# डॉक्टरांचे मानसिक आजार -प्रा.डॉ. वृषाली राऊत.

आपल्याला एक दिवस हॉस्पिटल मध्ये नेलं तर तिथल्या वातावरणामुळे कसतरी होतं. औषधांचा वास, रुग्णांच्या वेदना व दु:ख, पडलेले चेहरे, नातेवाईकांची कुरकुर हे बघत रोज कोणाच्या तरी आयुष्याचं ओझं खांद्यावर घेऊन फिरणार्‍या डॉक्टर्स ला किती ताण येत असेल याचा विचार करवत नाही. औदासीन्य, बर्न आऊट व त्या अनुषंगाने होणार्‍या आत्महत्या हा भारतीय डॉक्टर्स मध्ये आढळून येणारे प्रमुख मानसिक आजार आहेत. The Indian Journal of Psychiatry च्या संशोधनानुसार ३०% डॉक्टर्स औदासीन्य अनुभवतात, १७% डॉक्टर्स आत्महत्येचा विचार मनात आणतात तर ८०% डॉक्टर्स हे शिक्षण व करिअर च्या सुरवातीला कामाच्या ओझ्याने बर्न आऊट अनुभवतात.

“वो बाहर casuality में कोई मरने की हालत में राहा… तो उसको फॉर्म भरना जरुरी हैं क्या ?? “असं मुन्नाभाई डॉ अस्थाना ला विचारतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरून आपले स्वत:चे दवाखान्यातले अनुभव तरळतात. डॉक्टर ला आपण देव मानतो व हा/ही आपलं आयुष्य वाचवेल अशी आशा घेऊन आपण आपलं सर्वस्व त्याच्यावर सोपवितो. धन्वंतरी ला पुजणारे डॉक्टर हे खरंच “देव माणूस” असतात का असा विचार अनेक वेळा मनात येतो.

Hippocratic Oath घेऊन सगळे डॉक्टर रुग्णाशी व डॉक्टरकीच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहू अशी शपथ घेत असले तरी भारतातील आरोग्य यंत्रणेचं प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे. सेवाभावी वृत्ती असणारे व विज्ञानाशी इमान राखणारे डॉक्टर्स आता कालबाह्य झाले असून तद्दन व्यवसायिक गल्लाभरू वृत्ती ही भारतीय आरोग्य सेवेची नवी ओळख होत आहे.

आरोग्य क्षेत्रात प्रामुख्याने दोन प्रकार पडतात

१. शारीरिक आरोग्य

२. मानसिक आरोग्य

शारीरिक आरोग्यात पण भारतात बऱ्याच शाखा आहेत ज्यात आयुर्वेद, होमिओपॅथी, फिसिओथेरपी, फार्मा, नर्स असे अनेक प्रकार आहेत.

डॉक्टर म्हणजे प्रामुख्याने MBBS ची पदवी घेणारे लोक वैद्यक शास्त्राचे पदवीधर असून पुढे काही MD ची पदवी घेऊन त्या क्षेत्रात विशेषज्ञ होतात. याच एक प्रमुख कारण म्हणजे वैद्यकीय शिक्षण हे खाजगी विद्यापीठ व कॉलेज मधून घेणे हे कमालीचे महागडे असून त्यात अगदी करोड पर्यंतचा खर्च होतो. एवढा पैसा टाकल्यावर तो वसूल कसा करायचा हे एकमेव ध्येय ठेवून गेल्या २० वर्षात तयार झालेले डॉक्टर्स वैद्यकीय पेशात उतरतात.

मुन्नाभाई एमबीबीएस या २००३ च्या चित्रपटात अत्यंत खुबीने व मिश्किलपणे वैद्यकीय क्षेत्रातील भेगा दाखविल्या आहेत. डॉ अस्थाना अशा डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करतो जो त्याच्या रुग्णाशी कसलीही आपुलकीची भावना ठेवत नाही. रुग्ण हे एक शरीर असून त्याच्यावर इलाज करणे हे आपले कर्तव्य आहे असे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवितात.  स्वतंत्र भारतातील पहिल्या काही पिढीतील आरोग्य सेवक ज्यात डॉक्टर्स प्रामुख्याने येतात ते काम जबाबदारीने करायचे. वर्षानुवर्षे रुग्णाशी आपुलकीचे संबंध जपणारे डॉक्टर्स मला लहानपणी पाहिलेले आठवतात.

रुग्णात गुंतून राहणे त्रासदायक व चुकीचे असले तरी रुग्णाला पैसे कमावण्याचं मशीन समजणं हे सुद्धा चुकीचं आहे. मी स्वत: मानव संसाधन विभागात बरेच वर्ष काम केल्याने कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम करताना कॉर्पोरट कंपन्यांसारखी ही नवीन आरोग्य व्यवस्था रुग्णाला कशी लुटू शकते हे बघितले आहे. मागच्या वर्षी माझे वडील वारले तेव्हा सुद्धा मला आरोग्य व्यवस्थेचा अजिबात चांगला अनुभव आला नाही.

इतर क्षेत्रापेक्षा आरोग्य क्षेत्र अगदीच वेगळे असल्याने लोकांच्या जीवन-मरणाशी संबंधित क्षेत्रात येण्यासाठी काही गोष्टी ज्या आपल्याला मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये सांगितल्या होत्या त्या असणं आवश्यक आहे.

आरोग्य क्षेत्राची आवड

कुशल संवादकला

शारीरिक व मानसिक रित्या तंदुरुस्त असणे

ताणाखाली काम करण्याची क्षमता

नैतिकता

सहसंवेदना व करुणा

या गोष्टी नसतील तर ती व्यक्ती आरोग्य क्षेत्रात आल्यास रुग्णाला जीवनाकडे नेण्याऐवजी मृत्यूकडे नेईल जे आपण सध्या बघत आहोत.

आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्‍या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्र सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.

या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर ताण, चिंता, निराशा, औदासीन्य, एकटेपणा व आत्महत्या येतात.

भारतीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्र त्याच्या महागड्या शुल्काप्रमाणे त्याच्या ragging साठी जगप्रसिद्ध आहे.  २००९ मध्ये अमान कचरू या १९ वर्षीय मेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू ragging मुळे झाला व त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कितीही सांगत असले तरीही गेल्या दशक भरात ragging च्या केसेस विशेषेकरून मेडिकल कॉलेज मध्ये वेगाने वाढल्या. Aman movement या NGO च्या अनुसार ragging च्या केसेसमध्ये ८०% वाढ झालेली आहे. गम्मत म्हणजे शिस्त म्हणून ओरडणारे मुन्नाभाई या सिनेमातील जे.अस्थाना हे त्यांच्या कॉलेजमध्ये ragging होत असताना त्यावर काही कारवाई करत नाहीत.

कोवळ्या वयात ragging चा मनावर चुकीचा परिणाम होतो. ragging ने भीती, ताण, चिंता व अगदी औदासीन्य सुद्धा येत व आत्महत्यांचे प्रमाण वाढतं असं संशोधन सांगतं. राजेश गर्ग यांच्या एका संशोधनानुसार ragging हा एक सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून त्याने केवळ व्यक्तीच नाही तर तीच संपूर्ण कुटुंब व ती व्यक्ती राहते तो समाज सुद्धा वाईट परिणाम भोगतो.

पायल तडवी या निष्पाप डॉक्टर चा मृत्यू ragging मुळे झाला हे बघून असं वाटतं की लोकांचे जीव वाचविण्याचे शिक्षण घेणारी मंडळी स्वत:च व दुसर्‍याच शोषण करतच “कोरड्या मनाने” या क्षेत्रात उतरतात. मानसिक त्रास असलेली ही तरुण डॉक्टर रुग्णाची सेवा कशाला करतील असा प्रश्न मला तरी पडतो.

नेहमीच्या सवयीने भारतीय लोकांप्रमाणे “हे सगळं करावं लागत, सिस्टम च्या विरुद्ध कोण जाईल, मोठ्यांच ऐकणं कर्तव्य आहे” असं म्हणत ragging ची परंपरा अजूनही सुरूच आहे.

डब्ल्यूएचओच्या 1: 1000 च्या शिफारसीच्या तुलनेत भारतातील डॉक्टर-लोकसंख्येचे प्रमाण 1: 1456 आहे.

Health analytics च्या अहवालानुसार भारताचं खाजगी आरोग्य क्षेत्र जरी वेगाने प्रगती करत असलं तरी सार्वजनिक आरोग्य क्षेत्र हे धोक्यात आहे.  १००० लोकांसाठी ०. ०८ खाटा तर १४५६ लोकांसाठी १ डॉक्टर असं प्रमाण आहेत जे WHO च्या प्रमाणापेक्षा खूप कमी आहे व २८ पैकी ११ राज्य WHO च्या निकषात बसतात. Primary Healthcare Centres (PHCs) हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे मूलभूत रचनात्मक व कार्यात्मक तुकडी आहे  ज्यात सध्या डॉक्टर्स चा तुटवडा आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या कोविड च्या काळात लोकांचे हाल होत आहेत.

द्रीष्टी आयएस च्या एका अहवालानुसार ७०% वाटा असणारे खासगी आरोग्य क्षेत्र हे कोविड च्या काळात रुग्ण सार्वजनिक रुग्णालयाकडे पाठवत असत. आरोग्य सेवांमध्ये भारताची सार्वजनिक गुंतवणूक ही जगातील सर्वात कमी अशी एक आहे. २०१८ मध्ये भारताने १.२८ टक्के GDP आरोग्य बजेट ला दिलं जेव्हा गरज २.५ टक्के होती. नीति आयोगाने सुद्धा खासगी रुग्णालयाने सार्वजनिक रुग्णालय चालवायला घ्यावेत जे सध्याच्या सरकारच्या खासगी करणाच्या धोरणाला पुष्टी देणारे आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला बळकटी द्यायचे सोडून केंद्र सरकार खासगी कॉर्पोरेट संस्कृती ने चालणारी रुग्णालयांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. खासगी रुग्णालय ही पैसा असेल त्याला सोयी देणार त्यामुळे गरीब जनतेचे हालच आहे जे आपण गेल्या वर्षी कोविड चा उद्रेक झाल्यापासून बघतच आहोत.

या खासगी रुग्णालयांची कामाची संस्कृती ही कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीसारखी “Target driven” असून मनुष्यबळाची कमतरता व असलेल्या मनुष्यबळाला योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून योग्य काम करून घेणे हे इथल्या HR च आव्हान आहे. शाळा व कॉलेज मध्ये न शिकवल्या गेलेल्या आवश्यक क्षमता जसे संवाद कौशल्य, सहसंवेदना व करुणा या गोष्टी मोठ्या लोकांना शिकवण नक्कीच कठीण आहे व कर्मचार्‍यांच काम सोडून जाण्याचं प्रमाण पण खूप आहे.

औदासीन्य, बर्न आऊट व त्या अनुषंगाने होणार्‍या आत्महत्या हा भारतीय डॉक्टर्स मध्ये आढळून येणारे प्रमुख मानसिक आजार आहेत. The Indian Journal of Psychiatry च्या संशोधनानुसार ३०% डॉक्टर्स औदासीन्य अनुभवतात, १७% डॉक्टर्स आत्महत्येचा विचार मनात आणतात तर ८०% डॉक्टर्स हे शिक्षण व करिअर च्या सुरवातीला कामाच्या ओझ्याने बर्न आऊट अनुभवतात.

आपल्याला एक दिवस हॉस्पिटल मध्ये नेलं तर तिथल्या वातावरणामुळे कसतरी होत. औषधांचा वास, रुग्णांच्या वेदना व दु:ख, पडलेले चेहरे, नातेवाईकांची कुरकुर हे बघत रोज कोणाच्या तरी आयुष्याचं ओझं खांद्यावर घेऊन फिरणार्‍या डॉक्टर्स ला किती ताण येत असेल याचा विचार करवत नाही. एवढ्या परिस्थितीत  डोकं शांत ठेवून निदान न चुकविता रुग्णाला औषधाने किंवा शस्त्रक्रिया करून बरे करणे हे आपण सामान्य लोक करू शकत नाही. आणीबाणीतील डॉक्टर्स, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करणारे सर्जन/शल्य विशारद अशी लोक “अति व कधीही काम ” यामुळे पुरेशी झोप घेऊ शकत नाही व सतत च्या ताणामुळे या लोकांमध्ये ताण कमी करण्यासाठी दारू व तंबाखू च सेवन मोठ्या प्रमाणात केलं जात. कामाच्या ठिकाणी होणारा जाती भेद हा मेडिकल व्यावसायिकांसाठी आणखी एक डोकेदुखी आहे. २००७ च्या सुखदेव थोरात कमिटीला असे आढळले की AIIMS मध्ये दलित व आदिवासी विद्यार्थ्यांना गुण देताना त्यांच्याशी जातीवरून भेदभाव केला जातो. British Medical Association च्या नुसार आधीच तीव्र असलेले मानसिक त्रास हे कोविड महामारी च्या काळात आणखी वाढलेत. डॉक्टरांना मारहाण व संसर्गाची सुद्धा भीती असते. भावनिक थकवा हा रुग्णसेवा करताना सगळ्या आरोग्य कर्मचार्‍यांना ज्यात डॉक्टर्स वरच्या क्रमांकावर आहेत येतो.

कुठल्याही व्यवसाया पेक्षा डॉक्टर चा व्यवसाय हा शारीरिक व मानसिक दृष्ट्‍या थकविणारा आहे.  Indian Medical Association (IMA) च्या अनुसार भारतातील डॉक्टर्स (विद्यार्थी दशेत व व्यवसायात असताना) च्या आत्महत्येतचं प्रमाण चिंताजनक असून त्यावर तत्काळ उपाययोजना करण गरजेचं आहे.

रुग्णाचा जीव गेल्यास ती अपराधीपणाची भावना सुद्धा अनेक डॉक्टर्स चा जीव घ्यायला कारणीभूत ठरली आहे. करूणेने व सेवा भावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टर्स वर त्यांचं व्यवस्थापन, इन्शुरन्स कंपन्या, फार्मा कंपन्यांचा पण खूप ताण येतो जो जीवघेणा ठरतो.

निर्ढावलेल्या वृत्ती ची लोक व ज्यांना सपोर्ट सिस्टम चांगली आहे अशीच डॉक्टर मंडळी या दुनियेत टिकतात. शारीरिक हल्ले व संसर्गाच प्रमाण ज्यामुळे शारीरिक व्याधींचा धोका वाढतो हे सुद्धा मानसिक रित्या डॉक्टरांना त्रासदायक ठरत.

भारतात  अंदाजे ४०० च्या वर डॉक्टर्स कोविड च्या महामारीत सेवा देताना मृत्युमुखी पडले. अति-स्पर्धा, वैयक्तिक आयुष्य व छंद यासाठी अजिबात वेळ नसणे व अनारोग्यदायी वातावरण ज्यात जेवणाच्या वेळा सुद्धा निश्चित नसतात हे घटक डॉक्टर्स च्या समस्या अजून वाढवितात.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील आरोग्य सेवकांचे आणखी वेगळे आव्हान आहेत ज्यात MD (psychiatry), Clinical psychologist, counselors व therapist येतात.

शारीरिक आरोग्य क्षेत्राच्या तुलनेत भारतात मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील डॉक्टर्स व आरोग्य सेवकांचे जास्त हाल आहेत.

भारतात कोविड मुळे मानसिक आरोग्यावर बोलणं सुरु झालं अन्यथा अगदी श्रीमंत, उच्च मध्यम वर्गीय, आयटी मध्ये काम करणारे सुद्धा लोक मानसिक त्रासाबद्दल बोलायला घाबरायचे. मुळात मानसिक त्रास व मानसिक आजार यात फरक असून भारतात जाती व धर्म, स्तर-पुरुष भेदभाव लोकांच्या विकसनशील वयात मनावर खूप चुकीचे परिणाम करून जातात ज्यामुळे पुढे जाऊन लैंगिक समस्या, स्त्री-पुरुष व इतर नातेसंबंधात तणाव, चिंता, ताण सहन न करू शकणे, निराशा, औदासीन्य, स्वत: बद्दलच्या कमीपणाच्या भावनेतून अनेक भावनिक समस्या निर्माण होतात. या समस्यांवर गोळ्या हा उपाय नक्कीच नाही परंतु आपल्याकडे मात्र मूळ प्रश्नावर उत्तर न शोधता लोकांना गोळ्या देऊन त्यावर अवलंबून ठेवणे हे सर्रास चालते. मानसिक आजार जसे Anxiety disorders, Behavioral and emotional disorders in children, Bipolar affective disorder, Depression, Dissociation and dissociative disorders, Eating disorders, Obsessive compulsive disorder, Paranoia, Post-traumatic stress disorder, Psychosis व Schizophrenia यात औषध व समुपदेशन दोन्ही सोबत करण गरजेचे आहे. मात्र, भारतात धर्म व अंधश्रद्धा यांच्या पगड्यांमुळे हा विषय चुकीच्या पद्धतीने घेतला जातो.

बहुतेक भारतीय मानसिक आरोग्याच्या दवाखान्यात रुग्णाला मिळणारी वागणूक बघून किंवा ऐकून अंगावर शहारे येतात. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची हालत काहीतरी ठीक आहे परंतु मानसिक रोगाचे निदान झाले म्हणजे व्यक्ती साधारण आयुष्य जगूच शकत नाही हा ९९% भारतीयांचा समज भारतातील या क्षेत्राच्या दुर्दशेला कारणीभूत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स व नर्सेस त्यांच्या रुग्णाप्रमाणे खूप हाल आहेत.

वरील उल्लेखलेले काही आजार हे बऱ्याच प्रमाणात जनुकीय प्रभावामुळे पण होतात. त्यांचं निदान नीट व लवकर होत नाही. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की भारतात (प्रत्येक १०,००० लोकसंख्येमध्ये) मनोचिकित्सक (०.३), परिचारिका (०.१२), मानसशास्त्रज्ञ (०.०७) आणि सामाजिक कार्यकर्ते (०.०७) आहेत, तर इच्छित लोकांची संख्या १००,००० लोकसंख्येच्या ३ च्या वर मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ आहे. अपुरं कुशल मनुष्यबळ, मानसिक आरोग्याबाबत समाजाची व सरकारची उदासीनता यामुळे मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या लोकांमध्ये बर्न आऊट, औदासिन्य व आत्महत्या हे प्रमाण प्रचंड आहे. जगात मनोचिकित्सक व्यावसायिक लोकांत आत्महत्या सगळ्यात जास्त आहेत. सतत च नकारात्मक वर्तन बघण हे जीवघेणं आहे. भारतातील मानसशास्त्र/ psychology हे शास्त्र विभागात येत नसून त्यात कला शाखेची पदवी मिळते व वैज्ञानिक दृष्टीकोन (काही अपवाद सोडले)  बहुतेक मानसशास्त्राचे विद्यार्थी, शिक्षक व व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये दिसत नाही. हे एक महत्त्वाचं कारण आहे कि भारतात समुपदेशन यावर लोक विश्वास ठेवत नाही व म्हणून MBBS , MD झालेल्या लोकांकडून औषध घेणं पसंत करतात. मनोचिकित्सक व मानसशास्त्रज्ञ यांच्यात सख्य नसल्याने सुद्धा थेरपी व समुपदेशन हे भारतात अजूनही प्रभावी व लोकप्रिय नाही. या कारणाने उत्पन्न अत्यंत कमी असल्याने हुशार विद्यार्थी मानसशास्त्र या विषयाकडे वळत नाहीत कारण कला विषयाची पदवी भारतात पैसा देऊ शकत नाही. मी स्वत: विज्ञान शाखेतील पदवीधर असून गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे पदवी पर्यंत शिकल्यामुळे माझा दृष्टिकोन हा वेगळा ठरतो.

सध्या भारतात चुकीच्या जीवनशैली मुळे ताण, झोपेच्या समस्या, मोबाइलमुळे वाढलेले वर्तणुकीचे विचित्र प्रकार, नात्यातील तणाव हे हाताळण्यासाठी प्रचंड कुशल मनुष्यबळाची गरज आहे ज्याला निव्वळ पदवी असून उपयोग नाही तर मुळात व्यक्तिमत्व हे सकारात्मक हवं व सरकारी यंत्रणेने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.

मी स्वत: “जीवनशैली बदल” म्हणजे lifestyle modification मध्ये काम करताना लोकांना आरोग्यदायी जीवनशैली जगण्याचा सल्ला देते कारण भारतातील लोकांच्या सवयी दुरूस्त झाल्या की बऱ्यापैकी आरोग्य सुधारतं व अनेक रोग टाळता येतात. रात्री झोप घ्यायची नाही, व्यायाम करायचा नाही, आडवं तिडवं खाण, निसर्गाच्या विरुद्ध वागणं व पुढे कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून गोळ्या खायच्या ही भारतीय पद्धत आरोग्य यंत्रणेवरचा भार नक्कीच वाढवते. जे कोरोंना काळात नियम न पाळल्याने आज भारतीयांचे हाल आहेत ते या निष्काळजीपणामुळे आहेत.

आपल्या सगळ्यांच्या शरीराची व मनाची काळजी घेणारे सर्व प्रकारचे आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्याचा विचार आपणपण करायला हवा.

One of the first duties of the physician is to educate the masses not to take medicine-William Osler.

-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *