# ‘अगबाई..’ बबड्या घरा घरातला… -डॉ. विजय पांढरीपांडे.

सध्या कोरोनामुळे घरात लाॅकडाऊन झालेला प्रत्येक जण सायंकाळच्या मालिका निश्चित बघत असणार. एरवी वेळ कसा घालवायचा असा प्रश्न असतो. यातील काही मालिका मनोरंजनाबरोबर प्रबोधन देखील करून जातात. बरेच काही सांगून जातात. संदर्भ आहे, झी मराठी वरील ‘अग बाई सासूबाई’ या मालिकेचा. या मालिकेत बबड्या नावाचं एक पात्र आहे. एक वाया गेलेला उनाड मुलगा. त्याची आई आसावरी. या भूमिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ ही गुणी नटी खूप दिवसानंतर छोट्या पडद्यावर आलीय. कदाचित प्रथमच. ही आसावरी त्या बबड्या चे नको तितके लाड करते. बबड्याला वडील नाहीत. आईनेच त्याला मोठा केलाय. घरी आई व्यतिरिक्त त्याचे आजोबा आहेत. ते आता कोरोना इफेक्टमुळे दिसत नाहीत. गावाला गेलेत. बाबड्याने प्रेमविवाह केलाय. त्याच्या बायकोला (तेजश्री प्रधान) हे लाड पटत नाहीत. पण आपल्या सासूबाई च्या या बबड्या नावाच्या वीक पॉइंट पुढे ती हतबल झालेली दिसते. आपल्याला मालिकेच्या पूर्ण कथानकाशी कर्तव्य नाही. कर्तव्य आहे ते या वाया गेलेल्या, म्हणजे अगदी कामातून गेलेल्या बबड्या शी अन त्याचे नको ते लाड करून, त्याला बिघडविणाऱ्या आईशी!

असा बबड्या प्रत्येक घरात असतो. अन् त्याचे नको ते लाड करणारी, पुत्र प्रेमात आंधळी झालेली आई देखील प्रत्येक घरात असतेच.  आपल्याला या अशा माय लेकरावर बोलायचे आहे. प्रत्येक घरात या बाबड्याचे लहानपणापासून लाड होत असतात. ते शेंडेफळ असले तर विचारायलाच नको. त्याला हवी ती खेळणी घेऊन दिली जातात. खाण्या पिण्याचे, कपड्याचे, लाड होतात. बबड्याचे सर्व हट्ट पुरविले जातात. प्रत्येक शब्द झेलला जातो. ह्यात आघाडी वर असते आईच. बाबांनी थोडे कडक धोरण स्वीकारले तर त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जातात. वडीलांपासून अनेक गोष्टी लपविल्या जातात. बबड्याचे इथेच फावते. तो आईला ब्लॅकमेल करायला लागतो. याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. हा बबड्या नवसाचा असेल तर मग विचारायलाच नको. नवसाच्या मुलाची किंमत काही औरच असते आईसाठी. त्याला थोडे जरी खरचटले तरी ती कळवळते. जखमा बबड्याला पण वेदना आईला होतात. त्याने नीट खाल्ले नाही तर ती अस्वस्थ होते. त्याला जबरदस्तीने भरवते. त्याला हवे ते खायला करून देते. तो बरेच वाया घालवतो. त्याला तातातल्या अन्नाची किंमत नसते. प्रेमानं आईनं केलेलं, वाढलेलं, तो ताटात टाकून देतो, वाया घालवतो. ते उरलेलं अन्न त्याची आई खाते, आनंदानं, पोटच्या पोरावरच्या मायेनं.

बबड्या जसजसा मोठा होतो, तसे त्याचे रंग बदलायला लागतात. तो चेकाळल्यासारखा वागतो. आईकडून सारखे पैसे उकळतो, पॉकेट मनीच्या नावाखाली. त्या पैशाचा त्याला कुणी हिशेब विचारीत नाही. वडिलांनी कधी काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. लपवाछपवी केली जाते. आई बबड्याला नेहमीच सांभाळून घेते, पदराखाली घेते. बबड्याचे चांगलेच फावते. तो मुजोर होतो. बेफिकिरीने वागतो, उलटी उत्तरे देतो. त्याला जबाबदारीची मुळीच जाणीव नसते. आपल्याला हवे ते मिळविण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अन् तो मी मिळवणारच असा त्याचा बाणा असतो. बबड्याला फक्त आपला अधिकार कळतो. पण जबाबदारीची, कर्तव्याची मुळीच जाणीव नसते. ती जाणीव करून देण्याची गरज प्रेमात आंधळ्या झालेल्या आईला भासत नाही.

बबड्याचे उद्योग आईच्या ध्यानात येतात. तिला इकडून तिकडून समजतात. घरातील इतरांच्या कानावरही जातात. बबड्या उघडा पडतो. पण प्रत्येक वेळी आई त्याच्यावर आपल्या पदराचे पांघरूण घालते. बबड्याची आई एकटीच किल्ला लढवते. आपल्या नादान, वाया गेलेल्या, उनाड, पोरासाठी, ती वाईटपणा घेते. आपल्या नवऱ्याशी, सासुसासऱ्यांशी, शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी भांडते. नेहमी बाबड्याचीच बाजू घेते. तिच्यासाठी तोच खरा असतो, सर्वस्व असतो. तो चुकतोय हे माहीत असूनही ती त्याला सांभाळून घेते, संरक्षण देते. आईच्या या प्रेमाचा, लाड कौतुकाचा बबड्या नको तितका फायदा घेत राहतो. त्याला वाईट सवयी लागतात. तो वाईट संगतीच्या नादी लागतो.

बबड्या अभ्यासात कधीच हुशार नसतो. शाळा कॉलेजातही खोटेपणा करतो. तो पालकांच्या खोट्या सह्या करतो. कॉलेजची तक्रारीची पत्रे बाहेरच्या बाहेर गहाळ करतो. परीक्षेत कॉपी करतो, गुण पत्रिकेत फेरफार करतो. क्वचित एखाद्या बबड्याला कशीतरी पदवी मिळाली, कशीतरी नोकरी मिळाली, तर तिथेही तो आपले गुण उधळतो. फसवाफसवी करतो. पैशाची अफरातफर करतो. त्याचे असले उद्योग देखील त्याच्या आईलाच निस्तरावे लागतात. ती कधी कधी हैराण होते, हतबल होते. पण तिचा नाईलाज असतो.

हा बबड्या एखाद्या मुलीला देखील पटवतो. खोटी आमिष दाखवतो. बबड्याच्या आईसारखीच ही तरुण मुलगी देखील प्रेमात आंधळी झालेली असते. तीही फसते. लग्न झालेल्या, अर्धेच वाया गेलेल्या बबड्याचे नाटक संपता संपत नाही. आता घरात बबड्यावर प्रेम करणारी आंधळी आई अन नव्यानं आलेली सून असा नवा संघर्ष सुरू होतो. बबड्याच्या बायकोला जसजसे त्याचे उद्योग कळतात तशी ती बावरते, सावरते, जागी होते. पण तेव्हा उशीर झालेला असतो. ती घरात एकटी अलग पडते. बबड्याचा प्रेमविवाह तसाही कुणाच्या मनी नसतो. बबड्याच्या डोक्यावर नेहमीच त्याच्या आईचा वरदहस्त असतो.

अशा प्रत्येक घरातील उनाड, कामातून गेलेल्या बबड्याच्या आईला मूर्ख म्हणण्याची कुणाचीच हिंमत नसते. आई कधीच खोटी नसते. मातृ देवो भव. आई तर देवाचेच दुसरे रूप असते. बबड्या, तिन्ही जगाचा स्वामी झाला तरी आईविना भिकारी असतो. श्याम कसाही असो, श्यामची आई खरीच असते. हा बबड्या फक्त आपल्या आईवडिलांना, बायकोलाच फसवत नाही, लुटत नाही. हा छोटा बबड्या आपल्या शिकल्या सवरलेल्या, स्थिरावलेल्या, कमावत्या मोठ्या भावाचेही लचके तोडतो. त्यांची परिस्थिती चांगली असणे हा त्यांचा गुन्हा आहे, पर्यायाने बबड्याला मदत करणे, पोसणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, त्यांनाही लुटणे, हा बबड्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. हे मत फक्त बबड्याचेच नसते, तर त्याच्यावर आंधळे प्रेम करणाऱ्या, स्वतः उन्हाचा ताप सहन करून, त्याच्यावर सावली धरणाऱ्या, त्याच्या माऊलीची सुद्धा हीच ठाम समजूत असते. प्रत्येक घरातील या वाया गेलेल्या बाबड्याचा एकच मंत्र असतो: हम नही सुधरेंगे!!

..तर मंडळी सावधान. हा बबड्या फक्त ‘अगबाई सासूबाई’ या मालिके पुरताच मर्यादित नाही. तो घराघरात आहे. तुमच्याही घरात असेल एखादा बबड्या. प्रश्न मुळात बबड्याचा नाहीच. खरा प्रश्न आहे या बबड्याच्या उनाड, खोट्या वर्तनाला खतपाणी घालणाऱ्या, त्याचे फालतू लाड करून त्याला बिघडविणाऱ्या, सर्व काही समजून न उमजणाऱ्या त्याच्या आईचा! या आया सुधारल्या, की बबड्याही सुधारेल आपोआपच…

-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *