औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्यावतीने ऑनलाईन ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट येत्या शनिवार, १३ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.
पेट ऑनलाईन घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला. ४५ विषयासाठी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. सकाळी १० ते १ दरम्यान ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट‘चा ५० गुणांचा पहिला पेपर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये सहा हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता १३ मार्च रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल.
हा पेपर विद्यार्थ्यांना पहिल्या पेपर प्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर परीक्षा देता येईल. मात्र, या परीक्षेसाठी शंभर प्रश्न राहणार असून ९० मिनिटांचा वेळ देण्यात येईल, गुणही १०० असणार आहेत. १७ मार्च रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २० मार्च रोजी लागेल. त्यानंतर प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान पीएच.डीसाठी ऑनलाईन नोंदणी तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४५ विषयात ‘पेट‘ होणार असून विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे.
‘पेट‘चा दुसरा टप्पा १३ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सुट मिळालेले दुस-या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी‘ मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल. झालेल्यांना प्रवेश घेता येईल. २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. तर ८ एप्रिलपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.