औरंगाबाद: औरंगाबाद शहरात आज गुरूवारी संध्याकाळपर्यंत एकूण 47 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 177 झाली आहे. हे रुग्ण किल्लेअर्क, जयभीमनगर, असेफिया कॉलनी, नूर कॉलनी, कैलाश नगर, चिकलठाणा, सावरकर नगर, बेगमपुरा, संजय नगर, खडकेश्वर, स्काय सीटी बीड बायपास, रोहिदास नगर, अजिज कॉलनी (नारेगाव), रोशनगेट या परिसरातील आहेत, असे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) मध्ये दुपारी चार वाजेपर्यंत 51 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले. पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. पाच जणांचा येणे बाकी आहे. तर घाटीमधील दोन रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्लॅट न. 28, वाघ टॉवर, बेगमपुरा येथील 32 वर्षीय पुरूष आणि बारी कॉलनी, रोशनगेट येथील 70 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटीत संदर्भीत करण्यात आलेल्या नूर कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे सध्या घाटीत एकूण 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 1 रुग्णाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. दोन रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. सहा कोरोना निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.