# चर्चितचर्वण अन् फुकाचा कळवळा..-सुरेंद्र कुलकर्णी.

“UP मध्ये वातावरण नाही म्हणून तिथे फिल्म्स इत्यादी बनणार का…?इथे जे बोल्ड चित्रपट निर्माण होतात, ते तसे तिथे निर्माण होतील का..?”

-इति प्रसन्न जोशी..! निमंत्रितांना ‘चर्चितचर्वण खाद्य’ पुरवताना…

चर्चिल हे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी अनुकूल नव्हते. India is not nation, its population.. हे लोक उद्या पिण्याच्या पाण्यावर टॅक्स लावतील.. ह्यांना स्वातंत्र्य देऊ नका..असे ते म्हणायचे…!

जोशी, तुमचा प्रश्न UP वातावरण नाहीतर तिथे बोल्ड चित्रपट निर्मिती होईल का? हे ऐकून प्रश्न पडला की चर्चिल- जो ब्रिटनचा पंतप्रधान होता- म्हणून त्याचे मत लक्षात घेता, स्वातंत्र्यासाठी इथल्या जनतेने दिलेले लढे, नेत्यांनी भोगलेल्या अपेष्टा, तुरुंगवास, त्यांनी केलेली उपोषणे, हरताळ, असहकार, हे सारे कशाला केले हो, जोशी…? पाठ्यपुस्तकात नेत्यांचे धडे कविता आणण्यासाठी का?

आणि जिथे जे काही नसते तिथेच सुरुवात करायची असते ना? अन्यथा बदलाच्या गोष्टी कशाला करायच्या घसा खरवडून??

जोशी, आता तुम्हाला शेतकरी, बेकार, श्रमिक, कोरोनाचे संकट, मजुरांची पायपीट, उद्योगांचे नुकसान असे प्रॉब्लेम्स महत्वाचे वाटत नाहीत. योगींमुळे बॉलिवूड ओरबाडले जाणार का, ही चर्चा मात्र झडली पाहिजे!

आपले मुख्यमंत्री आधीच म्हणाले आहेत ना की, ‘काढा जिथे फिल्मसिटी काढायची, मला दर्जा हवा!’ मग तुम्ही घडवून आणलेल्या वादळी चर्चेत छद्मी स्मित हास्य करत करत ह्या चर्चेच्या निमंत्रितांनी न उपस्थित केलेल्या शंका का पुरवत होता हो?

जोशी, माझा प्रश्न तुम्हाला आहे-मुख्यमंत्र्यांच्या आणि तुमच्या म्हणण्यानुसार UP मध्ये वातावरण नसण्याचा संबंध जोडून विचारावे वाटते की, दर्जाहीन लोकांनी सुरुवात केल्यावरच कळेल ना की, कशाला दर्जा म्हणतात किंवा दर्जातली तफावत काय असते! इथे वातावरण नाही हे तिथे काही दिगदर्शकांनी सुरुवात केल्यावरच त्यांना कळेल ना? काय सांगाल आपण, किंवा कसं पाहता आपण या गोष्टींकडे?

अनेक चॅनेलवर उगी बसल्या बसल्या भडकवा- भडकवी चाललेली असते. त्यांना त्यांच्या धाटणीचा एक प्रश्न विचारतो- मराठी नटांना प्रामुख्याने नोकरांच्या, हरकाम्याच्या दुय्यम भूमिका देणाऱ्या बॉलिवूडची तुम्हाला एवढी काळजी का हो? एवढ्या हिरीरिने कधी मराठी चित्रपटसृष्टी बद्दल बोललात का?

आणि काय हो..? देश एकच आहे ना? आता कुठे जातात संविधानाच्या, बांधिलकीच्या, विविधतेतील एकतेच्या चॅनेलवरच्या चर्चा?

तसेही उर्मिलाजींनी सांगितलेच ना एका नॉटी नटीला की, ‘तू काय करायचं ते हिमाचल प्रदेशात कर ना…’! मग योगी का कोण ते तेच करू पाहताहेत ना? ते करण्यासाठी ज्या बॉलिवूडचा इतिहास मोठा आहे, तिथेच ते मार्गदर्शन घ्यायला, चर्चा करायला आले म्हणजे त्यांनी बॉलिवूडचा सन्मानच केला ना?

सोयीस्कर मौन सोडणाऱ्या आणि धरणाऱ्यांनाही विचारावे वाटते, ते हे की, एक मध्यमयुगीन म्हणवला जाणार कर्मठ, भगवा मुख्यमंत्री जर चित्रपट निर्मिती सारख्या आधुनिक क्षेत्रात, कलेची सेवा करणाऱ्या क्षेत्रात काही योगदान देऊ इच्छित असेल तर ते स्वागतार्ह मानायचे की तो त्याच्या राज्यात हे उद्योग करून तो फक्त ‘इथून काही तरी लुटून नेत आहे व फिल्मसिटीच्या योजना आखत आहे’ असा शोध लागल्यासारखा आव आणून त्याला विरोध करायचा?

प्रांतवादाबद्दल काय योग्य ते कळतच नाही! उदा. एकदा म्हणायचे, अमुक हा उद्योग इथे होऊ देणार नाही! मग तो उद्योग किंवा तत्सम प्रकल्प इतरत्र जाण्याच्या हालचाली दिसल्या की… नेला, आमचा धंदा नेला..! लसीबाबतही तसेच-आमचे श्रेय बाहेरच्यांनी घेऊ नये! उद्या समजा हैदराबादला किंवा अहमदाबादला विकसित झालेली लस अधिक ‘परिणामकारक आणि अधिक स्वस्त’ अशी सिद्ध झाली तर ही ‘बाहेरची’ लस आम्ही महाराष्ट्रातल्यांनी घ्यायची की नाही? श्रीहरीकोट्यावरून सॅटेलाईट अवकाशात गेले तर त्याद्वारे जे दळणवळण उपलब्ध होते त्याचा लाभ घेतो ना संपूर्ण देश? “इथून रॉकेट सोडले, सगळा धूर आमच्या गावात अन् पहा न, सगळ्या बाहेरच्यांचे मोबाईल आमच्या सॅटेलाईटवर… यापुढे हे चालणार नाय” असे श्रीहरीकोटावासियांनी म्हणल्यावर आपल्याला कसे होईल?

पुन्हा मूळ मुद्यावर येऊ! मुंबईतील लोंढे रोखायचे आहेत ना? मग चार-दोन धंदे तिथे सुरू होणार असतील तरच UP चे लोक तिकडे गुंतून राहतील आणि आपल्या मराठी बांधवांना इथे कामे मिळतील ना? मग उद्योग तिकडे सुरू करण्याचे स्वागत करायला नको? की चॅनेलवर चर्चेला बोलावले म्हणून UP तून येणाऱ्या लोंढ्याबद्दल असे बोलायचे आणि उद्योग सुरू होण्याबद्दल कुणी पावले टाकली तर ‘आमच्या मुंबईला बॉलिवूडला हात लावू नका…’ अशा आशयाचे बोलायचे?

योगीबिगिंनाही त्यांना धडपडू द्या, यशस्वी होतील नाही तर आपटतील… मुंबईतल्या चित्रपट निर्मितीला शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास असताना इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटींमुळे -ज्यांच्या प्रदेशात निर्मिती चे वातावरण नसताना -(प्रसन्न जोशींनी चर्चेला पुरवलेली प्रश्नांकित शक्यता लक्षात घेता) एवढा गदारोळ का घालायचा?
मुळात इथले बॉलिवूड कोण कशाला हलवतंय?

आणि समजा त्या योग्याने काही प्लॅन केलाच तसा तर तो मुंबईतील निर्मितीचा इतिहास चोरून नेऊ शकेल? तसेही एवढा दैदिप्यमान इतिहास असताना नाहीतरी अधूनमधून नशेड्याच्या, शिकारींच्या, चिरडण्याच्या, आत्महत्यांच्या बातम्या बॉलिवूड मधून येतच असतात ना? एकदा लखनौला ‘लॉलिवूड’ सुरू झाल्यावर तिथेही ते चालू होईल… शेवटी पैसा असतो केंद्रस्थानी!

बॉलिवूडच्या चार नट-नट्या आपल्याला आवडेल तसे बोलल्या म्हणून बॉलिवूडचा अचानक एवढा कळवळा?

आणि काय हो? ‘Bandit Queen’ हा UP बिहार मधल्या अराजकतेवर, नागरी जीवनावर, क्रौर्यावर चित्रपट काढता येतो बॉलिवूडस्थित दिगदर्शकांना! तिथल्या बीभत्स प्रकारांचे चित्रण चवीने पाहिले सर्व देशाने! आपल्याकडेही कितीतरी सामूहिक हत्या होतात. उदाहरण दिले की, मूळ विषय बाजूला नेता येतो म्हणून देत नाही. एखाद्या दुसऱ्या राज्यातल्या निर्मात्या, दिग्दर्शकांनी आपल्या राज्यातील घटनांवर चित्रपट काढला तर चालेल का? बदनामी केली म्हणून बोंबलायला पण कमी करणार नाही..! निर्मितीचे वाता’वरण’, पोळी, भाजी, भात हे नसतांनाही UP वाल्यांनी ‘Bandit Queen’ वरून तशी बोंब केली नाही, म्हणजे ते बिचारे प्रगल्भच म्हणायचे!

अजून एक, बॉलिवूड मध्ये निर्माण होणाऱ्या चित्रपटांचे शूटिंग देशात इतरत्र केलेले चालते का? मुंबईत चित्रपट चालण्याबाबत ज्या चित्रपटांनी विक्रम केले त्यापैकी ‘शोले’चे शूटिंग दक्षिणेकडे झाले ना? ‘दिलवाले दुल्हनिया…’चे शूटिंग तर अधिक करून परदेशात झाले! ‘बॉलिवूड, बॉलिवूड’ म्हणून एवढा अभिमान (कधी फसवा, कधी उसना) असतो तर देधात इकडे तिकडे शुटींगला तरी का जायचे हो?

लक्षात असू द्या, आमचे म्हणजे, माझा- तुझा- त्याचा -ह्याचा ही सर्व चॅनेल्स पाहणाऱ्यांचे देखील मुंबईच काय, इथल्या गावागावातल्या कणाकणांवर प्रेम आहे…! ते प्रेम असे ‘कुणीतरी बॉलिवूड नेणार’ ह्या कपोलकल्पित भीतीने किंवा कुठले मुख्यमंत्री आले म्हणून, कुणी काही बोलले म्हणून जागत नसते!

आमचे इथल्या गोष्टींवर प्रेम आहे म्हणूनच बॉलिवूड मधल्या हीन प्रकारांची जेवढी लाज वाटते तेवढीच अर्थहीन चर्चांची लाजही वाटते..!
-सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
मोबाईल: 9767202265
ईमेल: surendrakul@rediffmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *