आमच्या पिढीला श्यामच्या आईने घडवले. आम्ही यशवंताची आई कविता वाचून अश्रू ढाळले. आमची आई म्हणजे गजबजलेला गाव. आमची माय दुधावरची साय. फ. मु. शिंदे च्या कवितेतल्या आईसारखी. आम्हाला स्मृतीचित्रे तली लक्ष्मीबाई आई म्हणून भावली. पाठीवर मुलाला घेऊन लढणाऱ्या झाशीच्या राणीने तर आमचे स्फुल्लिंग चेतवले. राजा छत्रपती शिवाजी च्या जिजाऊंचे आदर्श आम्ही जोपासले.
आमची आई लाड करीत होती. हवे ते खाऊ पिऊ घालीत होती. पण वेळ पडल्यास पाठीवर धपाटे घालीत होती. तिच्या वागण्यात माया होती. मुलांच्या बाबतीत शिस्त देखील होती. मायेने ओथंबलेल्या डोळ्यात धाक देखील होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दूरदर्शन मालिकेतली आई पचवणे जड जाते. आम्हालाच काय सर्वांनाच जड जात असावे. त्यातही बबड्या च्या आईने तर कहर केलाय. पण टीना, TINA, म्हणजे देअर इज नो आल्टरनेटिव्ह, दुसरा काही पर्यायच नाही, म्हणून आम्ही या मालिका, अन् त्यातल्या आया सहन करीत आहोत. त्यातही बबड्या च्या आईने कळस गाठलाय, सगळ्या मर्यादा पार केल्यात. बबड्या शाळा कॉलेजात गेला नाही. त्याला पदवी मिळाली नाही. त्याने गुण पत्रिकेत खाडाखोड केली. खोटे सर्टिफिकेट दाखवून नोकरी मिळवली. त्याने अनेकांना, स्वतः च्या आईलाही फसवले. लोकांचे हजारो, लाखो पैसे डुबवले. आईचे पैसे चोरले. तिचे क्रेडिट कार्ड वापरून मजा केली. दारू पिऊन घरच्या पूजेत धिंगाणा घातला. बायकोला फसवले. तिचा सारखा अपमान केला. शेजारणी शी चाळे आहेतच. वडिलांचा अपमान केला. म्हणजे दुर्गुणाचा पुतळाच, महामेरू. तरी या बबड्या ची आई त्याचीच बाजू घेते. त्याच्या बायकोला म्हणजे सुनेलाच दोष देते. एव्हढेच नव्हे तर ती या मूर्ख मुलाला पाठीशी घालून, आपल्या दुसऱ्या नवऱ्याला दोष देते. त्याच्याशी अबोला धरते. सगळे तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण ती आंधळी बहिरी झालेली. तिला बबड्याच्या चुका दिसतच नाहीत. अशी आई लेखक दिग्दर्शकाला कुठे दिसली? तिचा पत्ता काय? तिच्या घरच्यांनी तिला प्रत्यक्षात कसे काय सहन केले, हे आम्हाला ही कळू द्या. निदान काम करणाऱ्या कलावंतांना नीर क्षीर विवेक आहे की नाही? निवेदिता सराफ या गुणी अभिनेत्री ने अशी आई कुठे, कुणात पहिली, ही भूमिका साकारताना/साकारण्यापूर्वी? कलाकारांना स्वतःचा चॉईस नसतो, आवाज नसतो हे खरे. म्हणजे ते लेखक, दिग्दर्शक सांगतील तेच करतात, पैशासाठी! पण थोडे तरी बौद्धिक ज्ञान, वैचारिक स्वातंत्र्य वापरावे की नाही? आपण काय अभिनय करतो, काय बोलतो, कसे वागतो, त्याचे समाजावर काय परिणाम होतील, याची थोडी तरी जाण, चाळ असावी की नाही?
हे सगळे याच मालिके पुरते मर्यादित नाही. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शीर्षकापासूनच अतिरेक आहे. घरच्या लेकाने एका पाठोपाठ एक बायकांच्या, मुलींच्या, मागे लागावे अन् तरीही नागपूरच्या आईने अनावश्यक हेल काढत त्याला गोंजारावे, हेच चालू आहे. आता ही नागपूर ची आई थोडी सुधारलेली दिसते, त्यामुळे इतर पत्राप्रमाणे तीही, राधिका मी तुझ्या पाठीशी उभी आहे, हा जप शंभर वेळा करीत असते. आई कुठे काय करते, या मालिकेत देखील विवाहबाह्य संबंध आहेतच. तेही मोठ्या झालेल्या मुलादेखत. असे अवास्तव दाखवल्या शिवाय स्पॉन्सर मिळत नाही की काय देव जाणे, निर्माता जाणे!
हेच आचार विचार आपल्याला नव्या पिढीला दाखवायचे आहेत का?आदर्श या शब्दाची व्याख्या आधीच राजकारणी पुढाऱ्यांनी पार बदलली आहे. तिथे लाज वगैरे प्रकार नसतो. कातडी निबर असते. पण जिथे कौटुंबिक लळा जिव्हाळ्याचे नाते संबंध असतात, तिथे हा थिल्लर पणा, निर्लज्ज पणा दाखवून आपण काय साधतो? चित्रपटासाठी असलेली सेन्सॉरशिप मालिकांसाठी नाही का? इथे काहीही अनैतिक, अव्यवहारीक, असांस्कृतीक दाखवलेले चालते का?
मालिकांनी उपदेशाचे डोस पाजावे, सारे गुडी गुडी दाखवावे, आदर्शाचे गुणगान गावे असे म्हणायचे नाही. पण नव्या पिढीला, वयात आलेल्या मुला मुलींना हे असे रोल मॉडेल्स, असे आदर्श दाखवायचे का?
आधीच चंगळवादाने, पाश्चात्य सांस्कृतिक आक्रमणाने आपला समाज हळूहळू भरकटत चाललाय. भावनिक नाती, एकत्र कुटुंब पद्धती हे लोप पावत चालले आहे. आपल्या प्रेमाच्या, नाते संबंधाच्या वर्तुळाची त्रिज्या संकुचित होते आहे. अशा वेळी आगीत तेल घालून हा संकुचित पणा वाढवायचा की कौटुंबिक लळा जिव्हाळा जोपासण्या साठी खत पाणी घालायचे? नात्यांना तोडायचे की जोडायचे?
आपल्या कडे चांगल्या नाटकांची, उत्तम चित्रपटाची परंपरा आहे. नाटक चित्रपटाचा समाजावर परिणाम होत नाही, ते फक्त मनोरंजन म्हणून बघायचे हा युक्तिवाद बरोबर नाही. व्ही शांताराम, राजा परांजपे यांच्या चित्रपटांनी, बाळ कोल्हटकर, कालेलकर, कानेटकर, शिरवाडकर, दळवी, एलकुंचवार यांच्या नाटकांनी मनोरंजना बरोबर भावनिक नात्याचा घट्ट आलेख चितारलाय. त्याचा समाजावर चांगला परिणाम ही झालाय. प्यासा पाहून आपण हळहळलो. दोस्ती चित्रपट पाहून अभ्यासाला प्रेरित झालेली मुले मी पहिली आहेत. मीही त्यापैकी एक आहे! याउलट एकच प्याला पाहून दारू पिणे कमी झाले का, असे विचारणारा एक वर्ग आहे. पुरुषाचे दारू पिणे कमी झाले नसले तरी, स्त्रिया सजग झाल्या, खंबीर झाल्या, त्यांनी सहनशीलतेचे बंधन झुगारून दिले हे नाकारता येणार नाही. आमच्या पिढीने सुलोचना, मीनाकुमारी त आई पहिली. नूतन, आशा काळेत ताई बघितली. नटसम्राट च्या शोकांतिकेने वृद्ध व्यक्ती चा प्रश्न सुटला नसेल पण त्या आजी आजोबांचे दुःख पाहून तरुण नातवंडे हळहळली हे खरे. हिमालयाच्या सावलीने आम्हाला गारवा दिला हे खरे!
आजकाल माध्यमे नको तितकी चेकाळली आहेत. हिंदी मराठी मालिका म्हणा, इतर मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणा, कुठेच कसला धरबंध राहिला नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल तसा धुडगूस चालू आहे. न्यूज चॅनल्स बद्दल तर न बोललेच बरे! पण मनोरंजनाच्या बाबतीत तरी काही प्रमाणात सुसंस्कृतपणा बौद्धिक श्रीमंती, वैचारिक पातळी, सारासार विवेक हे अपेक्षित आहे. पूर्वी इतके चॅनल्स नव्हते, तरी दूरदर्शन वरच्या तबसूम च्या मुलाखती, सिद्धार्थ काक, रेणुका शहाणे चा सुरभी, भारत एक खोज, खानदान, बुनियाद, तमस, प्रपंच, आभाळमाया यासारख्या मालिका, हेही आपण अनुभवले, पाहिले, एंजॉय केले. आम्हाला तेच, तसेच हवे असे नाही. काळानुरूप बदल हवेतच. पण या बदलात नाविन्य हवे, प्रतिभा हवी, सांस्कृतिक श्रीमंती हवी, बौद्धिक प्रगल्भता हवी. आता चालू आहे तसे वैचारिक दारिद्र्य नको. अतार्किक चित्रण नको. बबड्याची थंडगार, आंधळी, बहिरी अवास्तव आई तर नकोच नको.
-डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com