औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील फॉरेन स्टुडन्ट सेलच्या वतीने विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून संख्या वाढावी यासाठी प्रयत्न देखील करण्यात येत आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.पाच) फॉरेन स्टुडन्ट सेलची बैठक घेण्यात आली. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते विदेशी विद्यार्थ्यांसाठी
http://online.bamu.ac.in/foreignstudent/ या वेब पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते, सेलचे संचालक डॉ मुस्तजिब खान, उपसंचालक विकास कुमार, युनिकचे संचालक अरविंद भालेराव, प्रोग्रामर दिवाकर पाठक, रवींद्र बनकर, प्रशांत गवळी, दत्तात्रय पर्वत, यशपाल साळवे, सचिन चव्हाण आदींची उपस्थिती होती. पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठीची संपूर्ण माहिती या वेब पोर्टलवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेशापासून ते दीक्षांत समारंभपर्यंत विदेशी विद्यार्थ्यांना लागणारी माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सेलच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आवाहन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी केले.