# डॉ.बाआंम विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आजपासून लेखणी बंद आंदोलन.

१ऑक्टोबर पासून काम बंद -राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर

औरंगाबाद: सातवा वेतन आयोग लागू करणे, कालबध्द पदोन्नती यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील १४ अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयातील हजारो कर्मचारी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान ‘काम बंद‘ आंदोलन करणार आहेत, अशी माहिती विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली.

केंद्र व राज्यशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. राज्य शासनाने तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गामध्ये आयोग लागू केला. तथापि राज्यातील १४ विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. या संदर्भात राज्य शासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या. मात्र, सातव्या वेतन आयोगासह कर्मचा-यांची कालबध्द पदोन्नती व अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीची गेल्या आठवड्यात बैठक होऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. तर एक ऑक्टोबर पासून सर्व कर्मचारी संपूर्ण काम बंद करुन संपात सहभागी होणार आहेत. राज्यशासन केवळ तोंडी आश्वासन देऊन कर्मचा-यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या भावना तीव्र आहेत. या राज्यव्यापी आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व तसेच संलग्नित सर्व महाविद्यालयातील कर्मचा-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे समन्वयक तथा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *