जालना पोलीस मुख्यालयातील प्रकार; कारण अस्पष्ट
जालना: सहाय्यक फौजदाराने पोलीस मुख्यालयातच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. मंगळवारी सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे रात्री ड्युटी करून आज मंगळवारी सकाळी 8.45 वा. स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह डीवायएसपी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव, प्रशांत महाजन, यांच्यासह शहरातील सर्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचे कारण अद्याप समजले नाही.