टिव्हीवर चॉकलेट ची एक जाहिरात दाखवली जाते. एक युवक चॉकलेट खातोय आरामात बसून. त्याच्या शेजारी काही अंतरावर एक वृद्ध स्त्री बसली आहे. तिची आधाराची काठी तिच्या हातून पडते काही अंतरावर. ती मुलाला विनंती करते बाळ, देतोस का ती काठी? चॉकलेट खाण्यात मस्त असलेला मुलगा तिच्याकडे दुर्लक्ष करतो. नाईलाजाने ती वृद्ध स्त्री स्वतःच उठते. ती आपली काठी उचलतच असते की तेवढ्यात ज्या ठिकाणी ती बसली होती तिथे वरच्या छताची स्लॅब कोसळते. तिचा जीव वाचतो. ती जर मुलाने काठी उचलून द्यावी म्हणून तिथेच बसली असती ते, तिचा जीव गेला असता. मुलगा चॉकलेट एन्जॉय करीत बसला हे बरेच झाले हा जाहिरातीचा आशय!
इथे नीती अनीती चे प्रश्न, कोण बरोबर कोण चूक, जे नशिबात असते तेच होते, जे होते ते चांगल्या साठीच, असे विविध विचार प्रवाह पुढे येतात. हे सगळे वादाचे मुद्दे असू शकतील. तसेही जगात संपूर्ण सत्य असे काही नसतेच. एकाला मिळालेला न्याय हा दुसऱ्या साठी अन्याय ठरू शकतो.
दुसरी महत्त्वाची घटना देखील नुकतीच घडली आहे. मयूर शेळके या रेल्वेतील लाईनमन संबंधी. मुंबई उपनगरात कर्जत मार्गावर वांगणी या छोट्याशा स्टेशनवर घडलेली ही घटना सर्वार्थाने आगळी वेगळी आहे. सद्यस्थितीत स्टेशनवर सामसूम. प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी नाही. अशा वेळी एक आंधळी आई आपल्या आठ दहा वर्षांच्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवर चालत होती. ती अनवधानाने, दिसत नसल्याने प्लॅटफॉर्म च्या काठाने चालायला लागली. उड्या मारणारा तिचा मुलगा अचानक खाली रुळावर पडला. काही अंतरावरच जलद गाडी येत होती वेगात. काही अंतरावर रेल्वे लाईनवरच असलेल्या मयूर शेळके ने ते पाहिले. वेगाने येणाऱ्या जलद गाडीकडे बघितले. दोघात काही क्षणांचेच अंतर. परिस्थिती चे गांभीर्य त्याच्या लक्षात आले. त्याने मागचा पुढचा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, धाव घेतली. त्याला कुणी कुठून कसे बळ दिले देव जाणे? उडी मारून त्याने मुलाला उचलले, प्लॅटफॉर्मवर ढकलले, दुसऱ्याच क्षणी तोही उडी मारून प्लॅटफॉर्मवर आला. काही क्षणात ती गाडी धाड धाड आवाज करीत निघून गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. चॅनलवर दाखवली गेली. मयूर शेळकेचे कौतुक झाले. त्याला अनेक बक्षिसे घोषित झाली. एका कंपनीने मोटारसायकल दिली. मुख्यमंत्र्यानी फोन करून त्याचे अभिनंदन केले.
खरे तर त्यावेळी प्लॅटफॉर्मवर इतरही माणसे होती. हिरवी झेंडी दाखवणारा स्टेशन मास्तर, रेल्वे पोलिस, काही प्रवासी वगैरे. पण त्यापैकी कुणालाही रुळावर उडी मारून त्या मुलाचा जीव वाचविण्याची बुद्धी झाली नाही. फक्त मयूर शेळकेलाच ती झाली. तो साधा लाईनमन. कदाचित पदवीधर नसेल. त्याने कसल्या कौशल्याचे, आपत्कालीन परिस्थिती च्या व्यवस्थापनाचे ट्रेनिंग घेतले नसेल. त्याने प्रसिद्धी साठी, प्रमोशनसाठी, बक्षिसासाठी हे केले नाही. तो त्या क्षणी आपल्या आतल्या आवाजाचा धनी होता. त्याची ड्युटी वेगळी होती. पण माणूस म्हणून त्याला आपल्या जबाबदारी ची जाणीव होती. त्याची माणुसकी, त्याचा विवेक जागृत होण्याचा तो क्षण महत्वाचा होता. हा संस्कार कुठल्या विद्यापीठातून, ट्रेनिंग सेंटर मधून, आध्यात्मिक प्रवचनातून आला नव्हता. तो संस्कार त्यानेच स्वतःवर केलेला. म्हणजे गुरुही तोच, शिष्यही तोच. हे स्वतःच स्वतःला ओळखणे, अंतरनादाला साद देणे महत्वाचे असते. माणुसकी चा खरा परिचय देणारे असते.
सुब्रतो बागची हे माईंड ट्री या कंपनी चे प्रमुख. त्यांनी व्यवस्थापनाच्या नीती शास्त्रावर छोटेसे छान पुस्तक लिहिले आहे. त्यात प्रारंभी अशीच एक छान खरी गोष्ट आहे. बंगलोरला रस्त्यावरचा एक अनाथ मुलगा सरकारी दवाखान्यासमोर भीक मागून मोठा होतो. मोठा झाल्यावर तो त्याच दवाखान्यातील बेवारशी प्रेतांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी एकट्यानेच स्वीकारतो. ती इमाने इतबारे कर्तव्यनिष्ठेने पार पाडतो. अशी देवमाणसे आहेत म्हणून जगात चांगुलपणा, माणुसकी टिकून आहे. अशा घटनांचे, अशा माणसांचे प्रमाण कमी असेल. पण म्हणूनच ते आपल्याला उठून दिसते. गर्दीतले चेहरे लक्षात राहत नाहीत. पण एखाद दुसरा, आगळीवेगळी कृती करणारा चेहरा लक्षात राहतो. त्याची नोंद घेतली जाते. गेल्या एकदीड वर्षात, कोरोना काळात आपण असे चांगले वाईट मिश्र अनुभव घेतले. अनेकांना चार खांदे देखील मिळाले नाहीत. काही जणांनी डॉक्टर्स ना मारहाण केली. दवाखान्यात तोडफोड केली. कुणी इंजेक्शनचा, कुणी प्राणवायूचा काळाबाजार केला. त्याचे राजकारण केले. विरोधी पक्षाने सरकारवर टीका करायची, सत्ताधारी पक्षाने विरोधकांना दोष द्यायचा, राज्य सरकारने केंद्रावर खापर फोडायचे, अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या सांगण्यावरून खोटे आकडे प्रसारित करायचे, असा तमाशा चालू आहे. प्रत्येकाचे कातडी बचाव धोरण! कायदा अन् सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्या पोलीस खात्याच्या कारभाराचे जे धिंडवडे सध्या उडताहेत, त्याबद्दल तर बोलायलाच नको. हे पुढारी, मंत्री, अधिकारी, शिक्षक, वकील ही बहुतेक मंडळी, आपले कर्तव्य पार पाडणे तर राहिले दूर, पण स्वकेंद्रित लाभासाठी, यकिंचित स्वार्थापोटी, ज्या खालच्या पातळीचा स्तर गाठतात, ते पहिले की मन खिन्न होते. सर्वच तसे असतात असे म्हणायचे नाही. पण एकूण गोळाबेरीज केली तर काळी कर्तृत्वे जास्त दिसतात. या काळ्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे चे किंवा रात्रंदिवस रुगणाची सेवा करणाऱ्या नर्सेस, डॉक्टराचे प्रामाणिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, सत्कार्य उजळून दिसते. सध्या तर अशी कोणतीही यंत्रणा उरली नाही, जी भ्रष्टाचाराने बरबटली नसेल!अनेकदा तर असे दिसते की कोरोना ची आपत्ती राहिली दूर, पुढाऱ्यांना चिंता आहे ती राजकारणी गणिताची, पुढच्या निवडणुकांची, खासदार, आमदाराच्या संख्येची, सत्तेचे गणित कुणाला नीट जमते याचीच! बाकी देशाचे आरोग्य, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शिक्षण, पर्यावरण, विकास, हे सगळे दुय्यम. ते झाले काय अन् न झाले काय, काही फरक पडत नाही.
आपल्याकडे जाती धर्माच्याच भिंती नाहीत. पक्षा पक्षात भिंती आहेत. सत्ताधारी, विरोधक यांच्यात भिंती आहेत. वेगळ्या पक्षाचे असतील तर केंद्र, राज्य यांच्यात भिंती आहेत. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा या भावना कागदोपत्रीच उरल्या की काय अशी केविलवाणी शंका यावी, इतपत दुर्दैवी परिस्थिती आहे. आपल्याकडे प्रत्येक चौकात मोठमोठ्या थोर, महान वगैरे व्यक्तीचे पुतळे आपण उभारतो. करोडो रुपये खर्चून थोरांची स्मारके उभारण्याची चक्क चढाओढ सुरू आहे. पुतळ्यांच्या उंचीवरून व्यक्तीची थोरवी ठरविण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. या रस्ते अडविणाऱ्या पुतळ्या पासून, करोडो रुपये खर्चून बांधलेल्या स्मारकापासून आपण काय शिकतो, काय स्फूर्ती घेतो, कुठली प्रेरणा घेतो हा अर्थात संशोधनाचा विषय! ते पैसे आपण आरोग्य व्यवस्थेसाठी, शिक्षणासाठी खर्च केले असते, तर ही हॉस्पिटल बेड्स ची समस्या उदभवली नसती!पुतळे, स्मारके महत्वाची की दवाखाने महत्वाचे हे एकदाचे ठरवून टाकलेले बरे! कारण आपल्या लेखी ते फक्त दगडी पुतळे! आपण त्या व्यक्तीचे ना चरित्र वाचतो, ना आपण त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करतो. त्यांचा उपयोग फक्त राजकारणासाठी, मतांचे गणित जुळविण्यासाठी!
राहुल शेवाळे ला त्या मुलाला वाचविण्यात अपयश आले असते तर..? जितक्या कमी सेकंदात तो दैवी चमत्कार घडला, ते लक्षात घेता काहीही होऊ शकले असते! अशा वेळी काही लाखांचे अनुदान, तात्पुरती शोक संवेदना, ही नाटके ठरलेली आहेत. खरे तर आजच्या तरुण पिढीसाठी राहुल शेवाळे हा खरा हीरो आहे. त्याने हिरो होण्यासाठी। हे काही केले नसले तरीही! प्रेरणा घ्यायची तर त्याच्या पासून घ्यायला हवी. ही कथा शाळेतील मुलांना सांगायला हवी. राहुल शेवाळेच नव्हे तर आपला जीव धोक्यात घालून, घरादाराची,स्वतः च्या कुटुंबाची पर्वा न करता जे कोरोना योद्धे गेले दीड वर्ष लढताहेत, ते सगळेच रिअल इंडियन हीरो आहेत! शेवटी कुठून काय घ्यायचे, कुणाला देव, आदर्श मानायचे, कुणापासून स्फूर्ती घ्यायची, कुणाची आरती ओवाळायची, कुणाला हृदयात स्थान द्यायचे हे आपले आपल्याच हातात असते!
-डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com