# कोरोना अन् स्वातंत्र्य वर्ष २०२०.

ब्रिटिशांच्या गुलामीतून आपल्याला पहिले स्वातंत्र्य मिळाले ते १९४७ साली. सात दशके हे स्वातंत्र्य आपण बरे भुले पणाने उपभोगले. या काळात काय कमावले, काय गमावले हा राजकीय संशोधनाचा विषय. पण आता २०२० साली आपल्याला पुनः नवे स्वातंत्र्य मिळाले. आधीचे स्वातंत्र्य लौकिकार्थाचे. पण आताचे स्वातंत्र्य आपल्याला सर्वार्थाने मुक्त करणारे, स्वतःच स्वतःचा शोध घ्यायला लावणारे. केवळ बाह्य जगाचा विचार न करता, आत डोकवायला लावणारे. प्रश्नामागे धावण्या ऐवजी उत्तरांचा शोध घ्यायला लावणारे. आपल्याला स्वत:ची खऱ्या अर्थाने ओळख करून देणारे, एका दृष्टीने आध्यात्मिक स्वातंत्र्य.

हे सारे नक्की कसे ते पाहू या:
पूर्वी रस्त्यावर गर्दी असायची, माणसाची, वाहनांची. त्याशिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषण. श्वास घेणे कठीण. या कोरोनाने दिलेल्या स्वातंत्र्यात रस्त्यावरची गर्दी गेली. वाहने कमी झाली. प्रदूषण पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाले. माणसे श्वास घ्यायला मोकळी झाली. म्हणजे मुक्त संचार.

पूर्वी मुले शाळेत जायला कंटाळायची. बुट्टी मारण्यासाठी डोके, पोट दुखण्याचा बहाणा शोधायची. सुटीची वाट बघायची. आता तर काय सुटीच सुटी. शाळेपासून स्वातंत्र्य, गुरुजी पासून स्वातंत्र्य. अभ्यासात, परीक्षेत सवलतीच सवलती. काहीही करा. कुणी प्रश्न विचारणारे नाही. परीक्षेचा ताण नाही. निकालाची काळजी नाही. मुलांनाच नाही, मोठ्यांना देखील मोकळीक. घरीच बसा. घरून काम करा. केले नाही तरी कुणी विचारणारे नाही, मेमो मिळणार नाही. सरकारी, खाजगी कसलीही नोकरी असो. घरूनच काम करा. पूर्वीसारखा रजेचा प्रश्न नाही. मेडिकलसाठी डॉक्टरच्या खोट्या सर्टिफिकेट ची गरज नाही. घरून काम करायचे म्हणजे कसेही राहण्याचे स्वातंत्र्य. बरमुडा अन् बनियान घालूनही काम करू शकता. कॅज्युअल, फॉर्मल असे पोशाखाचे वर्गीकरण नाही. स्त्रिया मॅक्सी घालून लॅपटॉपवर बसल्या तरी कुणाला कळणार नाही. व्हिडीओ कॉन्फरन्स असेल तेव्हा शरीराच्या वरच्या भागापूरते नीट कपडे घातले तरी पुरे!म्हणजे खाली लुंगी घालण्याचे देखील स्वातंत्र्य!

घरची कपाटे आधी घेतलेल्या, गरज असलेल्या, नसलेल्या पोशाखानी भरली आहेत. महिनोन् महिने नीट पोशाख केलेलाच नाही. आवडीने घेतलेले ड्रेसेस, चप्पल, सँडल्स, शूज वापरलेलेच नाहीत. सपात्या घातल्या के झाले. मॉलमध्ये ही कुणी सपात्या घातल्या, बरमुडा घालून गेलात तरी कुणी काही म्हणणार नाही. काय करायचे ते करा. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. मास्क मात्र हवाच, सॅनिटायझर वापरा, हात धुवा, सहा फुटांचे अंतर राखा. तेव्हढेच काय ते बंधन. बाकी फुल फ्रीडम.

पूर्वी थोडेही काही बिघडले की निघा डॉक्टरकडे. करा तपासणी. दात दुखतो, डोळ्यातून पाणी येते, गुडघे दुखतात, निघाले डॉक्टरकडे. आता कुणालाच काही होत नाही. झाले तरी त्याचा इश्यू होत नाही. त्यामुळे सगळे स्पेशालिस्ट रिकामे. पूर्वी दर पंधरा दिवसांनी शुगर, कोलोस्ट्रोल, चेक करण्याचे बंधन. आता नाही केले तरी काही वाटत नाही. दवाखाण्यात जायचीच भीती वाटते. कोरोनाने सगळ्या जगाला भीतीच्या खाईत लोटले. तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, पहेलवान असा, डॉक्टर, इंजिनीअर असा, आमदार, खासदार असा, काही फरक पडत नाही. शेवटी मृत्यूची भीती आहे. याचा अर्थ या भीतीने तुम्हाला गुलाम केले असे नाही. उलट तुम्हाला स्वातंत्र्य आहे, मोकळीक आहे. कुटुंबाबरोबर हवा तेव्हढा, हवा तसा वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य. घरच्या स्वच्छतेचे निकष स्वतःच ठरविण्याचे स्वातंत्र्य. दुसऱ्या, परक्या व्यक्तीवर, नोकर चाकरावर अवलंबून न राहण्याचे स्वातंत्र्य.

आता तर आपला आपल्यालाच प्रश्न पडतो. बँकेत लाखो रुपये जमा आहेत, त्याचे काय करायचे? कुठे कसे खर्च करायचे. कोरोना झाला तरच लाखोंचे बिल भरावे लागणार. आधी आपण सवयीचे गुलाम होतो. मुलांनी पिझा बर्गर म्हटले, की दिली ऑर्डर. हजाराचे बिल! मॉलमध्ये गेले के वीस पंचवीस हजार ची खरेदी। काहीच नाही. नोटा ही मोजाव्या लागत नाही. कार्ड पेमेंट आहेच. मग घरात वीस ड्रेसेस कपाटात धूळ खात पडून असले तरी फॅशन म्हणून चार पाच नवे ड्रेस घ्यायचेच. नव्या चपला सँडल्स चे जोड घ्यायचेच. आज हे सगळे निरर्थक झाले आहे. कशाचा काही उपयोग नाही. मुख्य म्हणजे भरोसाच नाही कशाचा. आपल्या जीवाचा देखील! आपल्यानंतर या सगळ्या जमा वस्तंचे, पैशाचे, मालमत्तेचे काय होईल हे ही आपल्याला माहिती नाही. आपण गुलमासारखे मरमर मरून, कष्ट करून कमावले हे सारे. आपल्या इच्छा आकांक्षा, आपले स्वातंत्र्य सुद्धा घाण ठेवले त्यावेळी. पण कमावले त्याचा उपयोग करण्याचे, साधन, औचित्यच नाही आपल्याकडे.

या नव्या स्वातंत्र्याने आपल्याला नवे ज्ञान दिले. असे ज्ञान जे कुठल्याही शाळेच्या, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नाही. आपल्या मूळ गरजा फार कमी असतात. म.गांधीजी म्हणायचे, आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर निसर्ग स्रोत आहेत अवती भवती. पण आपली हाव, आपल्या लालसा पूर्ण करण्याची क्षमता नाही निसर्गात. आपण लुटतो, ओरबडतो एकमेकांना. अवतीभवतीच्या निसर्गाला, वस्तूंना. सगळेच हवे हवे. बँकेत भरपूर जमा हवी, कपाटात भरपूर कपडे हवे, सोनेनाणे, दागिने हवेत. मुलांना खेळणी हवीत महागडी, शॉपिंग हवे, वीक एन्डला औटिंग हवे, महागड्या रिसॉर्टचे हॉलिडे पॅकेज हवे. मग त्यासाठी गुलमासारखे राबणे आले. घाण्याच्या बैलासारखे मान झुकवून घाम गळणे आले. हजार रुपये फी असलेल्या सरकारी शाळेत मुलांना घालणे म्हणजे प्रतिष्ठा कमी होणार. आपले स्टेटस सांभाळायचे तर लाख दोन लाख फी असलेल्या इंटरनॅशनल शाळेतच घालायला हवे. शिवाय वर ट्युशन आहेतच. आपल्या सारखेच मुलेही सवयीचे गुलाम. त्यांनाही स्कुटी हवी, भरभक्कम पॉकेटमनी हवा, महागडे ड्रेसेस हवेत, पार्ट्यासाठी पैसे हवेत.

गेले काही महिने यातले काहीच केले नाही आपण. काहीच उपभोगले नाही. दार उघड, रस्ते मोकळे, तरी आपण बाहेर जात नाही. एक विषाणू, जो कुठून, कसा आला, कधी, कसा जाणार, केव्हा जाणार, कुणालाच काहीही माहिती नाही, अशा विषाणूने आपल्याला नवा धडा शिकवला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ शिकवला. स्वातंत्र्य म्हणजे हवे तसे वागणे, हवे ते खाणे पिणे, हवे ते बोलणे, मर्जीनुसार हवे ते करणे, हाच अर्थ अभिप्रेत होता आपल्याला. कोरोनाने, लाॅकडाऊनने सारे बदलले. आपण ज्यामागे धावत होतो ते मृगजळ होते हे समजले. मोह, हाव, लालसा हे सारे पोखरणारी शत्रू आहेत हे कळले. नात्याची, दोस्तीची किंमत कळली. मुख्य म्हणजे हाताखालच्या नोकर चाकराचे महत्त्व समजले. प्रत्येकालाच स्वातंत्र्य हवे असते, मोकळीक हवी असते, मौजमजा हवी असते. कुणी लहान नाही, मोठा नाही, वरिष्ठ, कनिष्ठ नाही. आपण एकाच बोटीतले प्रवासी, साधी माणसं आहोत. ही जाण या नव्या स्वातंत्र्य वर्षाने आपल्याला दिली. आधी १५ आॅगस्ट हा एक स्वातंत्र्य दिन आपल्याला माहिती होता. आता २०२० हे नवे स्वातंत्र्य वर्ष आपल्या आयुष्यात आले. न विसरता येणारे वर्ष. डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी, बुद्धीवंतांनी २०२० हे वर्ष अनेक उद्दिष्ट पूर्तीचे लक्ष्य वर्ष ठरवले होते. त्या उद्दिष्टापैकी काय किती साध्य झाले, हा अर्थातच संशोधनाचा विषय. पण एका वेगळ्या अर्थाने हे वर्ष नव्या आगळ्यावेगळ्या उद्दिष्टाचे सार्थक वर्ष ठरले हे निश्चित. आपली दिशा, दशा बदलणारे हे वर्ष ठरले. आपल्या डोळ्यात अंजन घालणारे वर्ष, आपल्यला नवी दृष्टी देणारे वर्ष. आपल्याला आपला खरा चेहरा दाखवणारे वर्ष. फक्त शरीर अन् शरीराच्या गरजा महत्वाच्या नाहीत. तर या शरीराच्या आत जे मन आहे, मनात जे विचार आहेत, त्याचेही आरोग्य सांभाळणे जास्त महत्वाचे. जगण्यासाठी फक्त शरीर महत्वाचे नसते. ते तर क्षणभंगूर. मनाचे, विचारांचे आरोग्य, विकारांचे नियमन जास्त महत्वाचे.

२०२० या स्वातंत्र्य वर्षाने हे सारे आपल्याला शिकवले. हे कोरोनाचे, लाॅकडाऊनचे बाय प्रोडक्ट कमी महत्वाचे नाही. बाकी घसरलेल्या सर्व गाड्या यथावकाश रुळावर येतीलच. त्याची चिंता नको. घराच्या भिंतीतले आपण अन् या देहाच्या कुडीतले मन, मनातले विचार, विकार, ते नीट सांभाळले की पुरे. स्वातंत्र्यवर्ष आपोआप साजरे होईल.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल:  vijaympande@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *