बीड: जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाची वाढ होऊ नये यासाठी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी व केज ही शहरे दहा दिवसांसाठी 11 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपासून 21 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे हे आदेश देण्यात आले असून, या कालावधीत पाच शहरांमध्ये केवळ आदेशात नमूद पुढील सेवा सुरू राहणार आहे.
i) दूध विक्री घरपोच सकाळी 07.00 वा. पासून ते सकाळी 09.00 वा. पर्यंतच करता येईल.
ii) खाजगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकाने (सबब सर्वांनी त्यांना लागणारी औषधे दिनांक 11/08/2020 रोजी पर्यंत खरेदी करुन घ्यावीत).
iii) माध्यमे
iv) घरगुती गॅस सिलेंडर सेवा (संबंधित एजन्सीधारकांनी आपले एजन्सीचा गणवेश परिधान करावा व सोबत आपले ओळखपत्र बाळगावे.
v) जार वाॅटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांड्यामध्ये पाणी द्यावे आणि त्यावेळेस कोविड -19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाॅटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न घेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी. तसेच सर्व वाॅटर सप्लायर्स कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेऊन सेवा पुरवावी.
vi) मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा द्यावी.
या शहरांमध्ये इतर सर्व सेवा/ फळे-भाज्या इतर सर्व दुकाने/ खाजगी आस्थापना/ बँक/ पेट्रोलपंप, किराणा दुकाने (होलसेल सह)/ कृषी विषयक दुकाने (होलसेलसह)/ शासकीय कार्यालये, (महसूल/ पोलीस/ आरोग्य, ग्रामविकास/ नगरविकास/ विद्युत वगळून) बंद राहतील. या शहरांमधील कोणतीही व्यक्ती अतितातडीच्या वैद्यकीय गरजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीसाठी घराबाहेर/ शहराबाहेर जाऊ शकणार नाहीत. फक्त ई-पास घेऊनच असा प्रवास करता येईल. या शहरामध्ये सुध्दा केवळ याबाबींसाठीच ई-पास घेऊनच प्रवेश करता येईल. वरील कालावधीनंतर लगेचच शहरांत गर्दी होऊ नये यासाठी विविध प्रकाराची दुकाने वेगवेगळ्या दिनांकास सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर त्यांना सुरू करता येणार आहे.
सर्व किराणा, खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना त्यांची दि. १० व ११ दुकाने उघडण्यास परवानगी.
बीड शहरातील सर्व किराणा, खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना त्यांची दुकाने अँन्टिजन टेस्ट झालेली नसेल तरीही त्वरित उघडण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु त्यांनी त्यांची अँन्टिजन तपासणी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच करुन घ्यावी. तसेच दिनांक 8 व 9 ऑगस्ट रोजी ज्या दुकानदारांची अँन्टिजन तपासणी झालेली आहे, त्यांनीही दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुकाने उघडण्यास हरकत नाही.
ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोणतेही लक्षणे नसतील त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन आणि त्यांच्या घरीच विलगीकरणची व्यवस्था समाधानकारकपणे होऊ शकेल याची खात्री केल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणची परवानगी देण्यात येईल, परंतु त्यांनी त्या विषयीचे लेखी शपथपत्र सादर करणे आणि पल्स ऑक्सीमीटर विकत घेऊन दर तासाला स्वत:चे व दुसऱ्या पल्स ऑक्सीमीटरने संपूर्ण परिवाराचे ऑक्सीजनचे प्रमाण तपासत राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
माजलगावही दहा दिवस संपूर्णपणे बंद:
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाची वाढ होऊ नये यासाठी माजलगाव शहर 11 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपासून 10 दिवसांसाठी 21 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.