दिलीप कुमार ह्यांना देवदास ह्या सिनेमात काम करताना भूमिकेशी एकरूप होताना औदासीन्य ह्या मानसिक स्थिती चा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी त्या वेळेस लंडन येथे उपचार घेऊन स्वत:ला त्यातून बाहेर काढले. सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर तरी कलाकारांनी मानसिक आजार ह्यावर काही करायला हव होतं जे झालं नाही. दीपिका पदुकोण ने स्वत:च्या मानसिक स्थिती बद्दल सांगून त्यावर काही प्रमाणात जन जागृती सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. कलाकार अनेक वेळा दु:ख लपवून चेहर्यावर हसू आणत आपलं मनोरंजन करतात. मात्र, हे कलाकार आधी माणूस आहेत व त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. स्टेज शो, अवॉर्ड शो ह्यासारख्या गोष्टींना अवास्तव महत्व देणार्या मनोरंजन व्यवसायाने कलाकारांच्या मानसिक आरोग्याचा विचार नक्की करावा…
ख्रिस्तोफर नोलान चा the dark knight चित्रपट अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे ज्यातलं एक कारण हा चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा Heath ledger नावाचा अभिनेता त्या भूमिकेची तयारी करताना त्या भूमिकेत इतका शिरला की त्याला त्याचा मानसिक त्रास व्हायला लागला व त्यासाठी त्याने मानसिक उपचार घेणे सुरू केले. मात्र, दुर्दैवाने चित्रीकरण संपताना त्याला त्याचा जीव मानसोपचाराच्या गोळ्यांच्या अति-सेवनाने गमवावा लागला. जे पात्र तो साकारत होता ते पात्र एका मनोविकृत व्यक्तीचे असून त्या पात्रासाठी तयारी करताना त्याचे मानसिक संतुलन डळमळीत व्हायला लागले व दुर्दैवाने तो त्या पात्राशी एकरूप होताना कुठे थांबायचं हे न कळल्याने जीव गमावून बसला. दिलीप कुमार ह्यांना देखील देवदास ह्या सिनेमात काम करताना भूमिकेशी एकरूप होताना औदासीन्य ह्या मानसिक स्थिती चा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी त्या वेळेस लंडन येथे उपचार घेऊन स्वत:ला त्यातून बाहेर काढले.
आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्रं सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.
या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात भावनिक मेंदूचा अति प्रमाणात वापर झाल्याने येणारा ताण, थकवा व निभावलेल्या पात्राशी एकरूप होत गेल्याने नकळत त्या पात्राचे स्वभाव गुण, भावनिक तसेच शारीरिक ऊर्जा खूप वापरल्या गेल्याने तरतरीत राहण्यासाठी करण्यात येणारी व्यसन हे सगळं येईल.
सादर करणे किंवा सादरीकरणाची काम करणारे लोक अनेक प्रकारे भावनिक चढ-उतार, ताण व त्यामुळे येणारा प्रचंड थकवा अनुभवतात.
तोंडावर रंग लावून लोकांसमोर खोट वागणं असं समजणार्या लोकांना अभिनय किती त्रासदायक असू शकतो हे कळूच शकत नाही. अभिनय म्हणजे विविध भावना चेहऱ्याद्वारे व आवाजा द्वारे लोकांसमोर शेकडो/ हजारो लोकांसमोर आपलं शरीर भांडवल म्हणून वापरून कमालीची शारीरिक व मानसिक ऊर्जा ओतून करणारी क्रिया आहे ज्यात आपल्यासारखी नसणारी व्यक्तिरेखा म्हणून वावरणं व लोकांना ते पटवून देणे, त्यांचं मनोरंजन करण पण येतं.
ब्लॅक स्वान ह्या सिनेमात एक बॅले नर्तिका अभिनयाचं अत्युच्य शिखर गाठताना मानसिक अस्थिरता अनुभवते. मात्र, नृत्याच्या प्रयोगात ती अभिनयाची अत्युच्य सीमा गाठत स्वत: ला जखम करून घेते. हा सिनेमा बघताना अभिनय करणे किती कठीण होऊ शकते व नीट रेषा न आखल्यास real व reel ह्यांची सरमिसळ होऊन मानसिक गोंधळ कसा निर्माण होऊ शकतो हे लक्षात येत.
अभिनय करणारे हे इतर सामान्य लोकांच्या तुलनेत औदासीन्य दुहेरी प्रमाणात अनुभवतात असे ऑस्ट्रेलिया च्या एका २०१५ च्या संशोधनात आढळून आले आहे. कमी पैसा, असुरक्षितता, व सादरकीरणाच्या वेळी येणारा ताण व चिंता ह्यामुळे अभिनय करणारे अनेक मानसिक आजार वारंवार अनुभवतात.
अत्यंत कठीण भूमिका किंवा हलकी फुलकी भूमिका जरी असली तरी त्या पात्राशी एकरूप होताना बहुतेक वेळा अभिनेत्री/ अभिनेता हे रोज एक वेगळं रूप घेऊन वावरतात ज्यात त्या भूमिकेत शिरताना त्या पात्राचे हाव भाव, आवाजातील चढ उतार, ते पात्र अनुभवत असलेल्या भावना हे सगळं अनुभववावं लागत आणि भावना ह्या शारीरिक बदल घडवत असल्याने स्वत:च्या भावना व पात्राच्या भावना अशी दुहेरी भावनिक कसरत अभिनय करताना त्या व्यक्तीची होते. त्यामुळे अभिनय संपल्यावर त्या भूमिकेतून बाहेर पडणं ह्याची शास्त्रोक्त पद्धत माहित नसल्याने बहुतेक वेळा परफॉर्मन्स झाल्यावर सुद्धा त्या भूमिकेतून बाहेर न पडू शकल्याने भावनिक आंदोलन शमविण्यासाठी दारूचा आधार घेतला जातो. (चला हवा येऊ द्या व इतर अनेक कार्यक्रमात कलाकारांचे दारू वरचे विनोद ऐकल्यावर ह्याचा पुरावा मिळतो). या कारणाने अत्यंत हिंसक, विकृत भूमिका साकारणारे कलाकार त्या भूमिकेतून नकळत नकारात्मक भावना शोषून घेतात, त्या पात्राचे गुणधर्म कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा भाग सुद्धा होतात. अनेक कलाकार अशा भूमिका साकारल्यानंतर Post Dramatic stress अनुभवतात.
Konstantin Stanislavsky ह्या रशियन दिग्दर्शकाने प्रथम emotional memory “भावनिक स्मरणशक्ती ” यासारख्या पद्धती वापरल्या. भीती समाविष्ट असलेल्या भूमिकेची तयारी करण्यासाठी, अभिनेत्यास काहीतरी भयावह आठवाव लागेल, आणि त्या भीतीच्या भावनांच्या परत जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या त्यांनी आधी अनुभवल्या आहेत असे सांगीतले व ही पद्धत जी पुढे अमेरिकन सिनेमाने Method Acting म्हणून लोकप्रिय केली ज्यात कलाकाराला आलेले अनुभव तो एखादं पात्र रंगविताना वापरत असतो. मात्र, ह्या पद्धतीने कलाकाराच्या खऱ्या व पडद्यावरील/ रंगमंचावरील व्यक्तिमत्वातील सीमा रेखा धूसर होत जाते व कलाकाराच्या भावनिक विश्वात उलथा पालथ व्हायला सुरवात होते. एखादं दु:खी किंवा निराश पात्र रंगविताना स्वत:च्या जुन्या दुखद आठवणी चा रवंथ करत कलाकार लवकर औदासिन्याच्या आजाराला जवळ करतात.
Method acting चे दुष्परिणाम हे जवळपास सर्वच कलाकारांत सारखेच आढळून येतात. खालील दुष्परिणाम हे बहुतेक सगळ्याच कलाकारांना अनुभवायला मिळतात.
थकवा
भीती
चिंता
लाज
झोपेची कमतरता
व्यक्तिमत्व बदलते
मानसिक विकार
Empathetic Emotional Memory ह्या प्रकारात पात्राला काय वाटते हे समजून त्याप्रमाणे भावना अनुभवताना सुद्धा कलाकाराला अनेक वेळा नको तितके भावनिक चढउतार अनुभवास येतात.
२०१५ च्या एका संशोधनात ८०,००० जनुकांचा चा अभ्यास करताना असे लक्षात आले की नृत्य, अभिनय, संगीत आणि लेखन ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये bipolar disorder व schizophrenia ह्या दोन आजारांचे जनुक साधारण व्यक्तीच्या तुलनेत २५% जास्त प्रमाणात आढळून आले. कदाचित अनेक मोठ्या कलाकारांमध्ये bipolar disorder ही मानसिक स्थिती आढळून येते. गेल्या वर्षी मृत पावलेल्या हिंदी सिनेमातील हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूत ह्याच मानसिक स्थिती चा सामना करत होता. दुर्दैवाने भारतातील मानसिक आजाराबद्दलच लोकांचं मत हे इतकं चुकीचं आहे की अंधश्रद्धा चालतील पण मनाच्या आजारांवर वैज्ञानिक उत्तर व उपाय चालत नाहीत. अजूनही ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यूचं भांडवल केलं जातेय ते बघून वाईट वाटतं.
सगळ्या सर्जनशील काम करणार्यांना bipolar disorder होत नाही व सगळे bipolar disorder असणारी लोक सर्जनशील काम करत नाहीत पण तरीही सर्जनशीलता आणि bipolar disorder च्या जनुकांमध्ये संबंध आढळून आला आहे.
आत्मकेंद्रितपणा किंवा narcissism असणार्या लोकांमध्ये स्व प्रतिमा दुबळी असून स्वत:ची प्रशंसा केल्याने त्यांना छान वाटतं त्यामुळे अनेक कलाकार हे कमालीचे आत्मकेंद्री/ narcissist असतात व प्रेक्षकांकडून मिळणार्या स्तुती व लक्ष ह्यांचा प्राणवायू असतो. त्यामुळे अनेक कलाकार ह्या लोकप्रियतेच्या खोट्या प्राणवायूवर जगत राहतात व शेवटच्या काळात ते न मिळाल्याने वैफल्य अनुभवतात. सुचित्रा सेन ह्या बंगाली अभिनेत्रीच उदाहरण हे एकमेव असावं की ज्यात अत्यंत सुंदर, यशस्वी व लोकप्रिय अभिनेत्रीने अभिनय सोडून रामकृष्ण मठात आपले शेवटचे आयुष्य घालवलं व पुन्हा कधीच स्वत:चा चेहरा जगाला दाखवला नाही. याच्या अगदी विरुद्ध मराठीतील अत्यंत लोकप्रिय नाट्य व सिनेमा कलावंत डॉ. काशिनाथ घाणेकर ह्यांच खरं आयुष्य लोकप्रियतेच्या लाटेत स्वत:ला उद्ध्वस्त करणाऱ्या कलाकाराची कथा आहे. सिनेमात दाखवल्याप्रमाणे वडीलांकडून न मिळालेले पण हवं असलेले प्रेम हे प्रेक्षकांकडून मिळवण्याच्या नादात डॉ. घाणेकरांचा तोल ढळतो.
ADHD/Attention Deficit Hyperactivity disorder ह्या आणखी एका मानसिक स्थितीचा सर्जनशील व्यक्तींमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येतो. ह्या अति चंचलतेच्या आजारात व्यक्ती एका जागी फार काळ स्थिर बसू शकत नाही व कमालीची ऊर्जा असलेली व्यक्तिमत्व सर्जनशील क्षेत्रात अत्यंत यशस्वी होतात.
Gillian Lynne ह्या जगप्रसिद्ध बॅले नृत्यांगना जी The Phantom of Opera साठी प्रसिद्ध आहे हिला ADHD होता.
भारतीय सिनेमा च्या बाबतीत बोलायचं झालं तर पुरुषांपेक्षा स्त्री कलाकार ह्या जास्त मानसिक त्रास सहन करतात. ह्याचं सगळ्यात मोठं कारण हे स्त्रीच वस्तूकरण होय. भारतीय सिनेमाच्या चौकटीतील कथा ज्यात स्त्री कलाकारांना सुंदर म्हणजे गोर व सुडौल दिसणं सगळ्यात महत्त्वाचं मानलं जात तिथे सतत ठरवून दिलेल्या सौंदर्याच्या चौकटीत बसताना अनेक शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते ज्यात स्त्री कलाकार हॉर्मोन्स चे इंजेक्शन, त्वचा गोरी करून घेणं, चेहरा व शरीराच्या शस्त्रक्रिया सतत करत राहणं, फॅड डायट करणे, व्यायाम अशा अनेक गोष्टी करत स्वत:च्या शरीराविषयी घृणा, असमाधान ह्या गोष्टी अनुभवतात. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी ने 20 च्या वर शस्त्रक्रिया केल्याची चर्चा होती.
गेल्या काही वर्षात मात्र मोजक्या अभिनेत्रींनी यावर आवाज उठविला आहे. स्वत:च्या शरीराविषयी चांगले न वाटणे हे अनेक मानसिक आजारांना निमंत्रण देते ज्यात औदासीन्य, चिंता, शरीराची चुकीची प्रतिमा (body dysmorphic), anorexia nervosa, bulimia nervosa असे वजन कमी ठेवताना होणारे आजार ह्यांचा समावेश आहे.
भारतीय मनोरंजन क्षेत्रात कथेपेक्षा बाह्य रुप, ग्लॅमर ह्यांना जास्त महत्व दिल्याने कलाकार एका विशिष्ट वयापर्यंत काम करतात कारण प्रेक्षकांना पण सतत नवीन चेहरे बघायला आवडतात. मेरील स्ट्रीप सारख्या भूमिका किती भारतीय स्त्री कलाकारांना मिळतात व किती जणी आपलं हिरोईन च ग्लॅमर बाजूला ठेवून वयानुसार विचारपूर्वक अशा भूमिका निवडून करियर घडवितात?
व्यसन आणि कलाकार ह्यांचा जवळचा संबंध आहे. सर्जनशीलता वाढविण्यासाठी व कामाचा ताण घालविण्यासाठी जगातील कलाकार दारू, तंबाखू व अंमली पदार्थांचा उपयोग करतात. हॉलिवूड मधील अनेक नामवंत कलाकार ज्यात रॉबर्ट डाउनी जुनियर पण येतात हे दारू व अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्यातले अनेक कलाकार पुनर्वसन केंद्रात जाऊन उपचार घेऊन बरे होतात व ते जगासमोर मान्य पण करतात, त्यावर जागृती आणायचं काम देखील करतात. भारतात व्यसन हे वाईट सवय व आनंदाच साधन समजून कलाकार त्यांच्या दुष्परिणामानांकडे दुर्लक्ष करतात.
व्यसन व मानसिक आजार हे केवळ अभिनय करणाऱ्या कलाकारांपुरते मर्यादित नसून अनेक प्रतिभावंत गायक, संगीतकार, चित्रकार सुद्धा व्यसनाच्या आहारी जाऊन जीव गमावल्याची उदाहरण सापडतात. Vincent van Gogh (चित्रकार) तसेच Kurt Cobain, Jimi Hendrix, Janis Joplin and Jim Morrison व Amy Winehouse अशी अनेक संगीत क्षेत्रातील प्रतिभावंत अकाली हे जग सोडून गेलेत. कलेसाठी प्रेरणा व कल्पना यासाठी पण दारू व अंमली पदार्थाचं सेवन बरेच कलाकार करतात.
अनेक कलाकारांमध्ये आनंदाची अनुभूती देणारे डोपामिन हे कमी प्रमाणात स्त्रवत त्यामुळे आनंदाची अनुभूती वाढविण्यासाठी व कामाची वेगळी उंची गाठण्यासाठी अशी लोक वेगवेगळे व तीव्र व्यसन अनुभवतात.
सोशल मीडिया आल्यापासून कलाकारांच्या मानसिक त्रासात ट्रोलिंग ची भर पडली आहे. अनेक कलाकारांनी ट्रोलिंग ला कंटाळून सोशल मिडिया सोडलं सुद्धा आहे.
भारतात अजूनही मनोरंजन क्षेत्र अत्यंत बेभरवशी आहे. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे अनेक अनैतिक प्रकार सुद्धा या क्षेत्रात आहेत ज्याला बळी पडलेल्या लोकांना आणखी वेगळे मानसिक त्रास भोगावे लागतात. कामाच्या विचित्र वेळा ज्यात झोप पूर्ण होत नाही, अनेकांचे मूड सांभाळत काम करत राहणं, लोकांच्या समोर सतत स्वत:चा मानसिक तोल सांभाळत वावरणं, सतत बोलणं, प्रेक्षकांची मर्जी सांभाळणं अशा मुळे होणारे “भावनिक श्रम” कलाकारांचा थकवा वाढवितात.
सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर तरी कलाकारांनी मानसिक आजार विशेष करून कलाकारांचे मानसिक आजार ह्यावर काही करायला हव होत जे झालं नाही. दीपिका पदुकोण ने स्वत:च्या मानसिक स्थिती बद्दल सांगून त्यावर काही प्रमाणात जन जागृती सुद्धा करण्याचा प्रयत्न केला ज्याचं पुढे तिच्यावरील झालेल्या काही आरोपांमुळे तिने ह्या विषयावर सध्या तरी बोलणं बंद केल आहे.
सतत प्रकाश झोतात राहणं हे अत्यंत कठीण काम आहे. कलेला व कलाकाराच्या आयुष्याची दु:खी बाजू सुद्धा आहे. आपल्याला सतत त्यांच्या कामातून आनंद देणारे कलाकार हे अत्यंत असुरक्षितता व बेभरवशाच आयुष्य जगतात.
कलाकार अनेक वेळा दु:ख लपवून चेहर्यावर हसू आणत आपलं मनोरंजन करतात. मात्र, हे कलाकार हे आधी माणूस आहेत व त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्टेज शो, अवॉर्ड शो ह्यासारख्या गोष्टींना अवास्तव महत्व देणार्या मनोरंजन व्यवसायाने कलाकारांच्या मानसिक आरोग्याचा विचार नक्की करावा.
“You pray for rain, you gotta deal with the mud too.”: Denzel Washington.
-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com