अंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला सुरुवात केली आहे. राजकिशोर मोदी यांच्या राज पेट्रोलियम (रिलायन्स पेट्रोलियम) येथील कार्यालयात, तसेच आमदार संजय दौंड यांच्या निवासस्थानातील कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज अंबाजोगाई शहर राष्ट्रवादी काँग्रेस अंबाजोगाईच्या वतीने मागविण्यात येत आहेत.
यासाठीचे अर्ज हे वरील कार्यालयात उपलब्ध असून, हे अर्ज संपूर्ण माहिती भरून१५ जुलै २०२२ रोजी संध्याकाळपर्यंत सदरील कार्यालयात सादर करावेत, तसेच १६ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून राजस्थानी मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई येथे संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड .राजेश्वर चव्हाण, आ.संजय दौंड, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, बबन लोमटे, शहराध्यक्ष अलीम भाई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
संबंधित वॉर्ड मधील आरक्षण, महिला व पुरुष आरक्षण, यांसह अन्य माहिती दर्शविणारा अर्ज नमुना इच्छूक उमेदवारांसाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला असून, हा अर्ज केवळ अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इच्छूक व्यक्तींसाठी असून इच्छुक उमेदवारांनी सदर अर्ज निर्धारित वेळेत सादर करणे बंधनकारक असणार आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.