# कोरोना वर्षाची चांगली बाजू -डॉ.विजय पांढरीपांडे.

आता कोरोना च्या आगमनाला वर्ष पूर्ण झाले आहे. संपूर्ण जगाला एक आगळावेगळा अनुभव, हादरा देणाऱ्या या विषाणूमुळे जो हाहाकार मजला, त्रास झाला, आर्थिक शैक्षणिक नुकसान झाले त्यावर बरेच लिहून झाले, चर्चा झाली. पण या कोरोना ची जमेची बाजू देखील आहे. त्याचे काही फायदे ही आहेत. त्या चांगल्या बाजू सांगताहेत माजी कुलगुरू डाॅ.विजय पांढरीपांडे…

करोना मुळे सगळे व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊन मुळे लोक घरात अडकून बसले. दळणवळण बंद झाले. त्यामुळे डिझेल पेट्रोल ची किती तरी बचत झाली. प्रदूषण कमी झाले. ऊर्जेची बचत झाली. कार्यालयातली विजेची बचत झाली. शाळा कॉलेज, विद्यापीठ बंद असल्याने कागदाची बचत झाली. सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झाल्यामुळे शाई, फाईल्स, स्टेशनरी कागद याचा वापर कमी झाला. अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचा फायदा झाला. एरवी शाळा कॉलेज ची परीक्षा, प्रश्न उत्तर पत्रिका यावर कितीतरी खर्च होतो. तो वाचला. आपली अनावश्यक खरेदी कमी झाली. एरवी उठसूठ मॉल मध्ये जाणे, कपडे, जोडे, प्रसाधने अशा कितीतरी वस्तू गरज असो वा नसो, आपण खरेदी करीत होतो. कपाटे भरीत होतो. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असेल पण सामान्य नागरिकांना फायदाच झाला. एवढेच नव्हे तर या सगळ्या वस्तू गरजेच्या नसतांना आपण त्यावर अनावश्यक खर्च करीत होतो हे शहाणपण आले. ते कितपत टिकते हा भाग वेगळा! आपण उठल्यासुटल्या डॉक्टरकडे जायचो. वेगवेगळ्या टेस्ट करायचो. तेही थांबले. पण त्यामुळे फार काही बिघडले नाही. काही गंभीर, टोकाचे आजार सोडले तर हाही खर्च टाळता येतो हे समजले.

आपल्या मूलभूत गरजा फार कमी आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत, कपडालत्याच्या फॅशन च्या बाबतीत, मुलांचे हट्ट पुरविण्याच्या बाबतीत आपण सढळ हाताने खर्च करीत होतो. या खर्चात कितीतरी बचत झाली. पार्ट्या बंद झाल्या. कितीतरी वेळ अन् पैसा खर्च व्हायचा, तो अनावश्यक होता हे कळले. अनेक मल्टी नॅशनल आय टी कंपन्यांचे कर्मचारी घरून काम करायला लागले. त्यामुळे त्यांच्या गगनचुंबी एसी इमारती ओस पडल्या. ते मोठमोठाले कॅम्पस फारसे गरजेचे नाहीत हेही समजले. अनेक देशात अशा इमारतींचा उपयोग रहिवासी कॉलनी साठी करणार असल्याचे कळते. या इमारती साठी करोडो रुपयांचा खर्च झाला. तेवढी जमीन व्यापली. शिवाय कॅम्पस च्या देखभालीसाठी प्रचंड खर्च. वीज पाणी हा खर्च वाचला. शिवाय कर्मचाऱ्याचा प्रवासाचा वेळ, इंधन खर्च वाचला तो वेगळाच. ही बचत संपूर्ण देशात करोडो रुपयांच्या घरात असणार.

या काळात आपण सर्व घरात एकत्र राहिलो. एरवी छोटी मुले शाळेतून आल्यावर आईवडिलांची वाट बघत बसायची. आता सगळेच घरी. चोवीस तास सहवास. बायको नवऱ्याची वाट बघते आहे, नवरा बायकोची वाट बघतोय, अन्न गार होतेय, सगळे आपापल्या सवडीने जेवताहेत हे तळले. आता चोवीस तास एकमेकांची तोंडे पाहणे सहज सुलभ झाले. त्यातून वेगळे प्रश्न निर्माण झाले हे खरे.आता मुलांना कधी एकदाचे शाळा कॉलेज सुरू होतात असे झाले. नवरा बायको यांनाही कधी ऑफिस ला जातो, मित्र मैत्रिणींना भेटतो असे झाले. या सगळ्या चे महत्त्व कळले.

माणसाच्या बौद्धिक अहंकाराला वेसण घातली या कोरोनाने. जगात अनेक प्रश्न आहेत ज्यावर तडकाफडकी, सहजसोपे उत्तर शोधणे कठीणच नव्हे तर असंभव आहे हा साक्षात्कार झाला माणसाला. एरवी चंद्र मंगळावर जाऊन पोहोचलेले विज्ञान, रडार, मिसाईल्स, सॅटेलाईट, यामागचे अत्याधुनिक तंत्रज्ञान या सूक्ष्म जीवाणूंच्या प्रभावापुढे हतबल झाले. निष्प्रभ ठरले. विषाणू आला कुठून, त्याचा प्रभाव किती, नेमका धोका किती, कुणाला, त्यासाठी उपाय योजना काय, दक्षता काय घ्यायची, हे सगळे निर्णय घेताना डॉक्टर, शास्त्रज्ञ, अधिकारी, मंत्री, राज्यकर्ते सगळ्याची तारांबळ उडाली. निर्णय अंगलट येण्याची प्रत्येकाला भीती वाटू लागली. एरवी तडकाफडकी धडाडीने निर्णय घेणारे अधिकारी, मंत्री, बुद्धीवान यावेळेस निष्प्रभ ठरले. त्यांची कुवत दिसून आली. एकूणच आपली मर्यादा आपल्या ला कळली. हाही एक फायदाच.

प्रवासात कपात झाल्याने अनेक कार्यालयात टीएडीए च्या खर्चात लाखोंची बचत झाली. या सर्व मिटिंग्स घरी बसूनही घेता येतात, निर्णय घेता येतात हे सिद्ध झाले. प्रवासात पैसाच नव्हे तर वेळ खर्च होतो. या काळात असे बरेच मनुष्य तास वाचले. मुलाखती ऑनलाईन झाल्या. तोही खर्च वाचला. पूर्वी किती तरी परिसंवाद व्हायचे. नॅशनल, इंटर नॅशनल, सेमीनर्स, वर्कशॉप, व्हायचे. त्यासाठी महागडी हॉटेल्स, तिथला राहण्याचा, खाण्या पिण्याचा लाखो रुपयांचा खर्च. त्याचे फलित काय हा भाग वेगळा. पण आता हेच आभासी पद्धतीने कमी खर्चात शक्य झाले. काही महिन्यांपूर्वी अनेक देशातील अनेक मराठी साहित्य प्रेमीनी देखणे मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित केले. अनेक मान्यवरांची दर्जेदार भाषणे, सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रम झाले. एरवी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या साहित्य संमेलनात गोंधळ अन् वादच जास्त. पण हे नाविन्यपूर्ण संमेलन घर बसल्या लाखो लोकांनी जगभरातून एन्जॉय केले. फारसा पैसा खर्च न करता केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तरुण हे सहज साध्य आहे हे सिद्ध झाले.

आपली आरोग्य सेवा अशा आपत्कालीन परिस्थिती चा सामना करण्यास किती असमर्थ, तुटपुंजी आहे हेही कळले. अनेक बाबतीत सरकारी धोरणे बदलणे गरजेचे आहे, आपले नियोजन चुकीचे आहे, आपले भविष्या संबंधीचे अंदाज कसे चुकीचे आहेत हेही सिद्ध झाले. एका देशातलेच नव्हे तर सर्वच देशातील सरकारे, शासन यंत्रणा यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अमुक एक देश महासत्ता, सुसंपन्न, सर्व श्रेष्ठ असे काही नाही. उलट सर्वच देश एकमेकांवर अवलंबून आहेत, अशा परिस्थिती चा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य गरजेचे आज हेही आपण शिकलो. कुणीच स्वतःला अती शहाणे समजू नये, आपण एकाच बुडत्या बोटीचे प्रवासी आहोत, हे कोरोना ने आपल्याला ठणकावून सांगितले.
माणुसकीचे वेगळे दर्शन गेल्या वर्षात आपल्याला झाले. काही मोजके अपवाद वगळले तर माणसे माणसांच्या मदतीसाठी धावून पुढे आली. जे काही करता येणे शक्य होते ते त्यांनी चांगुलपणा ने केले. मोलमजुराचा प्रश्न असो की स्थलांतरित कामगाराचा, सगळे आपापल्या परीने मदतीचा हात घेऊन पुढे आले. स्पर्शाने शक्य नसेल तरी शब्दांनी आधार देणे इंटरनेट, सोशल मीडिया मुळे शक्य झाले. इंटरनेट तर या काळात फार मोठे वरदान ठरले. ऑनलाईन शिक्षण अडीअडचणी वर मात करून शक्य झाले. काही ऍप्समुळे आरोग्य यंत्रणेला घरोघरी पोहोचणे शक्य झाले. सरकारी सुविधा, अनुदान इतर लाभ घरबसल्या देता आले. अडचणी आल्यात पण त्यावर मात करणारी यंत्रणा उभारण्यात आपण सारे यशस्वी ठरलो. अनावश्यक काय, गरजेचे काय, फायद्याचे काय, तोट्याचे काय हे कुठल्याही क्लासला न जाता समजले. ट्युशन क्लासला न जाता देखील अभ्यास करता येतो हे ज्ञान पालक विद्यार्थ्यांना झाले.
लग्न समारंभातला पार्ट्यातला अवाढव्य खर्च, कमी झाला. एरवी अशा प्रसंगतले मानपान, देणे घेणे, भपकेबाज सजावट, रोषणाई सगळेच बाद झाले. कितीतरी खर्च वाचला. पर्यावरणा चा लाभ झाला तो वेगळाच. कारण या समारंभात खूपसे प्लास्टिक खर्ची जाते. अन्न वाया जाते.

या वर्षात नात्यांची पारख झाली. कोण आपला, कोण परका, कोण जवळचे, कोण दूरचे हे अप्रत्यक्षपणे समजले. पुरुषांना घरातल्या स्त्रियांचे मोठेपण समजले. स्त्रीला पुरुषाची ओळख झाली. घरकामाची सवय झाली. परावलंबन कमी झाले. मुलेही शहाणी झाली. एकदम प्रौढ झाली. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आले. एखादी छोटी शी चूक देखील सर्वांसाठी कशी घटक ठरू शकते ही जाण आली. एरवी आपण फार कॅज्युअल होतो. निष्काळजी होतो. आता जागरूक झालो. समंजस झालो. आधी फक्त स्वतःचाच विचार होता. आता इतरांचा विचार करायला लागलो. आपल्या पेक्षाही दुःखी लोक आहेत, संकट आपल्या एकट्यावर आलेले नाही, सगळे जगच एक महान संकटात अडकले आहे, त्यामुळे आपलेच रडगाणे गाण्यात अर्थ नाही, हे असे खूप काही आपण कोरोना मुळेच शिकलो. ही केवढी मोठी जमेची बाजू. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला हवे. देवळातला देवही सध्या ऑनलाइन आहे. रिकामा आहे. ऐकेल तो आपले..!
-डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *