महाराष्ट्रात दुकानावरील पाट्या मराठीत हव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. मराठीत पाट्या म्हणजे नेमके काय, कशासाठी हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान असायलाच पाहिजे यात काही शंका, दुमत नाही. आपली माती, आपली भाषा, आपले राज्य, आपला देश, याबद्दल स्वाभिमान असायलाच हवा प्रत्येकाला. पण एकीकडे वसुधैव कुटुंबकम ची भाषा करायची अन् दुसरीकडे स्वतः भोवतीची त्रिज्या संकुचित करीत जायची या विरोधाभासाचाही विवेकाने विचार करायला हवा. वरवर बघता मराठीत पाट्या म्हणजे दुकानाचे नाव देवनागरी लिपीत लिहा, अन् तेही इतर लिपी पेक्षा मोठ्या अक्षरात असा आग्रह दिसतोय. म्हणजे Pizza Hut बरोबर पिझा हट, Big Bazar च्या सोबतीने बिग बजार, KFC वर मोठ्या अक्षरात के एफ सी असे लिहायचे! दक्षिणेकडे बहुतेक राज्यात प्रांतिक भाषेतच पाट्या, नावे असतात. परदेशाचे उदाहरण द्यायचे तर जपान, चीन, जर्मनी, रशिया, ग्रीस या देशात त्या त्या भाषेतच पाट्या असतात. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय देखील होते. मराठी भाषेची मूळ लिपी देवनागरी नाही तर ती मोडी लिपी आहे असे ऐकण्यात आले. मी भाषा तज्ज्ञ नाही. पण मूळ मराठीत लिहायचे तर मोडी लिपीत लिहावे लागेल! ही लिपी तर आता वापरात नाही.
मराठीत लिहा याचा अर्थ शुध्द मराठी भाषेत प्रतिशब्द वापरून लिहा असा होतो. पण ब्रिटिशांचे वर्चस्व सहन करता करता त्यांच्या भाषेचे देखील आपण गुलाम झालो. काही इंग्रजी शब्द आपल्या भाषेत इतके रुळले आहेत की ते आपलेच वाटावेत! रेल्वे, इंजिन, पेन, रबर, पेन्सिल, बँक,पोस्ट ऑफिस (डाक घर हा हिंदी शब्द), टेबल, सोफा, जंक्शन अशी किती तरी उदाहरणे देता येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पासपोर्ट ऑफिस, व्हिसा याचे मराठी भाषांतर कुणी सांगेल का? किंबहुना मराठीत असे प्रतिशब्द असेल तरी ते वापरात, लिहिण्या वाचण्याच्या प्रयोगात नसल्यामुळे लोकांना ते समजणार नाहीत. पासपोर्ट म्हटले की पटकन समजेल पण पारपत्र म्हटले की माणूस गोंधळेल.एस टी चा संप असेच सगळीकडे लिहिले बोलले जाते. राज्य परिवहन फक्त कागदोपत्री. केंद्र सरकारच्या कार्यालयात फाईल च्या आत महत्वाच्या वापरातले इंग्रजी शब्दांचे हिंदीत भाषांतर दिले असते. ते शब्द वापरायला इतके अवघड वाटतात की त्यापेक्षा इनवर्ड, आऊटवर्ड पटकन समजते!
माझे शिक्षण ज्या नागपूर शहरात झाले, तिथे फार जुन्या शाळा कॉलेज ची नावे इंग्रजी आहेत. उदा.सी पी अँड बेरार हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, नीलसिटी हायस्कूल, हिसलॉप कॉलेज, एल ए डी कॉलेज, एल आय टी..वगैरे. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत कुणीही यावर आक्षेप घेतला नाही. काही परंपरा या जशाच्या तशा, स्वीकाराव्या, जपाव्या लागतात. अनेक मराठी जुन्या चित्रपटांची, कथा कादंबऱ्याची नावे चक्क इंग्रजी असतात. जुन्या हिंदी चित्रपटात तर टायटलस उर्दू मध्ये देखील असायची! हे सारे आपण पचवले, स्वीकारले.
नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेत शिक्षणावर भर आहे. आता तर ए आय सी टी ई ने इंजिनिअरिंग चे शिक्षण देखील मातृभाषेत द्यायला परवानगी दिल्याचे कळते. प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग, मेडिकल, या क्षेत्रातील बहुतेक संकलपना, संज्ञा, व्याख्या, प्रमेये मूळ पर भाषेतील (इंग्रजीत) आहेत. त्या प्रत्येक शब्दाचे मराठी शब्दशः भाषांतर सोपे नाही. तेव्हा मराठीत शिक्षण म्हणजे इंग्रजी शब्द वापरून मराठीत विषय समजावणे असा घेता येईल. या भाषेला मिंगलिश (मराठी अधिक इंग्लिश) असे संबोधता येईल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान मराठीत साध्या सोप्या, सहज भाषेत समजावून देणारी दोन पुस्तके (लेखक माझे आवडते अच्युत गोडबोले): आर्टिफिशयल इंटेलिजन्स अन् इन्फो..या दोन मराठी पुस्तकात क्रियापदे सोडली तर सत्तर ऐंशी टक्के शब्द मूळ इंग्रजीत आहेत (अर्थात देव नागरी लिपीत लिहिलेले). यावर कुणी आक्षेप घेतला तर ते योग्य ठरणार नाही. कारण कितीही डोके खाजवले, आपटले तरी असे प्रतिशब्द म्हणजे शब्दशः मराठीत भाषांतर अशक्यप्राय आहे. तसे कुणी आग्रहाने केले तरी मूळ विषय समजणार तर नाहीच पण ते अधिक गुंतागुंतीचे होईल. ही उदाहरणे देण्याचे कारण हे की प्रश्न समजण्याचा, सोपे पणाचा, जन मान्यतेचा असतो. दुराग्रह करून राजकारण साधता येईल. समस्या सुटेल, प्रश्न सोपे होतील, ग्राह्य ठरतील असे नाही. उस्मानिया विद्यापीठात मी माझे अर्धे अधिक आयुष्य संशोधन, अध्यापनात घालवले, तिथे स्थापनेच्या वेळी म्हणजे शंभर वर्षापूर्वी शिक्षणाचे माध्यम, इंजिनिअरिंग, मेडिकल सुध्धा, उर्दू होते! प्रशासनाची भाषा सुध्दा उर्दूच. कालांतराने हे सर्व बदलले.आपल्या देशाची मूळ समस्या ही की या देशाची एक अन् एकमेव अशी राष्ट्रभाषाच नाही. हिंदीला दक्षिणेतील राज्येच नव्हे तर बंगाल, उडिशा देखील राष्ट्र भाषा मानीत नाहीत. मनातून स्वीकारीत नाहीत! हे कटू सत्य आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, उच्च शिक्षणासाठी आजकाल स्थलांतर करावेच लागते. बदल्या झाल्या की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते. बॉलिवूड सारखे उद्योग तर मुंबई सारख्या एका शहरात केंद्रित आहेत. त्यामुळे मातृभाषेच्या बरोबरीने, इंग्रजी, हिंदी, अन् त्या त्या राज्यातील लोकल भाषेचे ज्ञान गरजेचे असते.
मातृ भाषेतून उच्च शिक्षणाचा आग्रह योग्य असला तरी संभाव्य अडचणीचा देखील विचार केला पाहिजे. इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, व्यवस्थापन अशा उच्च शिक्षणातील आधुनिक संकल्पना, संज्ञा, प्रमेये, समीकरणे, ही बहुतेक इंग्रजीत उपलब्ध आहेत. त्याचे अर्थपूर्ण भाषांतर सोपे नसते. आपल्या कडे अशा कामासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समित्या किती गांभीर्याने, प्रामाणिकपणे काम करतात हे सर्व विदित आहे. त्यामुळे प्रत्येक मातृ भाषेत ,प्रत्येक कोर्सच्या प्रत्येक विषयाचे पाठ्य पुस्तक कधी कसे पूर्ण होईल हे सांगणे कठीण. त्यात ज्ञान विज्ञान कमी अन् चुका जास्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही उत्कृष्ठ पाठ्य पुस्तके असतील. पण फार कमी.
मराठीचेच नव्हे तर कुठल्याही भाषेचे संवर्धन करायचे तर त्या भाषेत वेग वेगळ्या विषयावरील उत्कृष्ठ, दर्जेदार प्रमाण ग्रंथ, साहित्य, शब्दकोश, संदर्भ कोष निर्माण व्हायला हवेत. हे एका झटक्यात कायदा मंजूर करण्याइतके सोपे काम नाही. अशा ग्रंथ निर्मितीसाठी चिकित्सक वृत्ती, सखोल चिंतन, मनन, अध्ययन आवश्यक असते. दुर्दैवाने सध्याचा जमाना हा क्याजुअल वृत्तीचा, कामचलाऊ प्रवृत्तीचा कसेतरी निभावून नेण्याचा आहे. ज्या गांभीर्याने, तात्विक बैठकीत सखोल, सारासार चिंतन करून आपली सुंदर घटना लिहिली गेली, संविधान निर्मिती झाली, ती साधना, तपश्चर्या अशा मातृ भाषेतील ग्रंथ निर्मिती साठी लागेल. मातृ भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनव्या संकल्पना, व्याख्या, संज्ञा समजून, समजावून सांगण्यासाठी शब्दाच्या नव निर्मितीची गरज आहे. हे काम सोपे नाही. पण अशक्य देखील नाही.
मूळ मुद्द्यावर जायचे तर फक्त पाट्या बदलून काही साधणार नाही. काही जणांना तात्पूर्ता रोजगार मिळेल. काही जणांचे उखळ पांढरे होईल एव्हढेच. मी स्वतः मातृ भाषेचाच पुरस्कार करणारा आहे. मातृभाषेत बोलण्यात, लिहिण्यात, व्यक्त होण्यात आत्मविश्वास असतो. अभिमान असतो. मोकळेपणा असतो. पण पाट्या टाकून भाषेच्या अस्मितेचे संवर्धन, उन्नयन होत नाही. अस्मिता रक्तात, नसा नसात, कृतीत असावी लागते.
-डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com