औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या दालनात शनिवारी (दि.१९) सकाळी ११ ते १२ या दरम्यान बैठक पार पडली. बैठकीस मंत्री संदिपान भूमरे, आ.अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्र-कुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी विद्यापीठाच्यावतीने परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या तयारीबाबत माहिती दिली. १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ‘एमसीक्यू‘ पध्दतीने परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेच्या कामासाठी राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाने केलेल्या तयारी बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘फिजीकल डिस्टन्सिंग‘ व सर्व काळजी घेऊन परीक्षा घ्यावी, अशा सूचनाही केल्या. प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा पुतळा, छत्रपती शिवरायांची प्रतिमा व यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आले.