# सरले एकदाचे.. वर्ष कोरोनाचे… -डाॅ.विजय पांढरीपांडे.

एकदाचे सरले हे वर्ष! गेल्या कित्येक दशकात, नव्हे शतकात, एखाद्या वर्षाच्या नशिबी असे दुर्दैव आले नसेल. हे वर्ष संपताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे; संपले एकदाचे हे २०२० वर्ष. पण वर्ष संपले म्हणून त्या वर्षाने जन्माला घातलेल्या समस्या संपलेल्या नाहीत. या समस्यांनी निर्माण केलेले मृत्यूचे भय, भविष्याची चिंता, एकूणच जगण्याविषयीची काळजी, काहीच संपले नाही सध्यातरी.

गेल्या वर्षी एका अभूतपूर्व अशा विषाणू प्रादुर्भावातून उद्भवलेल्या संकटांचा सामना सगळे जग करते आहे. कुणीही यातून सुटले नाही. प्रमाण थोडे बहुत कमी जास्त असेल इथे तिथे. पण मूलभूत प्रश्न तेच. प्रश्नही असे की ज्यांची उत्तरे कुणालाच माहिती नाहीत. जे चालले आहे ते अंदाजावर आधारित निरीक्षण, विवेचन. एक तर्क दुसऱ्या अनुमानाशी जुळणारा नाही. कोणताही निर्णय सर्व समावेशक नाही.

गेली अनेक वर्षे या ना त्या कारणाने आपण निसर्गाची मोडतोड केली. सत्ता, पैसा, उन्माद, द्वेष, अशा अनेक विकृतीने ग्रासलेल्या समाजाने ईश्वर निर्मित नैसर्गिक वातावरणातले मूल संतुलन बिघडवून टाकले. जमिनीतील पाण्याचे शोषण, हवेतील प्रदूषण, जंगलातली वृक्षतोड, एकूणच निसर्ग चक्राच्या गतीशी राक्षसी खेळ खेळून आपण जग नियंत्यालाच आव्हान दिले. त्या वरच्या बापाने देखील वाट पाहिली. ही मानवजात आज सुधारेल, उद्या सुधारेल, या आशेवर त्याने स्वतः वरच नियंत्रण ठेवले. पण आपण कसलेच नियंत्रण, नीतिनियम मानत नाही म्हटल्यावर शेवटी त्यानेही दणका द्यायचे ठरवले. आपल्याला झोपेतून जागे करायचे ठरवले. आपल्या अनिर्बंध स्वैराचाराला ब्रेक लावायचे ठरवले. त्यासाठी त्याने कोरोनाला निवडले. एक सूक्ष्म जीवाणू जो कुठून आला, कुठे गेला, काय करून गेला, कसे, कशासाठी करून गेला, काहीच कुणाला कळले नाही. कळणारही नाही. विज्ञान तंत्रज्ञान वाले संशोधन करताहेत. करू देत. पण सध्या तरी कुठेही कसलेही, यशस्वी म्हणता येईल असे नियंत्रण, नियोजन नाही. निष्कर्ष तर नाहीतच नाही. सर्व जगाला संभ्रमात टाकून स्वतः मात्र हा विषाणू निश्चित आहे. त्याने आपला कार्यभाग साधला आहे. काय होता या विषाणूचा कार्यभाग? काय शिकवायचे होते त्या वरच्या नियंत्याला या दूताच्या माध्यमातून?काय शिकविले या मावळत्या कोरोना वर्षाने आपल्या सर्वांना? हे प्रश्न आज महत्वाचे आहेत. आपण या कोरोना वर्षात जे काही घडले त्या पासून काही धडा घेणार की नाही? स्वतःच्या खाव खाव, हावरट मनोवृत्तीत बदल करणार की नाही? आपण निसर्गाकडे जिव्हाळ्याने बघणार की नाही? आपण पर्यावरणाचा, ऊर्जा संवर्धनाचा, नैसर्गिक संतुलनाचा, आता तरी गामभीर्याने विचार करणार की नाही? हे प्रश्न सरते कोरोना वर्ष आपणा सर्वानाच विचारते आहे. या प्रश्नांची उत्तरे पुढील काही वर्षांत, तत्परतेने, गांभीर्याने द्यावी लागतील. फक्त विचाराने नव्हे तर आचाराने, कृतीने द्यावी लागतील. मानव जातीने यापूर्वी अनेक भीषण संकटांचा, आपत्तीचा, सामना केला आहे. महायुद्धाचे नर संहार पाहिले, अणूबॉम्ब विस्फोटाने शहरे, लाखो माणसे राख झालेली पाहिली. महामारीच्या प्रादुर्भावाने, दहशतवादी हल्ल्याने, नैसर्गिक प्रकोपाने झालेले मृत्यूचे तांडव, मालमत्तेचे नुकसान, अन् त्यानंतर आलेले सामाजिक, आर्थिक अपंगत्व आपण अनुभवले आहे. पण तरीही आपण त्या पासून काही शिकलो असे दिसत नाही. चंगळवाद थांबला नाही. सत्ता संघर्ष कमी झाले नाहीत. वंशवाद, जाती धर्माचे वाद संपलेले नाहीत. वर चढायचे तर दुसऱ्या चे पाय खेचलेच पाहिजेत, त्याच्या खांद्यावर चढून त्याला पाडलेच पाहिजे, ही आपली मनोवृत्ती.स्वतःचे राज्य, आपला देश, आपले घर, आपली माणसे, यापेक्षा आपला स्वार्थ महत्वाचा मानला पाहिजे. त्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याची तयारी केली पाहिजे, अशा विकृत अविचारी पायावर आपला डोलारा उभा आहे. ही पाया भरणीच मुळात ठिसूळ असेल तर वरची इमारत कितीही उंच, मजबूत असली, भासली तरी ती कधीतरी कोसळणारच. या कोरोना वर्षात ती अशीच कोसळली आहे. हे जगाच्या मनोऱ्याचे कोसळणे, त्या अमेरिकेच्या दोन उंच टॉवरच्या कोसळण्या पेक्षाही भयानक आहे. हिरोशिमा जपानच्या अणू संहारापेक्षा ही भयावह आहे.
आपण कितीही पैसा कमाविला, कितीही पदव्या मिळवल्या, कितीही घर भरले, तरी एक वेळ अशीही येते, की हे सारे वैभव, ही श्रीमंती, ही बुद्धीमत्ता, सारेच निरर्थक ठरते. कुचकामाचे ठरते, जसे या सरत्या वर्षात ठरले आहे. शिक्षण, दळणवळण, संवाद, भेटीगाठी, नातीगोती, सगळीच देवघेव ठप्प पडली होती गेले कित्येक महिने! आठवड्याचा बसचा, रेल्वे चा, बँकेचा संप झाला तर आपण बेचैन होतो. आकाशपाताळ एक करतो. आपण नको तितक्या नको त्या शिव्या मोजतो त्या संप करणाऱ्याच्या नावाने! आता मात्र सर्वांची बोलती बंद. एरवी या ना त्या कारणाने सरकारवर तोंडसुख घेणारे आपण या वर्षी मूग गिळून चूप बसलो. कारण कशाचा काहीही उपयोग नाही हे या सरत्या वर्षाने आपल्याला निक्षून सांगितले.

महिनोन्महिने ऑफिसमध्ये, कामावर न जाणे, शाळा कॉलेज बंद, त्यामुळे अभ्यास, परीक्षेची कटकट नाही. शॉपिंग, बाहेरचे खाणे, हिंडणे फिरणे, पिक्चर, पिकनिक, सारे सारे महिनोन्महिने बंद. व्यवसाय, व्यापार, तेजीमंदी, साराच पांगुळ गाडा. ज्यांचे दोन वेळचे जेवण देखील रोजच्या मोलमजुरी वर अवलंबून, त्या कामगारांची उपासमार, त्यात कुठे दुष्काळ, कुठे अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यावर आलेली अवकळा सारेच चिंताजनक. उत्साहाने घरकाम, किचन, धुणी भांडी साठी सारसावलेले हात मग अती झाले तेव्हा घराला आलेले वैताग वाडी चे स्वरूप, छोट्या मोठ्या सर्दी खोकल्यानंतर, दात दुःखी सांधेदुखी नंतर उठल्या सुटल्या डॉक्टरकडे धाव घेणाऱ्यांना, त्याशिवाय ही आपण जगू शकतो हा झालेला नवा साक्षात्कार, जवळचे कुणी गेले तरी आता ना भेट ना सांत्वन, अशा कोरडेपणा ची झालेली सवय. ही या सरत्या वर्षाचीच भेट. स्थलांतरित मजुरांची दैना, घरकाम करणाऱ्या मोलकरणी, अन् पर्यायाने त्यांच्या मालक मालकीणी, यांची झालेली होरपळ हे सुद्धा सरत्या वर्षाचे भरीव योगदान!

या वर्षाने अनेक व्याख्या ही बदलल्या. व्यवहाराच्या, आदान प्रदानाच्या, शिक्षणाच्या, एकूणच कार्य पद्धतीच्या संकल्पना बदलल्या. एक विचार सहज मनात येतो. इंटरनेट नसते, मोबाईल, स्मार्ट फोन, लॅपटॉप नसते, तर खरेच काय झाले असते?ऑफिसचे, मल्टी नॅशनल कंपन्या चे, सरकारी कामकाजाचे, शिक्षणाचे, संपर्क व्यवस्थेचे, काय झाले असते? सगळे ठप्प पडले असते. कामाविना लोक पागल झाले असते! मध्यंतरी काही निवडक नोबेल विजेत्यांनी म्हणे वाद घातला होता. गेल्या शतकांतील सर्व जगावर दूरगामी परिणाम करणारे, जग बदलणारे संशोधन कोणते? याही प्रश्नाचे उत्तर कोरोना वर्षानेच दिले. इंटरनेट, स्मार्ट फोन, लॅपटॉप नसते तर सारे व्यवहार थंड पडले असते. काहीच पुढे गेले नसते. जग वेड्याचा बाजार झाले असते! त्यासाठी आपण त्या शोधकर्त्याचे आभार मानायला हवेत. कोरोना वर्षाने आपल्याला आरोग्य विषयक जागरूक केले. चांगल्या सवयी लावल्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सारखे हात धुणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे हे गरजेचे झाले. यापूर्वी आपण फार निष्काळजी होतो या बाबतीत. डॉ.कलामसारख्या ज्येष्ठ संशोधक तंत्रज्ञानी २०२० वर्षासाठी व्हिजन, मिशन चे संकल्प केले होते. तो जुना अध्याय आता बदललेल्या परिस्थितीत नव्या अंक/शब्द लिपीत आपल्याला लिहावा लागणार आहे. बऱ्याच जुन्या गोष्टी, चालीरीती सोडाव्या लागतील. नव्या संकल्पना, नव्या पद्धती आत्मसात कराव्या लागतील. शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, पर्यावरण, ऊर्जा, सर्व क्षेत्रासाठी नवे पर्याय, नव्या संकल्पना, निवडाव्या लागतील. जुनी वस्त्रे जीर्ण होतात, फाटतात, तेव्हा ती बदलावी लागतात. तसेच हे. या बदलांची सवय होईल आपल्याला हळूहळू. सरते वर्ष कोरोना चे (रोगाचे)होते. आगामी वर्ष कोरोना च्या लसीचे (उपायांचे) असणार आहे. तेव्हा नव्या २०२१ वर्षाचे सहर्ष स्वागत करू या!!!
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *