मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व डॉ. भागवत कराड या चार मंत्र्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावरून माध्यमं व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यातच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितमताई मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार इथपासून ते त्या दिल्लीत दाखल झाल्या इथपर्यंत बातम्या व्हायरल झाल्या. शेवटी या बातम्यांत तथ्य नसून प्रितम ताई या आमच्या मुंबईतील घरीच आहेत, असा खुलासा पंकजाताई मुंडे यांना करावा लागला.
प्रितमताई मुंडे यांचा अखेर मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्यामुळे त्या नाराज असल्याच्या बातम्या आता येत आहेत. याबरोबरच त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या अन्य मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत, अशाही बातम्या येत आहेत. यावर नेहमीप्रमाणे भाजप व केंद्रीय नेतृत्वाची बाजू हिरीरिने मांडणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंडे भगिनी या नाराज नसल्याचे माध्यमांना सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मुळात भाजपला ओबीसींचे आरक्षण किंवा त्यांचे नेतृत्व हेच मान्य नसल्याचे मागील काही महिने व वर्षांपासून दिसून येत आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी सुरूवातीच्या काळात भाजपला जनाधार नसताना वंजारा समाज बांधवांच्या माध्यमातून पक्षाच्या मागे मोठी ताकद निर्माण केली व पक्षाला गाव-खेड्यापासून ते शहरापर्यंत जनाधार मिळवून दिला व पक्ष वाढवला. याबरोबरच त्यांनी वंजारा समाजाला बरोबर घेऊन ओबीसींची मोठी ताकद मिळवून वंजारा समाज व ओबीसीला न्याय मिळवून देऊन एक मोठी ताकद निर्माण केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे या वंजारा समाज व ओबीसींचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आल्या. मात्र, भाजपने त्यांना पद्धतशीरपणे डावलण्याचा चंगच बांधला. फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजाताई मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. त्यांना फडणवीस यांनी क्लीन चीट दिली असली तरी या घोटाळ्याचे आरोप करण्यासाठीची रसद मुख्यमंत्री कार्यालयातूनच पुरवली गेल्याचे आरोपही झाले. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई यांना पक्षातूनच झालेल्या छुप्या विरोधामुळे पराभव पत्करावा लागला. कारण पंकजाताई यांनी मी मुख्यमंत्री झाले नसले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे विधान केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी लपून राहिली नव्हती. व फडणवीस यांच्यामुळेच पंकजाताई यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समज झाला होता.
पंकजाताई मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजप त्यांना विधान परिषदेची आमदारकी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेथेही भाजपने पंकजाईन यांना डावलून वंजारा समाजाचे रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. दुसरीकडे वंजारी समाजाचेच व गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून राजकारणात आलेले व त्यांच्यांच नेतृत्वाखाली औरंगाबादचे महापौरपद भूषवलेले डॉ. भागवत कराड यांना भाजपने वर्षभरापूर्वी राज्यसभेची खासदारकी दिली. व आता थेट त्यांना केंद्रात मंत्रीपदही दिल्याने साहजिकच मुंडे भगिनींच्या सहनशिलतेचा बांध फुटला तर नवल वाटू नये. कारण प्रितम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड लोकसभा मतदार संघातून दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने मुंडे भगिनींना डावलून एकिकडे वंजारा समाजातीलच रमेश कराड यांना विधान परिषदेवर घेतले व दुसरीकडे डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देऊन मुंडे भगिनींची कोंडी केली आहे.
पंकजाताई व खासदार प्रितमताई मुंडे यांची सध्यातरी वेट ॲण्ड वॉच अशी भूमिका आहे. असे असले तरी त्यांच्या मागे असलेले नेते कार्यकर्त्यांची फळी प्रचंड अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थेला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. पक्षात राहून किती दिवस अपमान सहन करायचा, आता निर्णय घ्या, अशी साद कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे भगिनींना घालत आहेत. यावर पंकजाताई यांनी आपण नाराज नसल्याचे सांगून कार्यकर्त्यांची समजूत झालू अशी प्रतिक्रिया दिली आहे. असे असले तरी सध्याच्या परस्थितीतून असे दिसून येते की, भाजपला मुंडे भगिनींना डावलून ओबीसींचे नेतृत्व संपवायचे आहे, तसेच दुसरीकडे त्यांना ओबीसींचे आरक्षणही नकोच आहे, त्यामुळे भाजपला मुंडे भगिनींना डावलने हा उद्देश असला तरी आरक्षण हटवणे हा हेतू त्यांना साध्य करायचा आहे.
-विलास इंगळे, संपादक