औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या 11 रुग्णांपैकी नूर कॉलनीतील आठ रुग्ण आणि भीमनगर, भावसिंगपुरा येथील एक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयात 81 नवीन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. घाटीत नऊ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. अशा एकूण 90 नवीन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मृत सात आणि बरे होऊन घरी परतणारे 23 असे एकूण 120 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (दि.28) संध्याकाळपर्यंत 105 रुग्णांची संख्या होती. मात्र, 28 रोजी रात्री चार रुग्णांची भर पडल्याने या एकाच दिवशी 27 नवे रुग्ण वाढल्याने मंगळवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 109 झाली. त्यात आज या अकरा रुग्णांची भर पडली आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
नूर कॉलनीतील सहा पुरूष, दोन महिला तर गुरूदत्त नगर (गारखेडा परिसर), जय भीमनगर (टाऊन हॉल) आणि भीमनगर येथील प्रत्येकी एक पुरूष अशा एकूण अकरा कोरोनाबाधितांपैकी दोन महिला, नऊ पुरूष असल्याचे महापालिकेच्या डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आजच्या अहवालांमध्ये दोन्ही पुरूष रुग्ण घाटीच्या कोवीड डेडिकेटेड रुग्णालयातील आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद शहरातील जयभीम नगरमधील 71 आणि गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे. यापूर्वीच घाटीच्या डेडिकेटेड कोवीड रुग्णालयात सात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यात या दोन रुग्णांची भर पडल्याने घाटीमध्ये एकूण नऊ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.