गेल्या आठवड्यात कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या फोगट कुटुंबातील सगळ्यात लहान सदस्यांपैकी एक रीतिका फोगट हिच्या दुर्दैवी आत्महत्येमुळे अवघा देश हळहळला व खेळाडूंचं मानसिक आरोग्य ह्यावर चर्चा सुरू झाली. HBO वर “The weight of Gold” नावाच्या डॉक्युमेंटरी मध्ये ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या काही खेळाडूंनी ह्या पदकाचा भार किती जीवघेणा आहे हे बोलून दाखवल्यावर चकाकतं ते सोनं नसतं ही उक्ती सार्थ ठरते.
मायकल फेल्प्स ह्या सुवर्ण पदक विजेत्या जलतरणपटू ने ह्या डॉक्युमेंटरी मध्ये खेळाडूंचे मानसिक आरोग्य ह्या एका मुद्द्यावर चर्चा करताना खूप वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. हे बघून जेव्हा अमेरिकेतली खेळाडूंना मानसिक आरोग्यासाठी काही मदत मिळत नाही तर भारतातील खेळाडूंची स्थितीची कल्पना करवत नाही.
कुठल्याही ध्येयाने झपाटलेली लोक ते ध्येय पूर्ण झालं की एक पोकळी अनुभवतात. ह्या सगळ्या खेळाडूंची गोष्ट ऐकताना टोकाचा त्याग व संघर्ष ज्यात त्यांचं सगळं बालपण होरपळून निघत व एवढं सगळं मिळवून ही कारकिर्दीचा बहर ओसरल्यावर अनिश्चित भविष्य वाट्याला येतं हे ऐकून धक्का बसतो.
हे बघा
ह्या डॉक्युमेंटरीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे खेळ ह्या व्यवसायातील मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे कारण खेळात शारीरिक क्षमता व मानसिक क्षमता अशा दोन्ही गोष्टींचा कस लागतो.
आयुष्यातील एकमेव ध्येय ऑलिंपिक चे पदक मिळविणे, ते मिळविल्यावर यश, कीर्ति व पैसा ह्यांच्या शिखरावर असूनही मानसिक आरोग्य खालावणे व त्यातून जीवघेणे प्रकार घडणे हे सगळंच धक्कादायक आहे. भारतात जिथे फक्त क्रिकेट ह्या खेळावर पैसा ओतला जातो तिथे इतर खेळाडूंची मानसिक स्थिती कशी असेल ? ज्या मोकळेपणाने मायकल फेल्प्स व इतर व ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेत्यांनी आपल्या समस्या जगासमोर मांडल्या तसं भारतात शक्य आहे का ?
हे बघा
आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे मात्र, भारतात काही क्षेत्र सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.
या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात मानसिक थकवा, ताण, चिंता, व औदासीन्य हे प्रकार येतात.
खेळ हा एक प्रकारचे मनोरंजन असून त्यात खेळणारे व बघणारे हे प्रचंड भावनिक चढ-उतार अनुभवतात. बुद्धिबळ व गोल्फ चा अपवाद वगळता बहुतेक खेळाचे प्रकार (सांघिक व एकेरी) हे वेग, अचूकता व ताकत ह्या बाबींवर आधारित आहेत. शरीर व मेंदू ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय करून कुठलीही हालचाल मोहक व आठवून दिलेल्या पद्धतीने करणे, त्यात उत्कृष्ट होण्यासाठी सराव करणे, शारीरिक ताकत वाढविण्यासाठी योग्य आहार घेणे, झोप घेणे अशा गोष्टी करताना शिक्षणाचे वेळापत्रक सांभाळणे व हे सगळं करण्यासाठी लागणारा पैसा उभारणे हे खेळाडूंसाठी मानसिक रित्या त्रासदायक ठरतं. भारतासारख्या देशात जिथे मानसिक आरोग्यावर बोलणे म्हणजे अजूनही निषिद्ध मानले जाते तिथे खेळाडूंना ज्यांना इतर आवश्यक सुविधा मिळणे कठीणच आहे.
कुठलाही स्पर्धात्मक खेळ खेळताना ताण व चिंता हे असतात. त्या मोक्याच्या क्षणी कठीण भावना कशा हाताळायच्या हे खेळाच्या मानसशास्त्रात शिकवलं जातं. खेळाची गुणवत्ता सुधारणे हे मनाच्या आरोग्यावर जास्त अवलंबून आहे कारण खेळ हा जास्त मानसिक असतो. शारीरिक हालचाली सुद्धा मानसिक ताण किंवा चिंतेमुळे बदलतात किंवा चुकीच्या होतात व त्याचा परिणाम हा खेळाडूच्या कामगिरीवर होतो. खूपच उत्तेजित होणे किंवा अजिबातच ऊर्जा न जाणविणे हे अनेक खेळाडूंच्या बाबतीत घडतं ज्यामुळे मोक्याच्या क्षणी चुका होतात. हे सर्व व इतर अनेक चुका टाळण्यासाठी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात.
महिला खेळाडूंच्या बाबतीत तर आणखी वेगळी आव्हान येतात. भारतात मुलींना गोरा रंग उन्हात सावळा होऊ नये ह्यासाठी अजूनही खेळायला प्रोत्साहन मिळत नाही. एका विशिष्ट प्रकारचे शरीर ज्याची जाहिरात माध्यमातून केली जाते तसे “नाजूक व कमनीय” दिसावे म्हणून स्त्रिया व मुली अनेक विचित्र प्रकार करतात. व्यायाम विशेष करून खेळणाऱ्या मुलींना त्यांच्या वेगळ्या पण मजबूत शरीर रचनेसाठी टोमणे ऐकून घ्यावे लागतात. त्यातून महिला खेळाडूंमध्ये स्वत:च्या शरीराबद्दल वाईट भावना (body dissatisfaction) निर्माण होते. एका विशिष्ट प्रकारचे वजन राहण्यासाठी कमी खाणे व अति व्यायाम करणे (anorexia nervosa), खाऊन ते ओकाऱ्या करून बाहेर काढणे ज्याला bulimia nervosa म्हणतात जे अत्यंत गंभीर असे मानसिक आजार आहेत हे महिला खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
पुरुष खेळाडूंच्या बाबतीत सुद्धा वरील प्रकार घडतात व त्याशिवाय बंदी असलेल्या उत्तेजक पदार्थाचं सेवन, स्टिरॉइड्स चा वापर हा सुद्धा मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. ह्याशिवाय अनेक खेळाडूंना मुळातच व्यक्तिमत्व संबंधित आजार असतात अनैसर्गिक ऊर्जा घेऊन वावरणारे काही खेळाडू ADHD (Attention deficit hyperactivity disorder) म्हणजे अति-चंचल तेच्या आजाराचे चे रूग्ण असतात ज्यात मायकेल फेल्प्स सुद्धा येतो म्हणजे जे सामान्य लोकांना वरदान वाटत तो प्रत्यक्षात ह्या खेळाडूंसाठी शाप असतो. लान्स आर्मस्ट्राँग सारख्या जगजेत्याने जेव्हा स्वत:च डोपिंग ची कबुली दिली तेव्हा त्याच्या अनेक पूर्वसहकाऱ्यानी त्याचा अति-आत्मकेंद्रितपणा, खोटारडेपणा, दुसर्या सहकार्यांना नीट न वागविणे, मतलबी वृत्ती ह्याचे किस्से जगाला सांगीतले पण तो पर्यंत त्याने यश पुरेपूर उपभोगलं होत.
अगदी मोजके खेळ सोडले तर बहुतेक खेळ हे आक्रमक वृत्तीने प्रतिस्पर्ध्याशी लढाई केल्यासारखे खेळले जातात व हाच आक्रमकपणा त्या खेळाडूच्या स्वभावात मुरत जाऊन त्याचा अविभाज्य भाग बनतो. खेळात जिंकणे आवश्यक आहेच परंतु गेल्या काही वर्षात कॉर्पोरेट ने खेळाला व खेळाडूंना निर्दयी आक्रमक बनविले आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंना मानाची वागणूक, खिलाडू वृत्ती, दोस्ती ह्या गोष्टी हद्दपार झाल्यासारख्या आहेत. जिंकण्याच्या नादात खेळाची मज्जा घालवल्याने खेळाडूंना त्या खेळाचा आनंद मिळत नाही.
ह्या आक्रमकतेला व ऊर्जेला मैदानाबाहेर नीट न हाताळता आल्याने अनेक खेळाडू नशेच्या आहारी जातात. लैंगिक स्वरुपाचे गुन्हे, अपघात त्यांच्याकडून घडतात ज्यात त्यांच्या खेळाची व आयुष्याची पण वाट लागते. अशा घटनांमधून बाहेर पडणारे मोजकेच आहेत ज्यात मायकेल फेल्प्स, टायगर वूड्स ह्यांची नाव घेता येतील. मात्र, अशा प्रकारात अनेक खेळाडूंना जीव सुद्धा गमावावा लागला. हे सगळे प्रकार मनाच्या आरोग्याशी संबंधित आहेत व त्याला मानसिक आरोग्य तज्ज्ञ आवश्यक असतात.
अपयश व यश हा खेळाचा अविभाज्य भाग असून त्यासाठी मानसिक तयारी पूर्णपणे केली जात नाही. अपयश हे क्षणिक असून पुढे यश मिळेल अशी मानसिकता तयार करणे, अपयशात खेळाडूंना सांभाळून घेणं, अपयशाचा स्व-प्रतिमेवर परिणाम न होऊ देणं, खेळात अपयश आलं तरी आयुष्यात अनेक संधी येतात व खेळ म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही हे आधी लहानपणीच खेळाडूंच्या मनावर बिंबवायला हवं कारण रितिका फोगट सारखे कोवळे व उदयोन्मुख खेळाडूंचे जीव लाख मोलाचे आहेत ते जपायला हवेत.
आपल्याकडे अजूनही खेळाडूंना मार्गदर्शन करणारी, त्यांच्यासाठी झटणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. जे काही आहे त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व खेळावर प्रेम करणारी लोक काम करत नाहीत. गेल्या काही वर्षात क्रिकेट शिवाय इतर अनेक खेळांना मिळणार महत्व नक्कीच सुखावणार आहे. परंतु तरीही खूप गोष्टी करायची गरज आहे. ज्या खेळाडूंना घरून पाठिंबा आहे त्या खेळाडूंना गोष्टी सोप्या होतात. मात्र, ज्यांचं कुणीही ह्या क्षेत्रात नाही त्यांना योग्य दिशा दाखवणारी यंत्रणा हवीच. आयुष्यातील इतर आव्हानाला जसे व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक व्यवस्थापन ह्या गोष्टी सांगायला व करायला खेळाडूंना आधार हवा. ज्या खेळाडूंना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांनी इतरांना मार्गदर्शन करावे, आपल्या क्षेत्राला रामभरोसे ठेवू नये. अनेक जण आहेत जे स्वत:हून काही चांगल्या गोष्टी करत आहेत पण आणखी करायला वाव आहे.
“Champions aren’t made in the gyms. Champions are made from something they have deep inside them — a desire, a dream, a vision.”
-Muhammad Ali.
-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com