सध्या विद्यार्थ्यांच्या अन् पालकाच्या मनात शिक्षणाविषयी, परिक्षेविषयी, करियरविषयी अधिकाधिक संभ्रम निर्माण व्हावेत अशा बातम्या येताहेत. खरे तर सद्यस्थितीत एकमेकांना सांभाळून घेण्याची, समजून घेण्याची, एकमेकांना धीर देण्याची जास्त गरज आहे. सध्याचे संकट हे केवळ एका राज्यापुरते, देशापुरते मर्यादित नाही. ते जागतिक संकट आहे. ह्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर, विविध क्षेत्रात होणाऱ्या परिणामावर अनेक संस्था, संघटना, सरकार, तज्ज्ञ, तंत्रज्ञ आपापल्या परीने विचार करताहेत. दुर्दैवाने ही अशी अभूतपूर्व समस्या आहे जिचे गणितासारखे एकमेव, युनिक उत्तर नाही. काही बाबतीत तर उत्तरच नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सर्व बाबींचा, पार्शवभूमीचा शांतपणे विचार केला तर घाबरून जाण्याचे, डळमळीत होण्याचे कारण नाही. आपण सारे एकाच बुडत्या नावेचे प्रवासी आहोत. ती नाव ह्या वादळ वाऱ्याशी झुंज देऊन आपला मार्ग काढीत आपल्या किनाऱ्याला निश्चित पोहचेल.
सर्वात महत्वाचा, चिंतेचा प्रश्न आहे तो परीक्षेचा. सरकारला काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या. विद्यापीठांना काय करायचे ते करू द्या. त्यापैकी प्रत्येक घटकाला आपली जबाबदारी समजते. याचा अर्थ त्यांच्या हातून चुका होत नाहीत असे नाही. चुका होतात, होतील. पण त्या दुरुस्तही केल्या जातील याची खात्री बाळगा. ही समस्या एक दुसऱ्या विद्यार्थ्याची नाही. ती समस्या सगळ्या समूहाची आहे. तेव्हा सध्या कुणी काही निर्णय घेतले अन् ते चुकीचे असले, तरी निश्चित दुरुस्त केले जातील. अशा बाबतीत कुणीही एक व्यक्ती निर्णय घेत नाही. वेगवेगळे अधिकारी असतात, प्राधिकरण असतात. निर्णयावर शिक्कामोर्तब होईपर्यंत ती वैचारिक प्रक्रिया अनेक स्तरांवर चर्चिली जाते. त्या निर्णयाच्या बऱ्यावाईट परिणामाचा विचार केला जातो. फक्त एखाद दुसऱ्या व्यक्तीचा विचार होत नाही. पूर्ण समूहाचा, वर्गाचा विचार होतो. नुकतेच दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले. ते जाहीर करताना देखील यावेळी काही वेगळे निकष वापरले गेले. त्यात एखाद दुसऱ्याला आपले नुकसान झाले असे वाटू शकते. तो विद्यार्थी पुढेमागे त्या एका विषयाची परीक्षा देऊ शकतो. आपले परसेंट, ग्रेड सुधारू शकतो. आता पुढचा प्रश्न उच्च शिक्षणाचा. बारावीनंतरचे कॉलेज, पदवीनंतरचे उच्च शिक्षण, त्यानंतरचे पीएचडीचे संशोधन, आयआयटी सारख्या ड्रीम संस्थांतले प्रवेश यांचा. ह्या सगळ्या प्रक्रिया यंदा निश्चितच लांबणार. एकदा गाडी रुळावरून घसरली की त्या मार्गावरून पुनश्च वाहतूक केव्हा सुरु होईल हे बऱ्याच बाबींवर अवलंबून असते. हा अपघात साधासुधा नाही हे लक्षात घ्या. इथे सर्व डबे उलटे पालथे झाले आहेत, रुळाची प्रचंड नासधूस झाली आहे. अवती भवतीचे वातावरणदेखील अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळे गाडी रुळावर येण्यास बराच वेळ लागेल. किती वेळ हे सध्या कुणीही सांगू शकत नाही. पुढचे शैक्षणिक वर्ष हे परिस्थिती नॉर्मल झाल्यावरच सुरू होणार. सर्व जगात अशीच परिस्थिती असणार. ह्या काळात विद्यार्थ्यांनी स्वअध्ययनावर भर दिला पाहिजे. बहुतेकांकडे स्मार्ट फोन असतातच. यु ट्यूब चॅनेलवर अनेक विषयांवरचे, खास करून छोट्या छोट्या टॉपिक्सवरचे, संकल्पनेवरचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. तेव्हा आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, ज्या संकल्पना आधी समजल्या नाहीत, तो विषय, ती संकल्पना साध्या सोप्या भाषेत उदाहरणांसह ऍनिमेशनसह, प्रात्यक्षिकासह समजून घेता येतात. हा अनुभव गेल्या दोन तीन महिन्यांत मी स्वतः घेतला आहे. आपल्याला किती तरी गोष्टी माहिती नाहीत, आपले अज्ञान किती अगाध आहे, याची जाणीव या उतारवयात का होईना मला झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा देखील सुवर्ण संधीसारखा उपयोग होतो तो असा. ज्या विद्यार्थ्यांना, विज्ञान, इंजिनीअरिंगकडे जायचे आहे, त्यांच्यासाठी तर शेकडो व्हिडीओ उपलब्ध आहेत यु ट्यूबवर. विशेष म्हणजे ते फक्त पंचवीस तीस मिनिटांचे असतात. त्यामुळे कंटाळवाणे नसतात. एरवी आपल्या गुरुजींचे एक तासाचे लेक्चर किती बोरिंग असते (काही अपवाद वगळल्यास) हे आपण सर्वांनीच अनुभवले आहे. येत्या काळात सेल्फ स्टडी, ग्रुप स्टडी, लर्निंग टू लर्न, याचेच महत्त्व वाढणार आहे. हे विद्यार्थ्यांनी, पालकांनी लक्षात घ्यायला हवे.
जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहेत त्यांना पदवी कशी, केव्हा मिळेल, पुढे काय, प्रवेशाचे (उच्च शिक्षणासाठी), नोकरीचे, करियरचे काय, या चिंता आहेत. नुकतेच एका विद्यापीठाने कोविड 19 असा उल्लेख छापून गुणपत्रिका दिल्याची बातमी आहे. ही घोडचूकच म्हटली पाहिजे. तसे पाहिले तर या समस्येची, परिस्थितीची सर्व जगाला, देश विदेशातील विद्यापीठांना, कंपन्यांना, उद्योग समूहांना जाणीव आहे. त्यामुळे 2020 ची बॅच म्हणून वेगळी वागणूक मिळेल असे समजण्याचे काही कारण नाही. उलट मी तर म्हणेन की या बॅचला वेगळी स्पेशल ट्रीटमेंट मिळेल. या बॅचचा स्वतंत्रपणे विचार होईल. तो विचार, निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्याचाच असेल. त्यांचे नुकसान व्हावे असा विचार कुणीही करणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, पालकांनी निश्चित असावे. काळजी केल्याने प्रश्न सुटत नाहीत. काळजी घेतल्याने सुटतात.
राहता राहिला प्रश्न वर्ष वाया जाण्याचा. याही बाबतीत थोड्या मोकळ्या मनाने विचार केल्यास ही काही खूप सिरियसली घ्यावी अशी बाब नाही. अशी संकटे, अशा अडचणी अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात येतात. कधी आर्थिक परिस्थितीमुळे, कधी कौटुंबिक बाबींमुळे, कधी अपघात, आजारपणामुळे आपल्या संधी हुकतात. ग्याप घ्यावी लागते. विलंब सहन करावा लागतो. इथे त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की या समस्येला तोंड देणारे तुम्ही एकटेच नाही. तुमच्या बॅचच्या सगळ्याची समस्या सारखीच आहे. त्यामुळे मीच का, मलाच का अशा संकुचित विचारात अडकण्याची गरज नाही. पुढच्या शर्यतीत सब घोडे एक बराबर अशी परिस्थिती राहणार आहे. शिवाय याही समस्येवर उपाय आहे. आपल्याला खूप सुट्या असतात. त्या कमी नव्हे तर रद्द करता येतील. लर्निंगची पद्धत बदलेल. परीक्षेची पद्धत बदलेल. त्यातून वेळ वाचविता येईल. अधिकचा वेळ द्यावा लागेल. कंटाळा येईपर्यंत सुट्या उपभोगल्या. आता जास्त काम करून वेळ भरून काढता येईल. आपण सर्वांनी परस्परांना विश्वासात घेऊन, परिस्थितीत सहकार्य केले तर आपण ही घसरलेली गाडी रुळावर आणू शकू. हे कठीण असेल पण शक्य आहे. त्यामुळे चिंता नको.
यासंबंधात मला आध्यात्मिक गुरू गौर गोपाळ दास यांचा मंत्र उपयोगाचा वाटतो. तो प्रश्नोत्तर स्वरूपात आहे:
समस्या आहे का?
नाही
मग चिंता कशाला?
समस्या आहे का?
हो.
त्यावर उपाय आहे का?
हो.
मग चिंता कशाची?
उत्तर नाही असले तरी
मग चिंता कशाची?
एकूण साऱ्यांचे सार एकच, काळजी करू नका, काळजी घ्या, स्वतःची, अन् कुटुंबाची.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: ७६५९०८४५५५
ईमेल: vijaympande@yahoo.com