अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.बाबासाहेब सरवदे यांचे आज रविवारी (दि.१८) सायंकाळी साडेसात वाजता दीर्घ आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कॉ.सरोज सरवदे, मुलगा अजिंक्य व मुलगी मोनिका असा परिवार आहे. बाबासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१९) सकाळी ९ वाजता अंबाजोगाई येथील लाल नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कॉ.बाबासाहेब सरवदे हे अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे वर्किंग कमिटी मेंबर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य कमिटी सदस्य होते. तसेच बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. लढवय्या वृत्तीच्या बाबासाहेब सरवदे यांनी वर्षभर कॅन्सरशी झुंज दिली. त्यांच्यावर सध्या अंबाजोगाईचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर रविवारी सायंकाळी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे राज्यातील शेतमजूर चळवळीचे व डाव्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.