# वकील व जज यांचे मानसिक आरोग्य -प्रा.डॉ. वृषाली राऊत.

सत्याच्या बाजूने लढणारे व असत्य खरं करून दाखवणारी ही वकील मंडळी पोलीस खात्यातील लोकांसारखी सतत ताणाखाली वावरतात. अत्यंत बेभरवशी असा व्यवसाय म्हणून गणला जाणारा वकिली व्यवसाय हा त्या व्यावसायिकांसाठी शारीरिक दृष्टीने धोकादायक आहेच परंतु मानसिक कसोटी पहाणारा सुद्धा आहे. सतत गुन्हेगारी, संघर्ष, वाद, भांडण, हिंसा व भ्रष्ट व्यवस्था अशा घटकांच्या सानिध्यात राहिल्याने ताण येणं स्वाभाविक आहे व त्या सगळ्या नकारात्मक भावना वकिलांच्या मनावर खूप खोल परिणाम करतात. आपल्याच सहकारी वकिलांसोबत स्पर्धा व नियमित उत्पन्नाची शाश्वती नसणे या गोष्टी वकिलांच्या ताणात भर टाकतात…

“तारीख पे तारीख” या हिंदी सिनेमातील लहानसा पण प्रसिद्ध डायलॉग भारतातील वकिलाचं आयुष्य कळायला पुरेसा आहे. भारतातील न्याय व्यवस्था जिचा आपण सगळे रोज प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रितीने अनुभव घेत असतो ती ज्या पद्धतीने काम करते त्यावरून त्यात काम करणारे वकील व जज हे कशा पद्धतीचे मानसिक आरोग्य अनुभवत असतील याची कल्पना येते.

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असं म्हणतात मात्र ज्या वकील व जज यांना कोर्टाची पायरी रोजच चढावी लागते त्यांची मानसिक अवस्था कशी असावी याचा फारसा विचार कोणी करत नाही. जी गोष्ट अस्तित्वात नाही तिला शब्द वापरून खरं करून दाखवणे म्हणजे “काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणे” हे काम करणारे वकिली या व्यवसायाचं मला नेहमीच अप्रूप वाटलं.

सत्याच्या बाजूने लढणारे व असत्य खरं करून दाखवणारी ही लोकं पोलीस खात्यातील लोकांसारखी सतत ताणाखाली वावरतात. अत्यंत बेभरवशी असा व्यवसाय म्हणून गणला जाणारा वकिली व्यवसाय हा त्या व्यावसायिकांसाठी शारीरिक दृष्टीने धोकादायक आहेच परंतु मानसिक कसोटी पहाणारा सुद्धा आहे.

आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्‍या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्र सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.

या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात मानसिक थकवा, ताण, चिंता, व्यसन व औदासीन्य हे प्रकार येतात.

रसेल फ्रे या मानसशास्त्रज्ञ यांच्यानुसार वकील हे pessimistic thinking/ निराशावादी विचार करतात कारण त्यांच्या व्यवसायाला ते आवश्यक आहे मात्र या विचाराच्या पद्धतीमुळे त्यांना औदासीन्य/ depression चा जास्त धोका संभवतो. २०१६ मध्ये अमेरिकन बार असोसिएशन आणि हेझलडेन बेट्टी फोर्ड फाउंडेशनने एक अभ्यास केला होता ज्यामध्ये असे दिसून आले आहे की परवाना धारक व काम करणाऱ्या लोकांमधील 28 टक्के वकील नैराश्याने ग्रस्त आहेत.

वकिलांमध्ये खालील घटकांमुळे औदासीन्य/ depression च जास्त प्रमाण आढळतं.

  • PERFECTIONISM/ परिपूर्णता चा अट्टाहास हा व्यक्तीला कोणत्याही पातळीपर्यंत नेऊ शकतो जे वकिलांच्या बाबतीत हमखास घडतं. बारीकसारीक तपशीलाचा विचार करत, वाईटात वाईट काय होऊ शकत या शक्यता लावताना वकिलांची मानसिकता नकारात्मक होत जाते.
  • SEDENTARY Lifestyle/ बैठे काम जे सतत मेंदूवर ओझं टाकतं असे करताना शारीरिक हालचाली अत्यंत कमी होतात ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. वैमनस्यासंबंधी सतत काम असल्याने तीच वृत्ती त्यांच्या मानसिकतेत झळकते.

सतत गुन्हेगारी, संघर्ष, वाद, भांडण, हिंसा व भ्रष्ट व्यवस्था अशा घटकांच्या सानिध्यात राहिल्याने ताण येणं स्वाभाविक आहे व त्या सगळ्या नकारात्मक भावना वकिलांच्या मनावर खूप खोल परिणाम करतात. आपल्याच सहकारी वकिलांसोबत स्पर्धा व नियमित उत्पन्नाची शाश्वती नसणे या गोष्टी वकिलांच्या ताणात भर टाकतात.

इतर क्षेत्राप्रमाणे nepotism म्हणजे घराणेशाही व स्त्री वकिलांना होणारा जाच हा आहेच. मला तर भारतात एक सुद्धा नामांकित स्त्री वकील आठवत नाही जिचं वर्तमानपत्रात नेहमी नाव छापून येतं.

जेव्हा जॉन्स हॉपकिन्सच्या संशोधकांनी 25 हून अधिक व्यवसायामधील 12,000 कामगारांच्या अनुभवाची तुलना केली, तेव्हा attorney/ वकील यांच्यात नैराश्याचे (इतर व्यवसायांच्या तुलनेत औदासि‍न्याच्या अंदाजे दरापेक्षा तिप्पट) प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे आढळले.

उत्तर कॅरोलिनामधील २५०० हून अधिक वकिलांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की चारपैकी एका वकिलाने नैराश्याची ​​लक्षणे नोंदवली आहेत. जसे की भूक न लागणे, सुस्ती, निद्रानाश किंवा आत्महत्या विचार महिन्यातून कित्येकदा येणे या लक्षणांचा समावेश आहे.

कोविड मुळे वकिलांच्या व्यवसायावर नक्कीच वाईट दिवस झाले आहेत. कारण लहान-सहान कायदेशीर कामे करत कोर्टात मोठ्या संख्येत काम करणारे वकील नक्कीच आर्थिक ताणातून जात असतील ज्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

भारतात व परदेशात कामाची सुरवात ही एखाद्या मोठ्या वकिलाच्या ऑफिसातून करावी लागते व त्यामुळे ज्याप्रमाणे ती व्यक्ती किंवा ते ऑफिस जशी वागणूक देईल त्याप्रमाणे काम कराव लागतं व वकिलांच्या व्यवसायात मुख्य भर हा नफा असल्याने well-being हा मुद्दा कुठेही येत नाही. सतत काम, त्यासाठी ऊर्जा कमी पडते म्हणून व्यसन, अपुरी झोप व नकारात्मक भावनांशी रोजचा संबंध अशा सगळ्या चक्रात वकिलाचं आयुष्य अडकलेलं असतं. मुळात या व्यवसायाची रोजी रोटी ही  भांडणातून व वादातून येते त्यामुळे ते नसतील तर वकिलांना कामच राहणार नाही.

कॉर्पोरेट ची लफडी, घटस्फोट, जमीन व मालमत्ता याचे तंटे, फसवणुकीचे प्रकार, खून, बलात्कार अशा प्रकारचे केसेस हाताळणारे वकील हे नकारात्मकता सोबत घेऊन वावरत असतात व हे करावच लागतं असं म्हणत मानसिक व शारीरिक त्रास सहन करतात. अशा वातावरणात राहून सकारात्मकता कमी होऊन संशय वाढीस लागून वैयक्तिक आयुष्यातील नात्यांवर चुकीचा परिणाम होतो.

कामाच्या वेळा ठरलेल्या नसणे, न्याय व्यवस्थेतील त्रुटी व भ्रष्टाचार यामुळे निकालात असणारी अनिश्चितीता व सतत भावना दाबून ठेवत कायदेशीर तसेच तार्किक विचार केल्याने साचून राहिलेल्या भावनांचा निचरा न झाल्याने वकिलांना भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते.

जज यांना दुसर्‍यांना न्याय देताना किती जास्त ताण येत असेल याची कल्पना करवत नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या भला बुऱ्या चा फैसला जर चुकला तर येणारी अपराधीपणाची भावना त्या व्यक्तीला संपवू शकते त्यामुळेच जज यांच्यामध्ये व्यसन, आत्महत्येची प्रवृत्ती व औदासीन्य हे सगळ्यात जास्त आढळते. भारतात मानसिक आरोग्य हे अजूनही निषिद्ध/ taboo आहे त्यामुळे कायद्याचे क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. कोविड च्या काळात या व्यवसायाला मोठा फटका बसला असून मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत हे वकिलांच्या २०२० मधील आत्महत्या दाखवून देत आहेत.

लोकांच्या आयुष्यातील समस्या कायदेशीर मार्गानी सोडविणाऱ्या वकिलांना स्वत:ची मानसिक आरोग्याची समस्या सोडविणे गरजेचे आहे. त्यांनी जर स्वत:च्या मानसिक आरोग्याच्या समस्या समजून घेतल्या तर या देशात या मानसिक आरोग्यासाठी चांगले कायदे अस्तित्वात यायला वेळ लागणार नाही.

If there were no bad people, there would be no good lawyers: Charles Dickens

-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *