या लेखाचे शीर्षक वाचून कुणालाही वाटेल की हे गृहस्थ तरुण भारतात कधी होते?पण नाते असायला त्या घरातलेच असायला हवे असे कुठे आहे?घराबाहेर देखील आपले अनेक जिव्हाळ्याचे नाते संबंध असतातच की!काही नाती वर्षानुवर्षे टिकतात.या मागची कारण परंपरा नीट उलगडता येत नाही.तरुण भारताशी माझे नाते संबंध असेच आहेत.त्याविषयी मोकळेपणाने लिहावेसे वाटले.
मजजवळ च्या नोंदी प्रमाणे माझा तरुण भारता शी संबंध 1967 पासून चा! म्हणजे पन्नास वर्षे अधिक जुना.1967 च्या दिवाळी अंकात माझी कविता प्रसिद्ध झाली.नक्की सांगता येणार नाही पण त्यावेळी श्री भाऊसाहेब माडखोलकर संपादक असावेत.नंतर 1968 च्या दिवाळी अंकात ही माझी कविता होती.त्यावेळी वर्तमानपत्राचा वेगळा दिवाळी अंक निघायचा जादा पानांचा.पुस्तक रूपाचा मासिकाच्या आकाराचा अंक वेगळा.माझी पहिली कथा तरुण भारताच्या रविवार पुरवणीत 24 ऑगस्ट 1969 ला प्रसिद्ध झाली.त्यापूर्वी मी शाळेच्या वार्षिकातून बरेच लिहिले.पण सर्व प्रथम प्रसिद्धी मिळाली ती तरुण भारतामध्येच.पहिले वहिले मानधन देखील तरुण भारतनेच दिले. त्यावेळी पाच रुपयांची मनी ऑर्डर आल्याचे आठवते. पुढेही तरुण भारत थोडेफार का होईना मानधन द्यायचे. ती धोरणे काळानुसार बदलली हेही खरे!
संपादकीय घरोबा थोडाफार प्रस्थापित झाला तो श्री. ना. बा. ठेंगडी रविवार पुरवणी बघायचे तेव्हापासून. मी त्यांना तीन चार वेळा प्रत्यक्ष भेटलो देखील. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे. पण छान चर्चा करायचे. मोकळा अभिप्राय द्यायचे. रामदासपेठेतील त भा च्या कार्यालयाशेजारीच एक हॉटेल होते. तिथे दोसा खात आमच्या गप्पा व्हायच्या. ते अती संवेदनशील होते. मी एक कथा त्यांना पाठवली. त्यांचे स्वीकृती चे उत्तर आलेच नाही. तेव्हा ती कथा मी मटा ला पाठवली. त्यांचेही काही उत्तर नाही. स्वीकृती वगैरे कळवायची नाही हा संपादकीय धर्म असावा. आजही तो पाळला जातोच! पण आश्चर्य म्हणजे ती मटा मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर मला श्री. ठेंगडी यांचे पत्र आले, काहीसे नाराजीचे. कारण त्याच आठवड्यात ती त भा त प्रसिद्ध होणार होती. पण त्यांचे एक वाक्य मला दिलासा देऊन गेले. त्यांनी लिहिले होते, ते काहीही असो, मटा त तुमची कथा आली याचा मलाही अभिमान वाटतो. असा मोकळा दिलदार पणा तेव्हा होता.
1973 साली माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली, अंधारातल्या सावल्या. ती मी परीक्षणा साठी त भा कडे पाठवली. पण परीक्षण येईना. शेवटी मी चक्क श्री. माडखोलकर यांनाच पत्र पाठवले. हे म्हणजे डायरेक्ट रतन टाटा कडेच तक्रार करण्यासारखे होते! आश्चर्य म्हणजे त्यांचे उत्तर आले. ’मी आता त भा चा संपादक नाही. तिथे जातही नाही. तुम्ही संपादकांना लिहा. मला हा स्पष्ट वक्तेपणा आवडला.
74 साली माझी दुसरी कादंबरी पत्रांजली प्रसिद्ध झाली. तीही मी पाठवली. तेव्हा ती नेमकी श्री. ठेंगडी यांच्या हातात पडली. ते या कादंबरीने इतके भारावले की त्याने रविवार पुरवणीत चक्क पाऊण पण दीर्घ परीक्षण लिहिले. परीक्षणा शेवटी त्यांनी या कादंबरीची तुलना स्तिफन झवाईग च्या लेटर फ्रॉम अननॉन वूमन शी केली! एखाद्या संपादकांकडून मला मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार. ही कादंबरी वाचून ते माझ्या आजीला भेटायला घरी सुद्धा गेले होते. मी तेव्हा आयआयटी खरगपूर ला होतो, शिकायला. श्री. ठेंगडी नको तितके भावना प्रधान होते. मी खरगपूर ला असतानाच त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त मटा त वाचले. खरगपूर ला मी दोन दिवस उशीरा येणारा मटा वाचत असे! त्या वृत्तांने धक्का बसणे स्वाभाविक होते. त्या छोट्याशा बातमीने माझ्या मनात देवाशप्पथ खरं सांगेन, या कादंबरीचे बीज अंकुरले. काही गोष्टी आपल्या आकलना पलीकडच्या असतात हेच खरे!
पुढे श्री.सुधीर पाठक युवक विश्व सदर बघत असताना मी ‘परिचय विवाह’ या विषयावर लेख लिहिला. त्याची संकल्पना पत्रांजली कादंबरीवर, स्वानुभवावर आधारित होती. तो लेख इतका गाजला की त्यावरची वाचक चर्चा दोन तीन आठवडे, श्री. पाठक यांच्या नाकीनऊ येईपर्यंत चालली. त्यात त भा च्या पुरवणी ची पाच सहा पाने खर्ची पडली असतील! सुखद अनुभव होता तो. पुढे प्रत्यक्ष भेट झाल्यावर, माझा लेख वाचून आपणही परिचय विवाह केल्याचे श्री. पाठक म्हणाले! एका साध्या लेखाचा केवढा परिणाम!
पुढे श्री.सुधीर पाठक संपादक झाल्या नंतर माझे त भा तील लेखन अधिक नियमित झाले. उत्तरार्ध, मंतरलेले दिवस ही दीर्घ मालिकांची सदरे याच काळातली. त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत मी नेटाने, निष्ठेने लिहिले.
मंतरलेले दिवस म्हणजे माझ्या नागपूर, खरगपूर, हैदराबाद, मुंबई च्या प्रोफेशनल कारकीर्दी चा, वास्तव्याचा लेखाजोखा. तेव्हा माझे VNIT तले अल्पकालीन वास्तव्य संपले होते. अनेक जण वाटच बघत होते, मी त्या मंतरलेल्या दिवसा बदद्दल काय लिहितो याची. पण कटू अनुभव लिहायचे नाहीत, कुणालाही दुखवायचे नाही, असे मी ठरवले होते, ते माझ्या स्वभावात ही नव्हते. मी लिहिले असते तरी त भा ने ते छापले नसते! तशी स्पष्ट कबुली, पुढे श्री. पाठक मला हैदराबाद ला आमच्या घरी भेटले, तेव्हा त्यांनीच दिली होती.
एक मात्र खरे, त्या अडचणीच्या काळातही त भा चा मला आधार, मूक पाठिंबा होता. त्यावेळच्या माझ्या मनस्थिती चे स्पष्ट प्रतिबिंब असलेल्या सहा कविता त भा ने एकत्र रविवारी छापल्या होत्या, खास चौकटीत. एवढेच नव्हे तर त्या वर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन VNIT च्या निदेशकाच्या म्हणजे माझ्या हस्ते झाले होते! एका दिवाळी अंकाच्या टाईप सेटिंग चा शुभारंभ च माझ्या कथेने झाल्याचे श्री.पाठक यांनी सांगितले होते. ते हस्तलिखित वाचतांना ते इतके रंगून गेले, की त्यांना बोलावलेली मिटींग पुढे ढकलावी लागली म्हणे. लेखकांसाठी अशी प्रशस्तीपत्रे मानधनापेक्षा लाख मोलाची असतात. श्री.पाठक मी औरंगाबाद ला कुलगुरू असतांना, घरी भेटायला आले होते. तरुण भारतातील मंतरलेले दिवस पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. त्याची दुसरी आवृत्ती देखील निघाली. उत्तरार्ध सदराचे लेखही पुस्तक रूपाने आले.
तरुण भारताचा एक खास वाचक वर्ग आहे. आवडले ते लेखकाला पत्राने, फोनने कळविणारा रसिक वाचक वर्ग. माझ्या त भा तील लेखांची कात्रणे जपणारा वर्ग, ते लेख झेरॉक्स करून इतरांना पाठवणारा वर्ग. फोनने दाद देणारा वर्ग. फार पूर्वी मला त भा त काही प्रसिद्ध झाले की परतवाड्याहून एका ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड यायचे नियमाने! आता ते कार्ड येणे बंद झाले. त्याची देखील हुरहुर वाटते. एक स्पष्ट लेखावर मुंबई हून मुस्लिम तरुणाचा फोन आला. भरभरून बोलला. तो त भा चा मुंबईतला वितरक आहे! वृत्तपत्रातील लेखनावर असा भरभरून प्रतिसाद मिळणे हा माझ्या साठी सुखद अनुभव असतो अजूनही. वृत्तपत्रीय लेखनाने लेखक जास्त प्रकाशझोतात राहतो हे खरे. तेच त्याचे अमूल्य मानधन असते.
पन्नास वर्षांपासूनचे तरुण भारताचे संबंध आजही टिकून आहेत. अनेक संपादकांना मी भेटलो देखील नाही. सगळा व्यवहार पोस्ट द्वारे, आता इमेलने. माझ्या त भा तील कथा, कविता, लेखांची संख्या शंभरी च्या वर गेली केव्हाच. मी लिहितो आहे, लिहिणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत! ही युती निश्चितच तुटणारी नाही.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com