# औरंगाबादच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करणार.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद: मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता तसेच आता आपण कोरोना विषाणू उच्चाटनासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेत येथील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. त्यातही आपल्या सर्वांचा सहभाग हवा, असे सांगून त्यांनी औरंगाबादच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानसही बोलून दाखवला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सिध्दार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून सहभागी झाले होते. या ठिकाणाहूनच त्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छापर संदेशातून मार्गदर्शन केले.

ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्याच्या भूमीसाठी अनेक आबालवृध्दांनी चिवटपणे लढा दिला आहे. या भूमीवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा मराठवाडा कसा पेटून उठतो त्याचे हे एक प्रतीक हा आजचा दिवस आहे. अन्यायाविरुध्द लढणे व तो मोडून टाकणे हे आपल्या भूमीचे, मातीचे वैशिष्ट्य आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व त्यांचे सहकारी तसेच अनेक आबालवृध्द मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांच्यामुळे आपण हा आजचा दिवस पाहू शकत आहोत. या शुरवीरांची आजची पिढी ही त्यांचे वारसदार आहेत. तोच वारसा घेऊन आपण हा मराठवाडा जपला पाहिजे आणि विकसितही केला पाहिजे. आज जरी आपण मोकळा श्वास घेत असलो तरी एक वेगळी लढाई आपण सध्या लढत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, एका बाजूला मोकळा श्वास आणि दुसऱ्या बाजूला तोंडावरती मास्क. मला खात्री आहे की, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी आबालवृध्दांनी ज्या पध्दतीने रझाकारी अत्याचार मोडून टाकला त्यापध्दतीनेच आपण कोरोना आक्रमणही परतवून लावूया. कोरोना विषाणू विरुध्द आपल्याला लढायचे आहे. त्यासाठी मास्क हे आपले शस्त्र आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण नुकतीच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपण कोरोनावर मात करुयात.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, मराठवाडा जिद्दी, चिवट, हिम्मतवंतांचा आहे. मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सरकारने निश्चितपणे घेतली आहे. मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृध्द होणार आहे. मुंबई, पुण्याला ज्याप्रमाणे विकास प्राधिकरण आहे त्या पध्दतीने औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि मराठवाड्याच्या विकासासाठी, सुखसमृध्दीसाठी निश्चित प्रयत्न करीन.

सुरुवातीला स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाकडून बँड, बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री व मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मनपा अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *