# विशेष: नामदेव ढसाळ- मराठी साहित्यातील एक अपरिहार्य पात्र.

प्रख्यात विद्रोही कवी दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमीत्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा लेख देत आहोत..

नामदेव ढसाळ हे मराठी व भारतीय साहित्यातील एक अपरिहार्य पात्र. साहित्य अकादमी या प्रतिष्ठित संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्यिकांना जीवनगौरव सन्मान देण्याचा उपक्रम सुरू झाला त्याच्या पहिल्याच वर्षी अकादमीने सर्वप्रथम नामदेव ढसाळांचा गौरव केला. अशा प्रकारे ढसाळांनी मराठी भाषेला देशपातळीवर मोठा सन्मान मिळवून दिला. ढसाळ हे निव्वळ साहित्यिक नव्हते, नाहीत. सत्तरीच्या दशकात जोरदारपणे पुढे आलेल्या दलित चळवळीतील ‘दलित पँथर’ या युवक संघटनेचे ते प्रमुख नेते होत. याच काळात उदयाला आलेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रस्थानी होते. ढसाळांच्या ‘गोलपिठा’ या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी सारस्वतांना उपेक्षितांच्या जगाचं, जाणिवांचं, तीव्र संतापाचं आणि त्यामधून आलेल्या बेधडक अभिव्यक्तीचं जालीम दर्शन घडवलं. गोलपिठा ही मराठी साहित्यातील अजोड व अभिजात निर्मिती ठरली आहे. दलित साहित्यानं प्रातिनिधिक म्हणून जे उभं केलं त्याला काळानुसार मर्यादा येणारच. प्रत्येक नव्या संप्रदायाला अशा मर्यादा असतातच. जशी समाजातील उत्पादनाची साधनं बदलतात, त्या अनुषंगाने सांस्कृतिक व्यवहार व अभिव्यक्तीही बदलतात. उदाहरणार्थ, आता जागतिकीकरणानंतर कॉर्पोटरायझेशन होऊ लागलंय. यातून श्रमजीवी वर्गाचा उत्पादनाशी असलेला संबंध तुटतो आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना राज्यकर्ते धाब्यावर बसवू लागलेत. परिणामी, श्रमजीवी वर्ग विस्थापित होतोय. याचंही प्रतिबिंब नव्या कवितांमध्ये उमटू लागलंय. उदाहरणार्थ नाशिकच्या अरुण काळेचा अलिकडील कवितासंग्रह. अरुण काळे हा आमच्या खूप नंतरचा. पण कुठल्या दिशेने पुढे जायचं याचं जे दिशादिग्दर्शन दलित साहित्यानं केलं होतं, त्या ट्रॅकनेच लोक पुढे जाताहेत. शोषणाच्या सर्व प्रक्रियांविरोधतात जाणं, बंड करणं ही दलित साहित्याची प्रेरणा आहे.

ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपिठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक बिनीचे शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या ‘दलित पँथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरीरिने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, ‘दलित पँथर’शी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होतं.

काव्यलेखनासाठी पारंपरिक रंजनवादी शैली टाळून कल्पनारम्यतेला नकार देऊन आशयाला थेट भिडणारी वास्तववादी कविता हे विद्रोही कवितांचे वैशिष्ट्य. तसेच प्रवाहा विरुद्ध तसेच निसर्ग कविता, ललित कविता वगळून प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या कविता म्हणून ओळखल्या जातात. आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र: प्रियदर्शनी, खेळ, गोलपिठा, तुझे बोट धरून चाललो आहे मी, तुही इयत्ता कंची, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह), गांडू बगीचा, निर्वाणा अगोदरची पीडा, सर्व काही समष्टीसाठी, बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न आंधळे शतक, ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार – (गोलपिठा), सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, बहिणाबाई चौधरी पुरस्कार, पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी, स्वर्णजयंती: जीवनगौरव पुरस्कार, गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धी दिली. महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या ‘दलित पॅंथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेची स्थापना त्यांनी इ.स. १९७२ मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकार्‍यांच्या व साहित्यिकांसह केली. या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पँथर चळवळीचा प्रभाव होता. या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले. कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ हे दलित पँथरमध्येच राहिले मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दलित चळवळीला त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.

नामदेव ढसाळ हे इ.स. १९६० नंतरच्या मराठी कवींमधील प्रमुख कवी समजले जातात. त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली. त्यांनी भाषिकदृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या कृतींमध्ये वेदना, विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव आहे. प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना आपल्या अनोख्या शैलीने हादरा देणारे ज्येष्ठ दलित साहित्यिक आणि ‘दलित पँथर’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्याच्या व चळवळीच्या माध्यमातून दलितांना आत्मभान देणारे आक्रमक नेते होते. नामदेव ढसाळ यांचे दलित चळवळीत मोठे योगदान होते. दलित व दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांना तीव्र चीड होती. दलितांवरील वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी दलित पँथरची स्थापना करून अनेक तरुणांना संघटित केले व त्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा दिला. हा कवी धगधगत होता. त्याची कविता ज्वालामुखीसारखी वाचकांच्या मनात पसरत होती. कवितेविषयीच्या पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभाव पेटवित होती. नामदेव ढसाळांना हे सहज शक्य झाले याचे कारण जन्माला आल्यापासूनच त्यांना दुःखांनी घेरले होते. जातवास्तवाच्या जहराने त्यांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही आणि वर्गवास्तवाने त्यांना मानसिक स्वस्थता लाभू दिली नाही. ढसाळांचे आयुष्य असे जंगलासारखे पेटत होते आणि हे आयुष्य मराठी कवितेत आपले उग्र रूप घेऊनच प्रवेशले आणि नामदेव ढसाळ दलित, आंबेडकरवादी कवितेचे नायक झाले. एकूणच मराठी कवितेचे नायक ठरले.

भारतीय कविता मानव केंद्रीत केली. त्यांनी भारतीय मानसिकतेची भेदनिती तंतोतंत ओळखली होती आणि ते त्यावर तुटून पडले. चंद्र-ताऱ्यात अडकलेली मराठी कविता आणि एकूणच भारतीय कविता त्यांनी संपूर्ण बदलून टाकली, मानव केंद्रीत केली. जागतिक वाङमयापर्यंत पोहोचली. कवितेतील त्यांचे योगदान शब्दातीत आहे. नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता.  जानेवारी १३, इ.स.२०१४ रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवार, १५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

स्मृती तेवत ठेवणारा उपक्रम:
नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने वैभव छाया आणि इतर समविचारी मित्रांनी ‘नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती’ ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकूण आयुष्याला सलाम करणारा सारे काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी मुंबई येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाट्यरूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, त्यांची शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट-लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
-विकास मेश्राम, गोंदिया
मोबाईल: 7875592800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *