माझ्या प्रोफेशनल करियरवर म्हणजे अध्यापन संशोधनाच्या कार्यक्षेत्रावर, सर्वाधिक परिणाम झाला तो आयआयटी (खरगपूर)च्या निवडक बंगाली प्राध्यापकांचा. शालेय शिक्षकांचेही महत्त्व असतेच. त्यांच्या विषयी आधी लिहिलेही आहे. पण माझ्या प्राध्यापकी पेशातील मला मिळालेल्या यशाचे श्रेय बहुतांशी प्रमाणात दोन बंगाली प्राध्यापकांना द्यावे लागेल. त्यापैकी पहिले प्रा. बी. एन. दास. हे माझ्या एम. टेक., अन् पीएच. डी. च्या प्रबंधाचे मार्गदर्शक होते. दुसरे प्राध्यापक जी. एस. संन्याल हे विभाग प्रमुख होते. शिवाय आमच्या गुरुचेही गुरू म्हणजे महागुरू. स्वतः पीएच. डी. नसूनही त्यांनी प्रा. दास सह अनेकांना पीएच. डी. चे मार्गदर्शन केले. पुढे ते आयआयटी चे डायरेक्टर देखील झाले. प्रा. दास, प्रा संन्याल हे आमचे एम.टेक. चे शिक्षक तर होतेच, पण पुढे मी प्राध्यापक झाल्यानंतर त्यांचा सहकारी होण्याचे भाग्य देखील मला लाभले. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हा माझ्या साठी सर्वार्थाने श्रीमंत, समृद्ध करणारा अनुभव होता.
ज्येष्ठतेनुसार क्रम लावायचा तर आधी प्रा. संन्याल यांच्याविषयी सांगायला हवे. आम्ही एम.टेक. ला प्रवेश घेतला तेव्हा ते विभाग प्रमुख होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सात आठ प्राध्यापकांनी आमची प्रवेशासाठी मुलाखत घेतली. त्यावेळी लेखी परीक्षा अन् तोंडी मुलाखत दोन्हीला सामोरे जावे लागले. त्यावेळचा एक किस्सा मला आठवतो. मुलाखत आटोपल्यावर ज्यांची निवड झाली त्यांना निकालासाठी प्रा. संन्याल यांच्याकडेच जावे लागले. त्यावेळी आंध्र प्रदेशातील एका विद्यार्थ्यांने आपली अडचण सांगितली. प्रवेशासाठी सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करायचे होते. त्या विद्यार्थ्यांचे एक सर्टिफिकेट घरीच राहिले होते. ही अडचण त्याने सांगताच प्रा.संन्याल त्याला म्हणाले, जेव्हा तू रेल्वेने प्रवास केलास तेव्हा तिकीट चेकरला सांगू शकतील का माझे तिकीट घरी विसरलो म्हणून?तिकीट चेकर तुमचे शब्द पंच करीत नाही. त्याला पंच करायला तिकीटच हवे असते!
या उत्तराने त्या विद्यार्थ्यांला पुढे काही बोलताच आले नाही. कुठल्याही प्रश्नाला साध्या सोप्या पण अचूक पद्धतीने सामोरे जायचे हे प्रा. संन्याल यांच्या पहिल्या भेटीतच मला समजले.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी हा आमच्या अभ्यासक्रमातला सर्वात कठीण विषय. भारतातच नव्हे तर जगात कुठल्याही कॉलेजात या विषयाला मुलेच नव्हे तर शिकवणारे शिक्षक देखील घाबरायचे. अजूनही घाबरतात. पण हाच विषय अगदी साध्या सोप्या रंजक पद्धतीने शिकवण्याचे कसब प्रा. संन्याल यांच्यात होते. अनेक वर्षांपूर्वी मॅक्सवेल नावाच्या शास्त्रज्ञाने चार महत्वपूर्ण समीकरणाचा शोध लावून तंत्रज्ञाचे काम सोपे केले. पण याच समीकरणांनी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र धाबे दणाणले. हा विषय उत्तम रितीने शिकवणाऱ्या जगातील पाच उत्कृष्ट शिक्षकाची निवड करायची झाली तर प्रा. संन्याल यांचा नंबर वरचा असेल हे निश्चित. त्यांचे हस्ताक्षर देखील उत्कृष्ट होते. इंजिनिअरिंग चे विषय शिकवताना फळ्यावर अनेक आकृत्या काढाव्या लागतात. त्या काढतानाचे त्यांचे सुरेखन देखील उत्तम होते. अभ्यासक्रमाचा सर्व भाग ते कधीही शिकवत नसत. अमुक एवढा अभ्यासक्रम पूर्ण केलाच पाहिजे असे बंधन आयआयटी च्या प्राध्यापकांना नव्हते. ते शिकवतील तोच अभ्यासक्रम. कारण ते जे, जसे, जितके शिकवणार ते उत्कृष्ट अन् आवश्यक असेच असणार हा मापदंड. त्यामुळे प्रा.संन्याल यांच्या विषयासाठी अवांतर अभ्यास खूप करावा लगे. त्यांची परीक्षा ही ओपन बुक पद्धतीची. म्हणजे पुस्तक वह्या वापरण्याचे स्वातंत्र्य. पण प्रश्न इतके कठीण की एकाचेही उत्तर पुस्तक वहीत नसायचे. ते शोधण्यात वेळ वाया जायचा. त्यांनी प्रश्नालाच कलाटणी दिलेली असे. पण पूर्ण उत्तर लिहिलेच पाहिजे, सगळे पेपर सोडवलेच पाहिजे, असे बंधन नससायचे. जे लिहिले ते तुम्हाला नीट समजले असले पाहिजे, चूकसुद्धा उमजली पाहिजे, हीच, एवढीच अपेक्षा असे.
प्रा.संन्याल हे अप टू डेट असायचे. सूट बूट टाय घालून कारने येणारे ते एकमेव प्राध्यापक. आयआयटी चे बहुतेक प्राध्यापक तेव्हा चक्क सायकल वापरायचे! प्रा.संन्याल कधीही बिना टाय घालता कॉलेजला आले नाहीत. पुढे मी त्यांचा सहकारी झाल्यानंतर एक दिवस ते टाय न घालता आले. तेव्हा त्यांना तसे बघायला आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, निमित्त काढून! आश्चर्य म्हणजे त्यांची पत्नी वारल्यानंतर तीनचार दिवसांनी ते मार्केटमध्ये भेटले, तेव्हा सुद्धा टाय घालूनच होते!प्रा.संन्याल आंघोळ देखील टाय घालून करतात, असे विद्यार्थी विनोदाने म्हणायचे!
प्रा.संन्याल यांच्या आवाजातले मोडुलेशन अतिशय मोहक,प्रभावी असे होते. रेडिओ सिलोनच्या अमीन सयानीच्या आवाजातला गंभीर गोडवा प्रा.संन्याल यांच्याही आवाजात होता. उत्कृष्ट शिक्षकांसाठी आवश्यक सारे गुण त्यांच्यात होते. ते आदर्श शिक्षक होते, खरे रोल मॉडेल. त्यामुळे पुढे प्राध्यापक झाल्यानंतर त्यांची कॉपी करण्यात मला कसलीही लाज वाटली नाही. उलट अभिमान वाटला.
प्रा.दास त्या मानाने अगदी साधे, सामान्य, गरीब घराण्यातील. मूळ बांगला देशातून कोलकातात आलेले शरणार्थी. प्रा संन्याल यांचेच विद्यार्थी, त्यामुळे तितकेच, उलट कांकणभर जास्तच हुषार. गुंतागुंतीची गणितं चटकन उकलण्यात, सोडवण्यात त्यांचा हातखंडा. पण स्वभावाने शीघ्र कोपी. ते केव्हा काय बोलतील, कसे रागावतील याचा नेम नसे. हे सगळे प्रारंभी च्या काळात. पुढे याच प्रा. दासानी मला त्यांचा मुलगा मानले!एम.टेक.चा, अन् पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण होईपर्यंत मात्र अक्षरशः चरकातल्या उसासारखे पिळून काढले. ते एकेक प्रकरण पुन्हा पुन्हा लिहायला लावायचे. त्यामुळेच माझे टेक्निकल रायटिंग स्किल उत्कृष्ट झाले. अनेक पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रसिद्ध करता आले. या पेपर पब्लिकेशन संबंधीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आमचा एक पेपर एकदा नव्हे तर चक्क दोनदा संपादक मंडळाकडून नाकारण्यात आला. मी वैतागलो. आपण आता दुसऱ्या जर्नल ला पाठवू म्हणालो. पण प्रा.दास यांना ते पटेना. ते तज्ज्ञांच्या कॉमेंटशी सहमत नव्हते. त्यांना आपले काम समजलेच नाही, असेही ते म्हणाले!तिसऱ्यांदा आम्ही तो पेपर आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुनश्च पाठवला. यावेळी प्रा.दास यांनी संपादकांना एक खरमरीत पत्र लिहिले. अन् तज्ज्ञांचे म्हणणे खोडून काढले. हे पत्र ड्रॅफ्ट करायला आम्हाला दोन महिने लागले! यावेळी संपादकांना आमचे म्हणणे पटले. त्यांनी तज्ज्ञांचे मत डावलून आमचे संशोधन प्रसिद्ध केले
पुढे एका तज्ज्ञाने आमच्या संशोधनाचे महत्त्व, वेगळेपण आपल्या एका लेखात उद्धृत केले. या सर्व प्रकरणातून संशोधनाला लागणारी चिकाटी, आपला मुद्दा रेटून धरण्याचे कसब, लिखाणात आवश्यक अग्रेसिव्ह अप्रोच असे बरेच काही शिकता आले.
प्रा.दास यांची उत्तर पत्रिका तपासण्याची पद्धत वेगळी होती. ते प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावून, त्याच्या समोर त्याची उत्तर पत्रिका तपासत. चुका दाखवून खडसावत. चांगली कानउघाडणी करत. त्यावेळी अक्षरशः थरथरायला होत असे. आपल्याला C किंवा B ग्रेड मिळेल अशी भीती वाटे. प्रत्यक्षात A ग्रेड मिळालेला असे. चूक झाली याला महत्त्व नसे. चूक कुठे, का झाली याचे आकलन झाले की नाही याला महत्त्व असे. एम.टेक. करतानाची प्रा. दास यांच्याविषयीची ही भीती पुढे पीएच.डी. करेपर्यंत कुठल्या कुठे पळाली. आमच्यात मैत्रीचे, सहकाराचे नाते निर्माण झाले. प्रा संन्याल, प्रा.दास यांचा आवडता विद्यार्थी, विश्वासू सहकारी होण्याचे भाग्य मला लाभले. पुढे प्रा.दास यांच्याअनेक विद्यार्थ्यांचे प्रबंध ते आधी माझ्याकडे तपासायला पाठवत. मगच स्वत:ची स्वीकृती देत असत.
प्रा.दास याना शिकवताना, इतर वेळी बोलताना विषयांतर करण्याची खूप सवय. त्यांच्याजवळ गप्पांचा खूप मोठा खजिना असे. ते बांगला देशातील लहानपणीचे किस्से सांगत. वाचन भरपूर. इतिहास, राजकारण याचे प्रगल्भ ज्ञान. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, मराठा, मोगल, हा सगळा इतिहास तोंडपाठ. टागोर, बंकीम दा, सत्यजित रे यांच्यावर प्रचंड प्रेम.
प्रा.दास यांच्याशी बहुतेक चर्चा त्यांच्या घरी होत. विभागात ते अत्यंत व्यस्त असत. संध्याकाळी एका पाठोपाठ एक अशी विद्यार्थ्यांची रांग असे घरी. या चर्चा रात्री उशिरापर्यंत चालत. आपले सारे आयुष्य त्यांनी हे असे अध्यापन संशोधन या कार्यात वाहून टाकले.
आयआयटी त पहिला परदेशी संगणक आला, तेव्हा त्याचे उद्घाटन प्रा.संन्याल यांनी माझ्या हाताने केले, नारळ फोडून! कुणीही बाहेरचे तज्ज्ञ आले की त्याच्या समोर प्रेझेंटेशन करण्यासाठी ते मलाच समोर करीत. प्रा.संन्याल हे कुठलेही काम सांगण्यासाठी आम्हाला निरोप पाठवून बोलवत नसत. ते स्वतः आमच्या खोलीत येऊन, आमच्या खांद्यावर हात ठेवून, हात हातात घेऊन, जबाबदारी नीट समजावून सांगत.चर्चा करत.
माझ्या खरगपूर च्या वास्तव्यातला बहुतांश वेळा या दोन महान प्राध्यापकांच्या सहवासात, सान्निध्यात गेला. ते आपसात बंगालीत बोलत. त्यामुळे अल्पावधीतच मला बंगाली छान समजायला लागले, बोलता आले. शिवाय दर आठवड्याला कॅम्पस थेटरला बंगाली चित्रपट असे. त्यामुळे आजही मी बंगाली भाषा विसरलो नाही. या भाषे सारखीच हे प्राध्यापक मंडळीही तितकीच गोड होती.
बंगाली भाषाच नव्हे, आयआयटी खरगपूरचे मंतरलेले दिवस, प्रा.दास, प्रा.संन्याल यांची शिकवण, त्यांनी केले प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांनी उधळलेली शैक्षणिक श्रीमंती, त्यांच्या सहवासात सुसंस्कृत, समृद्ध झालेले मौलिक अनुभव, आजही विसारलेलो नाही, ते विसरताच येणार नाही.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com