मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज गुरुवारी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही बातमी समजताच राज्यातील त्यांच्या चाहत्यांसह नांदेड जिल्ह्यातील समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.
अशोक चव्हाण हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई येथे पंधरा दिवस वास्तव्यास होते. त्यानंतर ते मुंबईहून नांदेड येथे आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांची कोरोना तपासणी केली असता, त्यांना 25 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, पुढील उपचारासाठी ते मुंबई येथे दाखल झाले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर अशोक चव्हाण यांना मुंबई येथील खासगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यापूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनीही कोरोनावर मात केल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी दिली.