांनी मते कुणाला दिली, काय नाही हे राहिले बाजूला. एकदा मते दिली की जनतेचे नशीब सुरू होते. त्या नशिबात, एकत्र लढलेल्या पक्षात कधी बैठका झाल्या होत्या, कुणी कुणाला काय वचन (!) दिले होते, कोणत्या मुद्द्यावर हे एकत्र आपल्यासमोर येऊन आपल्याकडे मते मागत होते याचा पडताळा करत बसणे आणि शेवटी सूत्रांकडून येणाऱ्या बातम्या ऐकत बसणे हे सारे त्या नशिबात येते.

आताही काही समाजवादी सूचना व शक्यता तशा येत आहेत. त्या अशा की, तेजस्वी आणि नितीश ने एकत्र यावे! का बाबा? आत्ता कसे सुचते?काय म्हणून तुम्ही एका शेटजी-भटजींच्या, संविधानाची चाड नसलेल्या, हुकूमशाही कडे वाटचाल करणाऱ्या पक्षाला बरोबर घेऊन लढला?आधी कळत नव्हते??? हा प्रयत्न करणे किंवा यशस्वी होणे म्हणजे संख्येच्या गोळाबेरजेचे कोयते, कुऱ्हाड, चाकू घेऊन जनमताचा निव्वळ दरोडा टाकणे!!!

भाजपने तर कमालच केली. ज्याला मुख्यमंत्री म्हणून घोषित केले त्याचीच दमछाक होईल अशी व्यवस्था करून ठेवली- चिराग तेवता ठेवून! ह्या दिवट्याने नितीशकुमारला धोबीपछाड मार दिला!!! समजा, याचा डूख धरला गेला आणि जेडीयूच फट्कन फुटला तर? संपलेच सगळे! जनादेश, जनमत आणि त्याचा कौल हे तर केव्हाच मागे पडलेले असते! आता संख्येची पोती बांधायची आणि त्याला फसवणुकीच्या दोरीने आवळून आदळायचे जनतेवर!!!

तूर्त तरी तेज्याच्या कौतुकात न्हाऊन निघण्याचे फायदे तीन:
1.मनाचा मोठेपणा राजकीय परिपक्वता जी तह्हयात औषधालाही नसते, ती दिसते.

2.जे आपल्याला जमू शकत नाही, ते ज्यांच्याकडून करून घ्यायचे- त्याला चुचकारता येते-व ज्याच्या डंखाने आपल्या अंगाचा दाह झालेला असतो त्या विंचवाला शाळा सोडलेल्या तरुण चपलेने मारता येते का ते बघायचे! (ह्या बदल्यात जमल्यास एखादे मंत्रिपद….असो)

3.सर्वात मोठा फायदा या कौतुकाचा म्हणजे, आपले अपयश झाकले जाते… यासारखा तर मोठा अग्रलेखी फायदाच नाही!!!
भारत माता की जय!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
मोबाईल: 9767202265
ईमेल: surendrakul@rediffmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *