औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी आतापर्यंत २० हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर आहेत.
मतमोजणी करताना बीडच्या मतपेट्यांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. बीडच्या मतमोजणीमध्ये सिद्धेश्वर मुंडे दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपचे शिरीष बोराळकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे सचिन ढवळे आणि नागोराव पांचाळ यांनाही मते पडत आहेत. विजयासाठीचा कोटा अद्यापही निश्चित झालेला नाही. मात्र, पहिल्या फेरीसाठी मतमोजणी सुरु करण्यात आली आहे, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीत एकूण १ हजार २४८ पोस्टल मतदान झाले. त्यापैकी १७५ मते अवैध ठरली आहेत. वैध ठरलेल्या १ हजार ७३ मतांची मोजणी करण्यात आली असून त्यातही सतीश चव्हाण आघाडीवर आहेत.
या निवडणुकीत झालेले मतदान मोठे असल्यामुळे वैध आणि अवैध मते ठरवून २५- २५ मतपत्रिकांचे गठ्ठे बांधण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल हाती यायला रात्रीचे आठ वाजण्याची शक्यता आहे.
एकूण ५६ टेबलांवर ५६ मतमोजणी पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु करण्यात आली आहे. एकूण ५०७ अधिकारी-कर्मचारी या मतमोजणी प्रक्रियेत सहभागी आहेत. एका फेरीमध्ये ५६ हजार मते मोजली जाणार आहेत. पाच फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.