नांदेड: राज्यातून बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकांमध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फ़त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात बालकामगार ठेवू नयेत यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून जनजागृती करण्यात येत आहे.
सहायक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्हयातील वेगवेगळ्या आस्थापनांना भेटी देऊन कामावर बालकामगारांना ठेवू नये याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच सदर आस्थापना चालकांकडून बालकामगार कामावर ठेवणार नाही, असे हमीपत्र घेण्यात आले. तसेच येथे बालकामगार काम करत नाहीत, असे स्टीकर आस्थापनांच्या दर्शनी भागात लावण्यात आले. दरम्यान, विविध आस्थापना बालकामगार कामावर ठेवणार नाही, अशी शपथ येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात घेण्यात आली.
बाल व किशोर कामगार प्रतिबंध सुधारित अधिनियम 2016 अन्वये 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रकियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. 14 ते 18 किशोरवयीन बालकास धोकादायक व प्रकियेमध्ये कामावर ठेवणे फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरते. कोणत्याही आस्थापनांमध्ये बालकामगार आढळून आल्यास कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.