आई कुठे काय करते, या मालिकेच्या शीर्षकावरून हे सारे सुचले. पुरुषप्रधान संस्कृतीत (अजूनही?) स्त्रियांना कसे कमी लेखले जाते, हे त्या मालिकेतून सुचवायचे होते. पण काळाच्या अन् कोरोनाच्या प्रवाहात ही मालिका भलतीकडेच वाहवत गेली हा भाग वेगळा! आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. मुळातच कोण कुठे काय करतो? हा प्रश्न जो तो विचारतो, त्या मनोवृत्तीविषयी बोलायचे आहे.
घरापासून सुरुवात करूया. घरात प्रत्येक जण आईलाच नव्हे तर प्रत्येकाला हा प्रश्न कधी ना कधी विचारतोच. नवरा बायकोला म्हणतो, तू कुठे काय करते? मीच तर कमावतो. दिवसभर बाहेर राबतो. तीही कमावत असेल तर नवऱ्याला म्हणते, तू घरात कुठे काय करतो? मी तर घर, बाहेरचं सगळीकडे बघते. मुलांचा अभ्यास घेते. स्वयंपाक करते. कामवाली आली नाही तर धुणी भांडी, झाडूपोछा देखील करते. आईवडील मुलांना म्हणतात, तुम्ही कुठं काय करता घरात? सारखे बाहेर, मित्र मैत्रिणी, कॉलेज, अभ्यास यातच मस्त. शिवाय पार्ट्या आहेतच. घरची फिकीर आहे कुणाला?पुरुषांनी निवृत्ती घेतली की त्या रिकामटेकड्या माणसालाही प्रश्न विचारला जातो? तुम्ही कुठे काय करता? दिवसभर पेपर नाहीतर मोबाईल, शिवाय टीव्ही आहेच टाईमपास ला! पुढे घरातील वृद्ध माता पित्याला, सासू सासऱ्यांना देखील हाच प्रश्न विचारला जातो. तुमची आजारपणं, तुमची औषधं, तुमचं खाणं पिणं, पथ्य, हे सांभाळण्यातच आमचा जीव जातो. तुम्ही कुठे काय करता? त्यानी घरासाठी जे काही करायचं ते खरं तर करून चुकले आयुष्यभर घरच्या साऱ्यासाठी. पण ती आधीची जमेची बाजू वर्तमानात विसरली जाते. आता तुम्ही काही कामाचे नाहीत हे महत्त्वाचे.
ऑफिसच्या कामाच्या ठिकाणी देखील हीच स्पर्धा, तुलना चालू असते. म्हणजे सगळं काही आपणच करतो, सगळी जबाबदारी आपणच सांभाळतो, प्रोजेक्ट आपणच पूर्णत्वास नेतो. तो कुठे काय करतो?ती कुठे काय करते? बॉस कुठे काय करतो? तो फक्त हुकूम सोडतो. डेडलाईन ठरवतो. टार्गेट देतो. झिजावे तर आपल्याला लागते. आपणच मरमर मरतो. बाकी सगळे काही न करता मजा मारतात. लठ्ठ पगार घेतात. प्रमोशन, बोनस लाटतात. पण प्रत्यक्षात ते कुठे काय करतात.
हाच प्रश्न आपण नेत्यांना, आमदार खासदारांनाही विचारतो. ते फक्त मत मागण्यासाठी, निवडणुकीच्या आधी दिसतात. पण एकदा निवडून आले, मंत्री झाले, खुर्चीवर बसले की ते कुठं काय करतात? रस्त्यावरचे खड्डे तसेच असतात. अस्वच्छता जैसे थे.भ्रष्टाचार आहेच. पोलिसांचे जुलूम आहेतच. अन् मंत्रीच नव्हे तर ते सचिव, अधिकारी, एकूणच प्रशासनातली मंडळी, ते कुठं काय करतात? फक्त अधिकार गाजवतात. बंगले, गाड्या, नोकरचाकर, असे सारे फायदे लाटतात. पण जनतेसाठी ते कुठे काय करतात?
न्यायालयात खटले प्रलंबित राहतात. वकील तारखावर तारखा घेतात. वरून खालपर्यंत सगळे एकमेकांना सामील असतात. आपल्याकडून हजारो, लाखोंची फी वसूल करतात. पण आपल्याला हवा तो न्याय मिळतच नाही. सगळी टोलवाटोलवी. ते तरी कुठे काय करतात आपल्यासाठी?
खाजगी शाळा, कॉलेजेस भरपूर फी वसूल करतात. लाखो रुपयांचे डोनेशन वसूल करतात. शिक्षक, प्राध्यापक कुठे, काय शिकवतात?नोकऱ्या कुठे मिळतात? चारित्र्य संपन्न पिढी कुठे तयार करतात?खाजगी क्लासेसचे पसरलेले जाळे, नोकऱ्या देण्याघेण्यातला भ्रष्टाचार, खोट्या पदव्या, नकली सर्टिफिकेट, गुणांची फेरफार, काप्याचा सुळसुळाट, सगळे काही दिवसाढवळ्या घडत असते. सगळ्यांना सगळं काही माहिती. सारं सूर्य प्रकाशासारखं स्वच्छ. पण कुणीच काही करत नाही. आपली फक्त एकच तक्रार, आम्ही सांगून काय उपयोग? ते कुठं काय करतात असं म्हटलं की झालं! आपण बॉलीवूडच्या गटाराबद्दल बोलायला मोकळे. टीव्हीवरच्या चर्चेचा आरडाओरडा ऐकायला मोकळे. तिथले नेपोटीझम, मी टु प्रकरण, ड्रग्ज, माफिया अन् काय काय, सगळ्यावर चर्चा करायला मोकळे!सगळी घाण साफ करायची जबाबदारी पोलिसांची, सरकारची, सीबीआय, ईडीची! आपल्या हातात कुठे काय आहे? आपण कुठे काय करू शकतो? आपली देशाचा कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून काय जबाबदारी आहे? आपले अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे फक्त टीका टिप्पणी करण्यापूरते मर्यादित. दुसऱ्याला दोष देऊन चटकन हात मोकळे करता येतात. जबाबदारी झटकता येते. मी काही केलं तरी काय उपयोग? त्याने काय फरक पडणाराय? ते कुठं काय करतात?असं म्हटलं की झालं!
दुसऱ्याच्या लहान मोठ्या कामाला कमी लेखण्याची, स्वतःची टिमकी वाजवण्याची अन् वर जबाबदारी झटकण्याची, कर्तव्यापासून पळवाट शोधण्याची ही आपली वृत्ती सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आपण कोरोनाच्या विषाणूविषयी एव्हढा गदारोळ माजवलाय. अर्थात या विषाणूची साऱ्या जगालाच सळो की पळो करून सोडले हे मान्य. पण आपणच आपल्या मनात, शरीरात हे असे काही विषाणू जोपासले, वाढवले त्याचे काय? हे विषाणू देखील कोरोना सारखेच घातक आहेत. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त घातक आहेत. कारण ते कर्तव्यशून्य, आळशी, परावलंबी मनोवृत्तीचे पोषण करतात. विकासाच्या दिशेने पुढे जाण्याऐवजी मागे नेतात आपल्याला. अधोगतीकडे नेतात. आपल्या प्रगतीला खीळ घालतात. कारण जबाबदाऱ्या झटकून,फक्त दुसऱ्यांना दोष देऊन, ते कुठे काय करतात? मग मीच कशाला काही करू? असे म्हणून चूप बसण्यात दिसते ती कुपमंडूक वृत्ती. कासव फक्त गोष्टीतच शर्यत जिंकू शकतो. जगाच्या शर्यतीला तोंड द्यायचे असेल तर सशाच्या, वाघ सिंहाच्या गतीने धावावे लागते. मुख्य म्हणजे इतरांचे हात हातात घेऊन धावावे लागते. जे एकटे पुढे जातात, ते पुढे एकटे पडतात. तेव्हा कोण कुठे काय करतात, यापेक्षा मी काय करतो, मी काय करायला हवे? हे जास्त महत्वाचे.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com