# ऑरिक सिटीमुळे औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाईल.

औरंगाबाद: दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी क्षेत्रात उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा असल्यामुळे आगामी काळात औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे व हे शहर औद्योगिकदृष्ट्या देशातील सर्वोत्कृष्ट विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केला.

शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात आज दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी (शेंद्रा-बिडकीन) आणि दिघी पोर्ट औदयोगिक क्षेत्र विकासाचा श्री.कांत यांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला डिएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनंबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते, आदी उपस्थित होते.

श्री. कांत म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये उदयोगांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठया प्रमाणात उदयोगांची भर पडणार आहे. त्यामुळे औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल. औरंगाबादच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची वाहतूक सुरु होईल. जेणेकरुन उदयोगांच्या विकासाबरोबर येथील पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. या विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भरीव योगदान असल्याचे सांगून ते पुढे म्हणाल की, शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीची इमारत ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच मुलभूत सुविधांच्या विकासाचा जागतिक दर्जाचा उत्तम नमुना आहे या इमारतीकरता अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्यात आला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ऑरिक सिटी उद्योगाप्रमाणेच वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन, व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वागिंण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणले जाईल. यासाठी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्न करीत आहे. देशाप्रमाणेच जगातील उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करणाऱ्या सुविधा ऑरिकच्या माध्यमातून दिल्याने औरंगाबाद सह महाराष्ट्राचा प्रादेशिक विकास होण्यास मदत होणार आहे, शेंद्राप्रमाणे दिघी येथील औद्योगिक क्षेत्राचाही विकास करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीपूर्वी श्री. कांत यांनी शेंद्रा औदयोगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांची पाहणी केली. त्यानंतर ऑरिक सिटीच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना ऑरिक सिटीच्या आराखडाविषयी सविस्तर माहिती दिली. इमारतीतील नियंत्रण कक्षाची पाहणी करुन त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *