..ते कॉन्व्हेंट, किंवा इंटर नॅशनल स्कूलमध्ये गेले नसतील, ते जिल्हा परिषद किंवा नगर पालिके च्या शाळेत जमिनीवर, ताडपत्री वर बसून, टाक दौत वापरून शिकले. पण पॉवर पॉईंट, इंटरनेट, वापरून ऑनलाईन शिकणाऱ्या नातवाचे देखील त्यांनी तितकेच कौतुक केले. आठवडी बाजारात घासाघीस करून घेतलेल्या लाकडी खेळण्यापासून ते ऑनलाइन अमेझॉन खरेदी, ई शॉपिंग चा जमाना त्याने अनुभवला. टांगे वाल्याला बंडी च्या खिशातले चार आणे देण्यापासून तर ओला उबर च्या टॅक्सी ड्रायव्हर ला पेटीएम ने बिल पेमेंट करण्या पर्यंत त्यांनी मजल गाठली… काळानुरुप बदलेल्या ज्येष्ठांच मनोवेधक शब्दचित्रं रेखाटलं आहे माजी कुलगुरू डाॅ.विजय पांढरीपांडे यांनी..
अनुभवांनी समृद्ध असलेली माणसं सर्वाधिक श्रीमंत असतात. त्या दृष्टीने बघता आज सत्तरी पार केलेले ज्येष्ठ नागरिक हे सर्वात श्रीमंत म्हणावे लागतील. या वृद्धांनी जीवनाचा फार मोठा स्पेक्ट्रम बघितला आहे. ह्या रंगीबेरंगी अनुभवाच्या कडुगोड संमिश्र आठवणी त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी जीवन सर्वार्थानं जगल्याचं समाधान निश्चितच देऊन जाईल. एकसुरी, आळणी, ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य हे तो आला, जगला, अन् गेला, या पठडीतील असतं. या उलट कॅलिडिओ स्कोप मधून दिसणारं रंगीबेरंगी आयुष्य तृप्तीचे समाधान देणारं असतं.
सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्य पूर्वीचा काळ पाहिला.अन् स्वातंत्र्यानंतर चा गेल्या वर्षीचा कोरोना चा काळ पाहिला. हा त्यांचा प्रवास निश्चितच रंजक होता. संस्मरणीय होता. यापैकी काही जणांनी गांधी, नेहरू, सावरकर, आंबेडकर या थोर नेत्यांना पाहिले, ऐकले असेल. निजामाची हुकूमशाही पहिली असेल. स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला असेल. स्वातंत्र्याचा जल्लोष अनुभवला असेल. त्यांनी घोड्यावरून, बैल गाडीतून प्रवास केला असेल. खेड्यापाड्यात, जंगलात पायवाटा तुडवीत मुक्काम गाठलं असेल. त्यांनी चुलीवरचा स्वादिष्ट स्वयंपाक चाखला असेल. स्टोव्ह वरच्या चहाचा आस्वाद घेतला असेल. कोळशाच्या शेगडीवर शिजलेला मऊमऊ भात देखील खाल्ला असेल. ते कंदिलाच्या प्रकाशात जेवले असतील. त्याच मंद प्रकाशात त्यांच्या मुलांनी अभ्यास केला असेल. पंधरा-वीस जणांचं एकत्र कुटुंब, एकत्र खाणं पिणं, खेळणं, मिळून मिसळून साजरे केलेले सण, उत्सव. गणपतीची सजावट, सायंकाळचं भजन, मनोरंजनाचे घरगुती कार्यक्रम, दहीकाला, कीर्तन, सकाळच्या काकड आरत्या, देवळातील प्रवचने. या संस्कृती वर ते जगले. लहानाचे सर्वार्थानं मोठे झाले. लग्न सोहळ्यात एकत्र साजरे केले कुळाचार, मानापमान, रुसवे फुगवे, हसणे, रडणे, वेळप्रसंगी भांडणे देखील!इस्टेटीवरून जमीन जुमल्या वरून होणारी पिढीजात भांडणं ही त्यांनी अनुभवली, अन् कुटुंबातील कुणी गेलं तेव्हा मागचं सगळं वैर विसरून गळा मिठीत ते एकत्र देखील आलेत!पुतण्याला चुलत्यानं शिकवलं, भाचीचं लग्न मामानं लावून दिलं, काकीन विधवा सुनेला सांभाळून घेतलं, असे जुन्या सिनेमातले सीन्स कुटुंब व्यवहाराचा एक भाग होऊन गेलेत.
या मंडळींनी भक्ती भावानं आकाशवाणी ऐकली. भूपाळी, भावगीतं, नाट्यसंगीत यात ते रमले. बालगंधर्व ते भीमसेन जोशी यांच्या स्वर प्रपातात ते यथेच्छ चिंब भिजले. गजानन वाटवे, मालती पांडे, पु.ल., अत्रे, सुधीर फडके, राजा परांजपे, माडगूळकर, भावे, फडके, खांडेकर, आपटे ते थेट दळवी, नवरे, कुसुमाग्रज.. किती नवे घ्यावीत?साहित्य, नाटक, संगीत, नृत्य अशा बहुरंगी होळीत ते आकंठ भिजले. तृप्त झाले. रेडिओ समोर उदबत्ती लावून त्यांनी गदिमा, सुधीर फडके यांचे गीत रामायण ऐकले! टीव्ही वरील रामायणाच्या कितीतरी आधी! रेडिओ सिलोन चे भुले बिसरे पुराणे फिल्म संगीत, सकाळी सात सत्तावन ला सैगल च्या गाण्यां ने संपणारी मैफिल, बिनाका गीतमाला, दूरदर्शन चा चित्रहार, शनिवारी रविवारीच दाखवले जाणारे मोजके चित्रपट हीच त्यांची मनोरंजनाची व्याख्या. दिलीप मोठा की राजकपूर, लता की आशा श्रेष्ठ यावर वाद घातले. गुलाम अली च्या गजला ऐकण्यासाठी ते पानाच्या ठेल्यावर तासन्तास रेंगाळले. जगजीत चित्रा सिंग लाही त्यांनी डोक्यावर घेतलं. अन् अगदी अलीकडे संदीप खरे, सलील कुलकर्णी च्या आयुष्यावर बोलू काही च्या हाकेला ओ द्यायला ते नातवा बरोबर, लेकी सुना बरोबर गर्दीत पुढे जाऊन बसले!
ते कॉन्व्हेंट, किंवा इंटर नॅशनल स्कूलमध्ये गेले नसतील, ते जिल्हा परिषद किंवा नगर पालिके च्या शाळेत जमिनीवर, ताडपत्री वर बसून, टाक दौत वापरून शिकले. पण पॉवर पॉईंट, इंटरनेट, वापरून ऑनलाईन शिकणाऱ्या नातवाचे देखील त्यांनी तितकेच कौतुक केले. पाच पैशाच्या पोस्ट कार्डा पासून, इमेल, व्हाट्सअप पर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रवास त्यांनी पाहिला. आठवडी बाजारात घासाघीस करून घेतलेल्या लाकडी खेळण्यापासून ते तर ऑनलाइन अमेझॉन खरेदी, ई शॉपिंग चा जमाना त्याने अनुभवला. टांगे वाल्याला बंडी च्या खिशातले चार आणे देण्यापासून तर ओला उबर च्या टॅक्सी ड्रायव्हर ला पेटीएम ने बिल पेमेंट करण्या पर्यंत त्यांनी मजल गाठली. त्यानी आवडीने झुणका पिठलं, भाकर खाल्ली, सणा सुदीला पुरण पोळी, श्रीखंड पुरी वर ताव मारला, अन् आता नातवाच्या वाढदिवसाला पिझा बर्गर नूडल्स, त्याच आवडीने गोड मानून घेतले! नऊ वारी पासून सुरू झालेला प्रवास, मॅक्सी, मिडी, बरमुडा पर्यंत सहज येऊन पोहोचला. त्यांनी सगळं काही पचवले, रुचले ते, न रुचले तेही!
त्यांनी अर्नाळकर, गुलशन नंदा आवडीने वाचले, चांदोबा ची पारायणे केली. पु ल च्या वाऱ्यावरच्या वरातीत ते नाचले, भरभरून हसले. त्यांनी दादा कोंडके ना पाहिलं, लक्ष्या ला डोक्यावर घेतलं. बाल गंधर्वाना पाहिलं, ऐकलं, वसंत राव देशपांड्यानं दाद दिली, तशीच राहुल महेश काळे यांच्या जुगलबंदी ला, फ्युजन ला डोक्यावर घेतलं. त्यांनी जीए ची पुस्तकं वाचली, ग्रेस च्या कविता सुचवल्या अन भटा च्या गजल शायरी ला सुद्धा तशीच दाद दिली. रणजित देसाई, विश्वास पाटील, इनामदार, पुरंदरे, सगळ्यांच्या इतिहासात ते रमले, रंगले.
मधुबाला पासून माधुरी, ऐश्वर्या, दीपिका च ही कौतुक केलं. राजकपूर इतकंच रणबीर लाही डोक्यावर घेतलं. इतकंच काय सुशांत च्या आत्महत्येनं (?) ते हळहळले देखील! त्यांनी गांधीजी नेहरूंची काँग्रेस पहिली. जयप्रकाश जी चं आंदोलन, आणीबाणी तली मुस्कटदाबी, जनता दलाचे राजकारण अन् आताच्या खिचडी सरकार चा कारभार, सारं अनुभवलं एकाच जन्मांत.
खलिस्तानची चळवळ, बंगाल चा नक्षलवाद, बाबरी अयोध्या आंदोलन, नोटबंदी, अन् आता कोरोना, शेतकरी आंदोलन.. भारतीय राजकारणातली ही सारी स्थित्यंतरं त्यांनी याची देहा याची डोळा पहिली. भूदान चळवळ, गांधीवध, मुंबईचे बॉम्बस्फोट, गुजरातची दंगल, जम्मू काश्मीर ची धगधग, एक छत्री सरकार, त्रिशंकू सरकार, सगळ्याच बऱ्या वाईट प्रयोगाचे ते साक्षीदार. सोळा अणे एक रुपया या कोष्टकापासून ते पावकी दिडकी चे पाढे पाठ असलेली ही पिढी आता परदेशात असलेल्या मुला मुली कडे बेबी सिटिंग साठी गेल्यावर युरो, डॉलर्स चे विनिमय दर देखील सहज आत्मसात करती झाली!ब्लॅक अँड व्हाईट च्या टीव्ही आधी बुश रेडिओ चा जमाना पाहिलेली ही मंडळी आता शेकडो वाहिन्यांच्या चॅनेल्स मध्ये सहजतेने गुंतून गेली. लग्नात आचार्यांचा स्वयंपाक, रांगोळी घालून पाटावर चांदीच्या ताटातल्या उदबत्ती च्या घमघमाटा तल्या पंगती ते शेकडो स्टाॅल्स असलेली बुफे ची फाईव्ह स्टार डिनर्स, त्यांनी चवीने एन्जॉय केली.
पन्नास रुपये पगार, पाच हजारात लग्न, दोन चार आणे सिनेमा, इथपासून तर मुला मुलीचे लाखोंचे वार्षिक पॅकेज, ग्रीन कार्ड, करोडो चे बंगले, फार्म हाऊस ची चैन, नातवाच्या लाखोंतल्या शाळेच्या फिज, त्यांचे महागडे वाढदिवस हे सारे बदल या पिढीने सहज आत्मसात केले. अन् आता लाॅकडाऊन मध्ये घर कैदी झालेली कुटुंब, जवळच्याचे मृत्यू, शेवटाला न जाण्याचे दुःख, नात्यातली अगतिकता हे ही त्यांनी तितक्याच सहजतेने पचवले. त्यांच्या साठी सगळेच दिवस मंतरलेले, तेही अन् हेही!पोस्टकार्ड, टेलिग्राम च्या जमान्यातील ही मंडळी आता इमेल, व्हाट्सअप, व्हिडीओ कॉल यात तितकीच रमली. हेही कमी होतं म्हणून आता आयुष्याच्या संध्याकाळी घराचे पिंजरे सुनसान रस्ते, बाहेरची भयाण शांतता, मुलांच्या चेऱ्यावरची काळजी, नोकरी जाण्याची भीती, गाड्या, बसेस, विमान, सारे बंद. एक देश नव्हे, सारे जग जणू विनाशाच्या उंबरठ्यावर उभे कुणालाच सुचत नाही, समजत नाही, काय चाललेय, काय पुढे होणार, इथून जग कुठे जाणार, सारेच अनिश्चित. आधीची दोन महायुद्ध यापुढे काहीच नाही असा विदारक अनुभव!नातवाना सांगितलेल्या महाभारता पेक्षाही भयंकर. एका छोट्या, अज्ञात,अदृश्य विषाणू ने घातलेला धुमाकूळ.ज्या तंत्रज्ञानान गेल्या शतकात अनेक समस्यां सहज सोडवल्या, जीवन सुखावह केलं, त्याच तंत्रज्ञानाला आव्हान देणारा संहार! ज्याची कुणालाच उत्तरं माहिती नाहीत असे प्रश्न. उद्या काय होईल, आलेली लस सुरक्षित असेल की नाही, मुळात आपण उद्या परवा जिवंत राहू की नाही हीच भीती! कुठल्याच समस्येचं, कुणाजवळही उत्तर नसल्याची अभूतपूर्व परिस्थिती या पिढीने पहिली, सहन केली. पण या पिढीची श्रद्धा आहे. त्यांचा सात आठ दशकांचा अनुभव सांगतोय, समजावतोय.. हेही दिवस जातील. हे व्हायलाच हवं होतं. माणसे जेव्हा स्वत्व विसरून अधांतरी तरंगायला लागतात, निसर्गाशीच क्रूरपणे खेळायला लागतात, हातचं सोडून पळत्याच्या मागे धावतात, तेव्हा त्यांना असा दणका हवाच असतो. सत्तेची हवा डोक्यात जाऊन माणुसकी विसरायला लागलेल्या माणसाला, हा धक्का गरजेचा असतो. हे या पिढीला उमजल्याने त्यांनी सारे बदल सहज स्वीकारले. अवकृपा म्हणून नव्हे तर देवकृपा म्हणून त्याकडे पाहिले. जे महाभारतात श्रीकृष्णाने केले तेच या कलियुगात या कोरोना ने केले. या पिढीला वाटते. या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे!
ऐंशी नव्वदी तले हे सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणूनच खरे भाग्यवान. त्यांनी जीवन म्हणजे काय हे तर अनुभवलेच पण आयुष्याच्या संध्याकाळी जिवंतपणी। मरण म्हणजे काय हेही पाहिले! त्यांना चांगले ठाऊक आहे-Tragedy of life is not death, but what we let die inside of us, while we live!म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या या पिढीला श्रीमंत नव्हे गर्भश्रीमंत म्हटले पाहिजे.
-डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com