# किलोभर सोन्यासाठी चुलत भावानेच मेव्हण्याच्या साथीने बहीण भावाचा गळा चिरून खून केल्याचे उघड.

 

औरंगाबाद: किलोभर सोन्याच्या लालसेपोटी सातारा परिसरातील सख्ख्या बहीण भावाचा गळा चिरुन चुलत भाऊ व त्याच्या मेव्हण्याने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरण लालचंद खंदाडे-राजपूत (१९) आणि सौरभ लालचंद खंदाडे-राजपूत (१७) यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. ही घटना सातारा परिसरातील कनकोरबेन नगरातील बंगल्यात ९ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली होती.

दरम्यान, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तातडीने तपास करून गुन्हे शाखेने मुकुंदवाडी परिसरातून मारेकरी चुलत भाऊ सतीश काळूराम खंदाडे-राजपूत (२०, रा. पाचनवडगाव, जि. जालना) आणि अर्जुन देवचंद राजपूत (२५, रा. रोटेगाव रोड, वैजापूर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

मूळचा वैजापूर तालुक्यातील अर्जुन राजपूत हा मिस्त्री काम करतो. तो सध्या मुकुंदवाडी भागात राहायला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तो सासरी पाचनवडगाव येथे राहत होता. लालचंद खंदाडे-राजपूत यांची पाचनवडगावला शेती आहे. लालचंद यांनी काही वर्षांपूर्वी पाचनवडगाव येथील शेतीचा काही भाग विकला होता. त्यातून आलेल्या पैशात त्यांनी सोन्याची खरेदी केली होती. ही बाब पाचनवडगावातील गावक-यांना माहिती होती. याच दागिन्यांवर सख्खा पुतण्या सतीश खंदाडे-राजपूत याचा डोळा होता. पाचनवडगावला जाताना लालचंद यांच्या पत्नी अनिता या अंगावर दागिने घालून फिरायच्या. हे सतीशला नेहमी खटकत होते. त्यामुळे एक दिवस संधी साधून लालचंद यांच्या घरातील दागिने उडवायचे असा त्याने निश्चय केला होता. ९ जून रोजी त्याला ही संधी चालून आली. लालचंद यांनी गावी बोलावल्यामुळे त्यांच्या पत्नी, थोरली मुलगी सपना अशा दोघी पाचनवडगावला सकाळी सहाच्या सुमारास औरंगाबादहून निघाल्या. त्या गावी पोहोचल्याचे पाहून आता हिच संधी आहे. असे म्हणत सतीश व त्याचा मेव्हणा अर्जुन हे लगबगीने औरंगाबादच्या दिशेने दुचाकीवर निघाले. औरंगाबादला येण्यापूर्वी त्यांनी जालन्यातून एक चाकू व कोयता खरेदी केला. दुपारी बाराच्या सुमारास दोघेही लालचंद यांच्या कनकोरबेन नगरातील बंगल्यावर पोहोचले. दरम्यान, घरात दोनवेळा चहा-पाणी घेतला. बराचवेळ सौरभ, सतीश व अर्जुन हे कॅरम देखील खेळले. यादरम्यान, किरण ही वरच्या मजल्यावर आराम करण्यासाठी गेली.

असा साधला डाव:  कॅरम खेळतानाच सायंकाळी पाचच्या सुमारास सतीश म्हणाला की, मला अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे साबणाने हात धुवायचे आहे. त्यासाठी साबण कुठे आहे हे सांग. म्हणून सौरभ त्याला हात धुण्यासाठी बाथरुममध्ये घेऊन गेला. त्यावेळी साबण देत असतानाच अर्जुनने पाठीमागून त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. तर सतीशने त्याच्याजवळील कोयत्याने हातावर वार केला. सौरभ जीवाच्या आकांताने ओरडत असल्याने सतीशने त्याच्या नाकावर बुक्का मारला. त्यामुळे तो जागीच बेशुध्द पडला. त्याचा आवाज ऐकूण नुकतीच आंघोळ केलेली किरण वरच्या मजल्यावरुन धावतच खाली आली. तेव्हा तिचे केस धरुन सतीशने बाथरुममध्ये ओढले व तिचा देखील चाकूने गळा चिरला. अति रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल लांबविला:  दोघांचा गळा चिरुन खून केल्यानंतर आतल्या खोलीत असलेल्या कपाटातील ड्रॉवरमधील सोन्याच्या दागिन्यांची बॅग, साडेसहा हजारांची रोकड व किरणचा मोबाइल दोघांनी लांबविला. खून प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी मुकुंदवाडीतील एका ठिकाणाहून सोन्याच्या दागिन्यांसह बॅग जप्त केली. या दोघांचा सायबर पोलिसांच्या मदतीने शोध घेत गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, अनिल गायकवाड, सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार शेख नजीर, जमादार सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रवि खरात आणि नितीन देशमुख यांनी आरोपींना जेरबंद केले.

दुचाकीवर फेरफटका मारताना सीसी टिव्ही कॅमेरात झाले होते कैद:  दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लालचंद यांच्या घरात कॅरम खेळत असताना सतीश व अर्जुनने दोनवेळा दुचाकीवरुन सातारा परिसरात फेरफटका मारला होता. त्यामुळे दोघेही जवळपासच्या सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाले होते. तर घटनेच्या सुरूवातीपासूनच नजीकच्या व्यक्तीने खून केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *