# औरंगाबादची १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होणार -सुभाष देसाई.

नवी दिल्ली: औरंगाबाद- पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे औरंगाबाद शहरासाठी मंजूर असलेली १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामावर चर्चा करण्यासाठी आज श्री. देसाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी दोहोंमध्ये विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

श्री. देसाई यांनी मांडलेले मुद्दे
१-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यांतील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी सात किलोमीटरचा बोगदा तयार करण्याची गरज असून त्यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निधी मंजूर करून तत्काळ बोगद्याचे काम मार्गी लावण्याची मागणी श्री. देसाई यांनी यावेळी केली.

२- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिर्डी-संभाजीनगर दरम्यान दुहेरी महामार्गाचे काम हाती घेतले असून त्यासाठी विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी.

३- डीएमआयसी अंतर्गत असलेल्या ऑरिक सीटीच्या विकासासाठी शेंद्रा ते बिडकीन दरम्यान चारपदरी महामार्ग तातडीने पूर्ण करण्यात यावा. तसेच औरंगाबाद ते पैठण दरम्यान चार पदरी महामार्गाचा प्रश्न  मार्गी लावण्याची मागणी श्री. देसाई यांनी केली.

४- औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चारपदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेला आहे. याच मार्गालगत संभाजीनगर शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करायची आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी या मार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्याची गरज आहे, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. त्याला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. दरम्यान, यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेस गती मिळणार असल्याचा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *