जेम्स फालन ह्या संशोधकाने १८ वर्ष अभ्यास करून माथेफिरू/ Psychopaths व हुकूमशहा ह्यांच्यातील काही साम्य स्थळं दाखवून दिली आहेत. त्यांच्या मते हुकूमशहा हे यशस्वी माथेफिरू जे सहसा मोहक, करिश्माई आणि बुद्धिमान असतात. ते आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने भुरळ पाडतात आणि लैंगिक उर्जा मिरवतात. ते अत्यंत आत्मकेंद्री, चतुर, खोटारडे, सॅडीस्टीक म्हणजे दुसर्याच्या दु:खातून आनंद घेणारे आणि सत्तेची असीम भूक असणारे असतात. लिबियाचा मुअम्मर अल-गद्दाफी हा कमालीचा आत्मकेंद्री, संशयी व सत्तेचा भुकेला होता, तर ओसामा बिन लादेन भव्य-दिव्यतेचे वेड असलेला, सूड घेऊ, मोहक व दुसर्याच्या दु:खातून आनंद घेणारा होता. हिटलर वर सुद्धा अनेक विश्लेषण आहेत ज्यात त्याच वर्णन कमालीचा असुरक्षित, वेडसर, संशयी व सूड घेऊ वृत्तीचा असं केलेलं आहे…
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी एका मुलाखतीत मानसिक आरोग्य कसे महत्त्वाचे आहे व मोठ्या पदावर काम करताना मानसिक आरोग्यावर कसा ताण पडतो हे सांगताना त्यांचं कुटुंब विशेष करून पत्नी मिशेल ओबामा ह्यांची साथ प्रसिद्धी व सत्ता सोबत असताना किती महत्त्वाची ठरली हे नमूद केले. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेताना दररोज संध्याकाळी वेळेत काम संपवून ६.३० ला कुटुंबासोबत जेवणासाठी एकत्र येणे (काही आपत्कालीन स्थिती नसेल तर), गप्पा मारणे ज्यामुळे कामाचा ताण कमी व्हायला मदत व्हायची व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी न चुकता व्यायाम करणे ह्या गोष्टी ओबामा यांनी ताण तणावांचे नियोजन करण्यास उपयोगी पडतात असे सांगीतले. एका अत्यंत साधारण परिस्थितीतून जगातील महासत्तेचा अध्यक्ष होणे हा प्रवास आयुष्याचा तोल न बिघडवता संपूर्ण करणे सोपे नव्हते. मात्र, आजूबाजूला सगळे मोह माया असताना तोल न ढळू देता ग्रेस व डिग्निटी ने त्या पदावरून निवृत्त होणे हे सोपे नव्हते पण ओबामानी हा चमत्कार करून दाखविला.
राजकीय नेते पद हे पण एक प्रकारचे व्यावसायिक काम आहे हे कदाचित बहुतेक नेतेमंडळी मान्य करणार नाहीत. ती एक प्रकारची भूमिका आहे ज्यात काही विशिष्ट जबाबदारी पार पाडावी लागते. कुठल्याही नेत्याला (राजकीय, व्यावसायिक, सैन्य दल) इतरांच्या तुलनेत जास्त व्यावसायिक धोके असतात जे शारीरिक व मानसिक पण असतात. शारीरिक धोके तर आहेतच ज्यात आत्मघाती हल्ले सुद्धा येतात. नेत्यांचे मानसिक धोके जास्त घातकी आहेत कारण सध्याच्या जगात नेतेगिरी ही “मानसिक व बौद्धिक” असून शारीरिक ताकत फारच कमी महत्त्वाची असते. नेत्यांची ताकत ज्याला पावर म्हणता येईल ती मानसिक आहे कारण आता रणांगणावर युद्ध खेळून नेतेपद मिळत नाही तर जितका लोकांवर प्रभाव जास्त तितका नेता लोकप्रिय असतो.
काही विशिष्टच लोकांना राजकारणाचे आकर्षण असते तर काही लोक जन्मत: मुत्सद्दी असतात जे राजकारणात फार उपयोगी ठरतं. (माझ्यात दोन्ही गोष्टी नाहीत). राजे राजवाडे पासूनच राजकारणाचा इतिहास हा “सत्ता व प्रसिद्धी” ह्या दोन गोष्टींच्या आजूबाजूला फिरतो.
जे. के. रोवलिंग ह्यांचं एक सुंदर वाक्य हॅरी पॉटर ह्या चित्रपटात आहे जे हॅरी चे शिक्षक अलबस डंबलडोर त्याला सांगतात.
Perhaps those who are best suited to power are those who have never sought it. Those who, like you, have leadership thrust upon them, and take up the mantle because they must, and find to their own surprise that they wear it well.
ज्या सर्व कामात लोकांशी संबंध येतो अशा सर्व कामात “भावनिक बुध्यांक” अत्यंत महत्त्वाचा ठरतो किंबहुना त्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही. राजकारण हे मानवी नात्यांचं सगळ्यात भयंकर रूप म्हणता येईल व “जन मानसाची नाडी” अचूक ओळखणारा सर्वात यशस्वी ठरतो.
आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्र सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.
या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात एकटेपणा, संशयी वृत्ती इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
Adam Galinsky या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या “Power and Perspectives Not Taken” संशोधनात पावर/सत्ता असणार्या लोकांना इतरांचा दृष्टिकोन समजून घेणं, इतरांच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेणे व इतरांच्या भावनांना अर्थ लावणे ह्या गोष्टी जमत नाही असे सिद्ध केले.
Tom Reader ह्यांनी सिद्ध केले की सत्ता/पावर आल्यावर स्त्री व पुरुष दोघांमध्येही “इतरांपासून वेगळं असण्याची भावना व एकमेव द्वितीय असण्याची भावना” वाढीस लागते. सत्ता असणारी लोक दुसर्यांच्या भावनांकडे विशेष लक्ष देत नाही कारण त्यांना आपण ह्या भावना प्रभावित करू शकतो ह्याची जाणीव असते.
The Crown या ब्रिटिश राजघराण्यावर आधारीत मालिकेत सत्तेचे अनेक वेगळे पैलू बघायला मिळतात ज्यात एका ठिकाणी लंडन च्या राणीचे काका तिला सांगतात की मुकुट हा काटेरी असून त्याच्या वजनाने व्यक्ती एक संकरित प्राणी/ Hybrid Creature म्हणून वावरते (जसे नरसिंह किंवा गणपती) त्याप्रमाणे एकदा मुकुट घातल्यावर व्यक्ती स्वत: पेक्षा त्या मुकुटाला जास्त मान देते किंबहुना द्यावा लागतो व ती व्यक्ती परत पूर्वीसारखे साधारण आयुष्य जगू शकत नाही.
हे बघा
https://www.youtube.com/watch?v=M1vOIAnnjHc&t=2s
हा सत्तेचा मुकुट काही लोकांना वंश परंपरेने मिळतो तर बहुतेकांना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मुकुट किंवा खुर्ची चा मोह काही लोकांनाच का होतो ? काही लोक सत्तेचा सकारात्मक वापर करतात. मात्र, बरेच त्या सत्तेच्या लख-लखाटात स्वत:ला विसरतात व सत्ता साम, दाम, दंड व भेद या मार्गांनी मिळवूनही हुकूमशाही चे नवे पायंडे पाडतात, जे आपण सध्या जगात अनेक ठिकाणी बघतच आहोत. असे का होत असेल ह्याचे उत्तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात दडले आहे.
जेम्स फालन ह्या संशोधकाने १८ वर्ष अभ्यास करून माथेफिरू/ Psychopaths व हुकूमशहा ह्यांच्यातील काही साम्य स्थळं दाखवून दिली आहेत. त्यांच्या मते हुकूमशहा हे यशस्वी माथेफिरू जे सहसा मोहक, करिश्माई आणि बुद्धिमान असतात. ते आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने भुरळ पाडतात आणि लैंगिक उर्जा मिरवतात. ते अत्यंत आत्मकेंद्री, चतुर, खोटारडे, सॅडीस्टीक म्हणजे दुसर्याच्या दु:खातून आनंद घेणारे आणि सत्तेची असीम भूक असणारे असतात. त्यांच्या अभ्यासानुसार लिबियाचा मुअम्मर अल-गद्दाफी हा कमालीचा आत्मकेंद्री, संशयखोर व सत्तेचा भुकेला होता तर ओसामा बिन लादेन भव्य-दिव्यतेचे वेड असलेला, सूड घेऊ, मोहक व दुसर्याच्या दु:खातून आनंद घेणारा होता. हिटलर वर सुद्धा अनेक विश्लेषण आहेत ज्यात त्याच वर्णन कमालीचा असुरक्षित, वेडसर, संशयी व सूड घेऊ वृत्तीचा केलेलं आहे. या बहुतेक लोकांची बालपण अत्यंत वाईट होती ज्यात मानसिक व शारीरिक सुरक्षा अजिबातच नव्हती व काही विशिष्ट जनुक सुद्धा अशा वर्तणुकीला जबाबदार असल्याचे आढळले.
वरील वर्णन वाचल्यावर असं लक्षात येत की ही सगळी मंडळी फक्त स्वत:साठी, स्वत:च्या लहानपणी पूर्ण न झालेल्या गरजा ह्या सत्तेच्या मार्गातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिली ज्याने जगाचा इतिहास बदलला व करोडो लोकांच जीवन उद्ध्वस्त झालं.
अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आल्यावर अनेक मानसशास्त्रज्ञानी त्याच मनोवैज्ञानिक विश्लेषण केलं आहे व त्यावर पुस्तकं सुद्धा निघालेत. त्यांच्या मते ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्व हे लोक हितकारक कार्याच्या दृष्टीने योग्य नाही कारण बालपणाच्या आघातामुळे त्याच व्यक्तिमत्व नकारात्मतेकडे झुकत.
हे बघा
https://www.youtube.com/watch?v=Vj5WUKT5eaw&t=19s
सिमोन सिनेक ह्या व्यवस्थापनाच्या विशेषज्ञानुसार हुकूमशहा हे त्या समाजाचे प्रतीक असतात व तिथली जनता ही हुकूमशहा निर्माण होण्यासाठी तितकीच जबाबदार असते.
हे बघा
https://www.youtube.com/watch?v=trdCwScRxzI
लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या नेत्यांना सुद्धा सत्ता बदलविते. लोकशाही मार्गाने काम केले तरी ज्या व्यवस्थेत काम करतो ती असंख्य लोकांनी बनलेली आहे त्यामुळे त्यांना सोबत घेऊन काम करणे हे अनेकांचा उद्देश चांगला असला तरी होत नाही. सतत बुद्धीबळाच्या पट मांडून बसलेली, शह-काटशह करत सत्तेचा चाबूक आपल्या हाती ठेवत ही मंडळी वाटचाल करत असतात. त्यामुळे 24 तास ही मंडळी राजकारणी म्हणून नाइलाजाने वावरतात. गुप्तता बाळगत अनेक गुपितं पोटात बाळगणे, अगदी जोडीदाराला सुद्धा न सांगू शकणे या कारणाने मन कुणाकडे मोकळे न करू शकल्याने बहुतेक वेळा भावनांच्या लाटा थोपवण्यासाठी दारू व सिगरेट चा आधार हमखास घेतला जातो. सत्तेसोबत प्रसिद्धी ही आणखी एक नशा जी सत्तेपेक्षा जास्त घातक आहे ती सुद्धा राजकीय नेत्यांना मारक ठरते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारी ही मंडळी लोकांच्या स्वीकृतीसाठी सुद्धा अनेक वेळा “स्व” शी तडजोड करत केवळ सामाजिक आयुष्य जगतात. ह्यांच्या आजूबाजूची मंडळी सुद्धा बहुतेक या लोकांना परिस्थिती न सांगता ह्यांच्या अंहकार कुरवाळत ठेवतात त्यामुळे एकटेपणा हा अत्यंत मोठा मानसिक त्रास ही मंडळी लाखो-करोडो लोक आजूबाजूला असताना भोगतात.
Nearly all men can stand adversity, but if you want to test a man’s character, give him power-Abraham Lincoln.
गेल्या दशक भरातील संशोधन असं सांगत की पावर/ सत्ता ही व्यक्तीच्या मेंदूवर व शरीरावर परिणाम करते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच हृदय हे वेगळ्या पद्धतीने रक्त फेकतं व मेंदूतील pre-frontal cortex म्हणजे तार्किक मेंदूची रचना सुद्धा वेगळी असते व त्यांची तार्किक बुद्धी जास्त तीक्ष्ण असते. हे परिणाम ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला हितकारक असले तरी आजूबाजूच्या लोकांना मात्र उपयोगाचे नसतात कारण सत्ता असलेल्या व्यक्तीत ढोंगीपणा, नैतिक अपवाद वाद, अहंकारीपणा आणि सहसंवेदनेचा अभाव ह्या गोष्टी वाढीस लागतात. सहसंवेदनेचा अभाव व अंहकारापण असल्याने लोक ही लोकांना हाडा मासाची व्यक्ती न समजता वस्तू समजतात ज्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरता येतं. डेबोरा ग्रॅनफेल्ड/ Deborah Grunfeld व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात केलेल्या एका संशोधनात आढळून आले की अगदी सर्वसाधारण लोकांना सत्ता दिली तरी ते तत्काळ इतर लोकांना वस्तू समजू लागतात. अशी लोक काम असेल तरच इतरांशी संपर्क ठेवतात असेही या प्रयोगात आढळून आले.
D.G. Winter ह्यांनी मिशिगन विद्यापीठात केलेल्या संशोधनात 1973 साली खालील गोष्टी आढळून आल्या. त्यांनी त्या काळी वापरलेली संशोधनाची पद्धत वादातीत असली तरी त्यात आढळून आलेल्या निरीक्षणांना इतर काही संशोधनामुळे पुष्टी मिळाली आहे.
- मजबूत, मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या बलवान, कृती करणे.
- न मागता मदत किंवा सल्ला देणे.
- जे काय करीत आहे ते नियंत्रित करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे.
- दुसर्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्याचा, लाच घेण्याचा किंवा वाद घालण्याचा प्रयत्न करणे.
- प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे.
- एकांगी मार्गात इतरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया किंवा भावना जागृत करणे.
- प्रतिष्ठा आणि / किंवा प्रतिष्ठा संबंधित अतिशय काळजी घेणे.
सत्ता हवी असणारे व नसणारी लोक ही इतरांच्या चेहर्यावरचे हाव-भावांचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करतात हे देखील एका संशोधनात आढळून आलेलं आहे.
सत्ता/पावर (राजकीय/अराजकीय) असलेली व्यक्ती ही भ्रष्टाचार फार लवकर करू शकते तसेच सत्ता मिळाली की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन च्या पातळीत वाढ होते.
Henry Kissinger/ हेनरी किसिंगर ह्यांच्या मते सत्ता सारखं दुसरं कामोत्तेजक/ aphrodisiac नाही पण ह्या गुणधर्मामुळे सत्तेतील लोकांना सहसंवेदना कमी असते व हुकूमशाहीला तर ती अजिबातच नसते. महात्मा गांधी काहींच्या मते अयशस्वी राजकारणी होते. मात्र, ज्या संशोधकांनी Mirror neurons चा शोध लावला त्यांनी सहसंवेदनेसाठी आवश्यक असणारे mirror neurons ला Gandhi Neurons नाव दिले. याचा अर्थ असा की सहसंवेदना व सत्ता हे एकत्र नांदू शकत नाही. नाइलाजाने का होईना सत्ता आली की सहसंवेदना कमी होतेच
सहसंवेदना ही दोन घटकांनी मिळून बनलेली आहे
१. इतरांना जे वाटते ते वाटणे किंवा सामायिक करणे.
२. त्या भावनांचा अर्थ काय आहे हे समजून घेणे.
सत्ता/पावर असणारी लोक बहुतेक पहिल्या घटकाकडे लक्ष देत नाही त्यामुळे लोकांशी स्वत: ला जोडणे होत नाही व दुसर्या घटकाचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतात. भारतात गेल्या काही वर्षातील राजकारण हे अत्यंत संवेदनाहीन झालं असून मोजके लोक सोडलीत तर सहसंवेदना असणारी नेते मंडळी अस्तित्वात नाहीतच. ह्या मोजकी मंडळीची मज्जा घेतली जाते कारण सध्या क्रौर्य, द्वेष व मूर्खपणा म्हणजे राजकारण असा बहुतेक लोकांचा समज झाला आहे.
स्टॅनफर्ड विद्यापीठातील जमील झाकी ह्या प्राध्यापकांच्या मते सहसंवेदना ही शरीरातील स्नायूसारखी असून तिला वापरली नाही तर ती हळूहळू नष्ट होऊ शकते.
सत्ता/पावर ही राजकीय, अराजकीय, कॉर्पोरेट, पैसा किंवा अगदी सोशल मीडिया च्या अंनुसारकांमुळे/followers नी मिळणारी प्रभावाची सुद्धा असू शकते व हे सगळे मेंदूत वर लिहिलेले बदल घडवतात. त्यामुळे हजारो//लाखो/ करोडो अनुसारक असलेले सोशल मीडिया वरील influencers ही सुद्धा सत्ता/ पावर अनुभवतात व अनुसारक कमी झाले की चिंता, ताण व औदासीन्य अनुभवतात.
वरील नमूद केल्याप्रमाणे सत्ता ही पुरुष व स्त्री दोन्हीमध्ये शारीरिक व मोठ्या प्रमाणात मानसिक बदल घडवते त्यामुळे सत्ता गेली तर कुठलीही नशा उतरल्याप्रमाणे व्यक्ती औदासीन्य अनुभवते, वैफल्यग्रस्त होते जे आपण डोनाल्ड ट्रम्प व इतर अनेक राजकारणी, अनेक कॉर्पोरेट चे CEO याचं बघत आहोत.
सत्तेमुळे नशेच्या साधनाप्रमाणे मानवी मेंदूतील आनंदाचे केंद्र उत्तेजित करून डोपामिन स्त्रवतं व त्यामुळेच “हाय” ची जाणीव होते.
Leadership is not about a title or a designation. It is about impact, influence, and inspiration. Impact involves getting results, influence is about spreading the passion you have for your work, and you have to inspire team-mates and customers. –Robin S. Sharma
वरील व्याख्येप्रमाणे केवळ महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग जु. हे फक्त लीडर आहेत उरलेले राजकीय नेते जे सत्ता/पावर उपभोगतात त्यांच्यात वरील नमूद केल्याप्रमाणे बदल घडून येतात पण ते कसे हाताळले जातात हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
खुर्चीमुळे लोकांच्या स्व-प्रतिमेत फरक पडतो, लोकांचे स्वत:बद्दलचे भ्रम वाढीला लागतात. मात्र, खुर्ची ने साथ सोडली की लोक सैरभैर होतात. म्हणून बहुसंख्य निवृत्त झालेल्या लोकांना खूप त्रास होतो.
गेल्या काही वर्षात कॉर्पोरेट मध्ये महत्त्वाच्या पदावर काम करणार्या लोकांनी आपली लीडरशिप स्टाइल बदलायला सुरवात केली असून मानसिक आरोग्याला महत्व देणे, सहसंवेदना वापरून काम करणे व अल्फा मेल च्या भूमिकेतून बाहेर पडून वर्षानुवर्षे ठरवलेल्या साचेबद्ध चौकटी मोडून नवीन वर्तणुकीचे धडे आत्मसात करायला सुरवात केली आहे. भारतातील सध्याची राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे जुन्या विचारसरणी मोडून नवीन पद्धतीने समस्यांवर तोडगा काढणे हे नेत्यांना कळायला हवे.
भारतातील सध्याची मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे त्यामुळे जोपर्यंत ही मंडळी स्वत:च मानसिक स्वास्थ्य नीट ठेवत नाही तोपर्यन्त ह्यांच्या जनतेचे मानसिक स्वास्थ्य नीट राहणार नाही.
“Money and success don’t change people; they merely amplify what is already there.”: Will Smith.
-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com