पुणे: आर्मी क्रीडा संस्था, पुणे या संस्थेचा युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गौरव करून राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020 ने संस्थेला सन्मानित करण्यात आले.
आर्मी क्रीडा संस्थेची उभारणी भारतीय लष्कराच्या मिशन ऑलिंपिक कार्यक्रमाअंतर्गत 01 जुलै 2001 ला झाली. लष्करातील उत्तमोत्तम कौशल्य असलेल्यांना आर्चरी, ऍथलेटिक्स, मुष्टीयुद्ध, नौकानयन, तिरंदाजी, वेटलिफ्टींग आणि कुस्ती या सात क्रीडा प्रकारातील प्रशिक्षण देऊन ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना तयार करणे हे यामागील उद्दिष्ट. संस्था लष्करातील खेळाडूंबरोबरच तरुण आणि सिद्ध झालेल्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीज (8-14 वर्षे वयोगट) मधील मुलांनाही खेळाडू प्रशिक्षणासाठी निवडते.
या खेळाडूंना परदेशी, भारतीय प्रशिक्षक, शारीरिक मेहनत करून घेणारे, क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, जीवतंत्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन लाभते.
आर्मी क्रीडा संस्थेत खेळाडूंना सर्वोच मान असून लष्कर क्रीडा संस्था त्यांना शिस्त, समर्पणवृत्ती, निर्धार आणि स्वत:ला झोकून देणे या वैशिष्ठ्यांनी घडवत असते. संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे आणि ऑलिंपिक्स, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा तसेच जागतिक स्पर्धा यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
उभारणीपासून संस्थेचे 30 खेळाडू ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्यास पात्र ठरले आहेत. टोकियो2021 ऑलिंपिक्ससाठी 12 खेळाडू आधीच पात्र ठरले असून आणखी काही पात्रता फेरी पार करतील. संस्थेने सहा युवक ऑलिंपिक पदके, एकोणीस पदके आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि अठरा पदके राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावली आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून आर्मी क्रीडा संस्थेत प्रशिक्षित झालेल्या खेळाडूंनी 450 आंतरराष्ट्रीय आणि 1118 राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. याशिवाय कित्येक प्रथम क्रमांक आणि विक्रमही संस्थेच्या नावावर जमा आहेत. खेलो इंडियाच्या गेल्या तीन सत्रात खेळाडूंनी पाच प्रकारांमध्ये मिळून एकशे पंचवीस पदके मिळवली आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.armysportsinstitute.com