गेल्या काही महिन्यात आलेल्या आनंदवन विषयीच्या बातम्या, तत्पश्चात याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सेवा व्रती डॉ.शीतल यांची आत्महत्या हे सारे सुन्न करणारे आहे. सामान्य, सुशिक्षित माणसाच्या विचारांना बधिर करणारे आहे. डॉ.बाबा आमटेंचे आनंदवन म्हणा किंवा डॉ.अभय/राणी बंग यांचे गढचिरोली तील सर्च संस्था म्हणा, ही प्रकाशाची बेटे आहेत. मराठी माणसाने या प्रकल्पाकडे केवळ आदराने पाहिले नाही, तर या व्यक्ती देवासारख्या पूजल्या आहेत. ही अतिशयोक्ती नाही. त्यातही डॉ.बाबा आमटेंच्या कुटुंबातील एक दोन नव्हे तर तिसऱ्या पिढी त्यातही मुली, सुना या सुद्धा हा वसा त्याच निष्ठेने, यशस्वी पणे पुढे चालवतात, इतरांसारखे सुख सोयीच्या मृगजलामागे न धावता समाजसेवेसाठी या ग्रामीण भागात स्वतःला झोकून देतात, हे कौतुकास्पद तर आहेच, पण आश्चर्य देखील आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यातील घटनांमुळे, अन् त्या घटनांचा कळसाध्याय म्हणता येईल अशा या आत्महत्येच्या दुःखद बातमीमुळे मराठी समाजमनावर तडा गेला आहे.
इथे आपल्याला या कुटुंबाच्या अंतर्गत कलहात पडायचे नाही. शेवटी आपण सगळेच माणसं आहोत. स्खलनशीलता हा माणसाचा धर्म. अगदी गांधीजींनी किंवा तत्सम त्या काळातील महापुरुषांनी देखील आपल्या चुका कबूल केल्या आहेत. डॉ.आमटे, डॉ.बंग या पती पत्नी ना या व्रत साधनेच्या प्रवासात त्रास झालाच. ज्ञानेश्वर, तुकाराम सारखे संत महंत, सॉक्रेटिस सारखे तत्वज्ञ, या सर्वांना त्रास झालाच. पण ही सर्व थोर मंडळी या अग्नी परीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडली. हे असीधारा व्रत सोपे नसते. ते अग्नी परिक्षे पेक्षाही कठीण असते.
डॉ.बाबा आमटेंच्या काळातील परिस्थिती (सामाजिक, आर्थिक, राजकीय), अन् आताची तिसऱ्या पिढी समोरची परिस्थिती यात जमीन आसमान ची तफावत आहे. शहरेच नव्हे तर खेडी सुद्धा आरपार बदलली आहेत. अपेक्षा सुद्धा त्या अनुषंगाने बदलल्या आहेत. गरीबी, अनारोग्य, निरक्षरता या समस्या तशाच असल्या तरी त्या समस्यांचे रंगरूप ते तसेच नाही. ते आता आरपार बदलले आहे. सरकारी राजकारण सुद्धा बदलले आहे. त्यामुळे समाजसेवेच्या क्षेत्रात देखील त्याच जुन्या पद्धती, जुन्या मनोवृत्ती चालणार नाहीत. हे मान्य करायलाच हवे. आजच्या काळात गांधी नेहरूंचे तत्व, विचार देखील टिकले नाहीत. एरवी त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रीय पक्षाची अशी दुर्दशा झाली नसती! तो विषय अर्थातच वेगळा.
समाजसेवेच्या बाबतीत केवळ उद्दिष्ट भव्यदिव्य, उदात्त असून चालत नाही. त्यासाठी अवलंबिलेले मार्गही तितकेच योग्य, सर्वसमावेशक, ऑप्टिमम, सद्य परिस्थितीला अनुकूल असणे गरजेचे आहे. डॉ.बाबा, साधनाताई हे सर्व सुशिक्षित असले तरी त्यावेळचे शिक्षण, ती वैचारिक जडणघडण अन् आताचे तिसऱ्या पिढीचे तांत्रिक शिक्षण, कॉर्पोरेट कल्चर, आताची बदललेली नैतिक जडणघडण सर्वार्थाने भिन्न असणार. हा नव्या जुन्याचा, पिढी पिढीतील संघर्ष आपण घराघरात पाहतो. त्यातून ठिणग्या उडतात. आगीचा भडका उठतो. वाद प्रवाद, चक्क मारामाऱ्या देखील होतात. तिथे मग रक्ताचे नाते देखील मागे पडते. माणसाला असे प्रकल्प यशस्वीपणे राबवायचे असतील तर कुठे किती ताणायचे, कुठे स्वतःला मुरड घालायची, कुठे आग्रही राहायचे, कुठे एक पाऊल मागे घ्यायचे, हे विवेकी आकलन असले पाहिजे. आपण घराबाहेरचे, समाजातले प्रश्न सोडवू, काही ना काही मार्ग काढू, पण आपल्याच घरातले प्रश्न कधीकधी आपल्याला सोडविता येत नाहीत. कारण बाहेरची समस्या, घरचे गुंते यात फरक असतो. दोन्हीकडे एकच पद्धत चालणार नाही. डॉक्टर कितीही निष्णात सर्जन असला तरी तो स्वतः वर शस्त्रक्रिया करू शकत नाही!
आपण जेव्हा समाजसेवेचा वसा घेतो तेव्हा फक्त वैचारिक त्रिज्या विस्तारून उपयोगी नाही. अनेक पदव्या असल्या, कौटुंबिक वारसा असला म्हणजे आपल्याला इतरांपेक्षा खूप काही अधिक समजते, आपल्याला सर्व अधिकार आहेत, असेही नाही. वैचारिक त्रिज्ये बरोबरच आपली मानसिक, भावनिक, आध्यात्मिक कक्षा विस्तारणे जास्त गरजेचे असते. किंबहुना कधी कधी तेच परिमाण जास्त मोलाचे, महत्वाचे ठरते. आपले विचार, आपली पद्धत आपल्याला कितीही योग्य वाटली तरी ज्यांच्या करिता आपण ती राबवतो, त्यांना ती कितपत मान्य आहे, स्वीकारार्ह आहे, हे आधी तपासले पाहिजे. समाजकार्याच्या बाबतीत तुम्ही कितीही विद्वान असा, उच्चपदस्थ असा, मेरे मुर्गी की एकही टांग, किंवा मी म्हणेन तीच पूर्व दिशा हा अट्टहास कुचकामी ठरतो.
कौटुंबिक वादाबद्दल बोलायचे तर ते वाद चिघळायचे मुख्य कारण असे की तडे दिसायला लागले तरी आपण वेळीच जागरूक होत नाही. समस्या आहे हेच मान्य करीत नाही. समोरासमोर बसून शांतपणे चर्चा करीत नाही. वैचारिक देवघेव, सुसंवाद होत नाही. मग हे वाद नवरा बायकोतले असो, भावा बहिणीतले असो, की मुले अन् आई वडीलातले असो, संवादाची अनेकांना भीतीच वाटते. आपण निगेटिव्ह विचार जास्त करतो. अशा चर्चा यशस्वी व्हायच्या असतील, तर बोलण्या बरोबर ऐकून घेण्याची सवय हवी. आपल्या बरोबर दुसऱ्यांच्याही मतांचा सन्मान करणे, त्याचेही काही ना काही बरोबर असू शकते हे मान्य करणे, वेळ प्रसंगी एक पाऊल मागे घेण्याचे लवचिक धोरण स्वीकारणे तितकेच गरजेचे असते. दोन्ही पक्ष दुराग्रही, हट्टी धोरण स्वीकारते झाले की, या चर्चेतून चांगले विधायक काही निर्माण होण्याची शक्यता कमी असते. नव्यांना जुनी उदाहरणे पटत नाहीत. जुन्याना नव्यांचे विचार, धोरण, मार्ग योग्य वाटत नाही. हा नव्या जुन्याचा संघर्ष फक्त कुटुंबातच असतो असे नाही. औद्योगिक संस्था, सामाजिक चळवळ, व्यावसायिक क्षेत्र, इथेही हेच बघायला मिळते. सत्ता, पैसा, प्रसिद्धी कुणाला नको असते? प्रत्येकाला हातातून काही निसटू द्यायचे नसते. तडजोडीची तयारी असली, संयम बाळगला, मन मोठे केले, तर प्रश्न गोडी गुलाबीने, सलोख्याने सुटतात देखील! पण विवेक, विचार दोन्ही पक्षी गहाण ठेवला तर मग काही खरे नाही.
या कोरोना च्या आपत्कालीन परिस्थितीत तसेही मानसिक ताणतणाव वाढले आहेत. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अस्थैर्य आहे. अनिश्चितता आहे. अशा वेळी प्रत्येकाने अधिक संयम, विवेक बाळगणे गरजेचे आहे. आता आत्महत्या फक्त शेतकऱ्यांपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. सिने कलाकार, आध्यात्मिक गुरु, विद्यार्थी, वृद्ध, सारेच नैराश्याने ग्रासले आहेत, काही आत्महत्ये चे टोकाचे पाउल उचलताहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरात, घराबाहेर व्यवसायात, कार्यक्षेत्रात, अतिशय जागरूक राहिले पाहिजे. शरीराच्या आरोग्या इतकेच किंबहूना त्याही पेक्षा जास्त, मनाचे (मानसिक) आरोग्य महत्त्वाचे आहे. आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या स्वस्थ नसलो, की आपले शिक्षण, आपल्या पदव्या, आपला पैसा, श्रीमंती, कसलाही काही उपयोग नाही. शिर सलामत तो पगडी पचास, अशी सार्थ म्हण आहे.
समाजातील प्रत्येक घटना, अवती भवती ची परिस्थिती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. विद्यापीठाच्या वर्गातील शिक्षणापेक्षाही हे व्यावहारिक शिक्षण जास्त महत्वाचे. म्हणून आनंदवनाचा हा धडा अभ्यास क्रमा बाहेरचा म्हणून टाळून चालणार नाही. तो प्रत्येकासाठीच सखोल चिंतन मननाचा विषय आहे. आनंदवन हे आपल्या प्रत्येकासाठी प्रकाशाचे बेटच असले पाहिजे. ती फक्त त्या एका कुटुंबाचीच जबाबदारी नाही. डॉ.बाबा आमटे यांचे स्वप्न साकारणे, ते कार्य पुढे नेणं ही आपणा सर्वांची, समाजाची नैतिक जबाबदारी आहे हे विसरता कामा नये.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com