# भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांना जाहीर.

१९ सप्टेंबर रोजी भगवानरावजी लोमटे स्मृतीदिनी अंबाजोगाईत वितरण

अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्य पातळीवरील या वर्षीचा भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब उर्फ रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.

अंबाजोगाईच्या राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, लोककला, सांस्कृतीक चळवळ, पत्रकारिता, सहकार शिक्षण क्षेत्रात ज्यांनी आपले योगदान देऊन अंबाजोगाईच्या इतिहासात सुवर्णपान लिहिले असे भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार २०१३ या वर्षी पासून सुरू केला. सुसंस्कृत राजकारणी. साहित्यिक, संगीत गायक व रचनाकार, पत्रकार, नाट्य व चित्रपट अभिनय, सहकार, क्रीडा या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीस महाराष्ट्र पातळीवर हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी यशवंतराव गडाख-पाटील (सुसंस्कृत राजकारणी हस्ते : डॉ. वासुदेव मुलाटे व पं. नाथराव नेरळकर), विजय कुवळेकर ( पत्रकारिता, अभिनय व लेखक हस्ते प्राचार्य रा. रं. बोराडे व कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर), पद्मश्री ना.धों. महानोर (साहित्य हस्ते: डॉ. जब्बार पटेल), रामदास फुटाणे (राजकारणी, वात्रटीकाकार, कवी हस्ते: प्रा. भास्कर चांदनशिव), पं नाथराव नेरळकर (शास्त्रीय संगीत गायक व रचनाकार: डॉ. जनार्धन वाघमारे), विजय कोलते (राजकारणी, तथा कृषितज्ज्ञ: हस्ते प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी) व मधुकर भावे (पत्रकारिता हस्ते कमल किशोर कदम) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीचा हा आठवा पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा, सन्मानपत्र, रोख २५ हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.

रा. रं. बोराडे हे विसाव्या शतकातील साहित्यातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, वगनाट्य व समीक्षा या प्रकारात वैशिष्ठ्यपूर्ण विपूल लेखन केले आहे. विशेषतः ग्रामीण अस्मितेचा कसदार आविष्कार म्हणजे रा. रं. बोराडे सर. एक कृतिशील आणि समाजमनस्क साहित्यिक आहेतच पण त्यांच्या लेखणीला अस्सल मराठवाडाच्या मातीचा गंध आहे. त्यांचे लौकिक जीवन व साहित्य निर्मिती यात अतूट व हार्दिक अनुबंध आहे. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर त्यांच्या लिखाणात ग्रामीण जीवन सहज दिसू लागले होते.

बोराडे सरांच्या साहित्य लेखनाला १९७१ पासून सुरुवात झाली. त्यांचे एकूण पंधरा कथासंग्रह, बारा कादंबऱ्या, बारा नाटके व एकांकिका प्रसिद्ध झाल्या आहेत. वगनाट्य व पथनाट्य पण त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या या लिखाणात जशी गंभीरता आहे तशी विनोदीशैली हे खास वैशिष्ठ्य आहे. त्यांची शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान या नावाची संस्था असून नव्या पिढीतील साहित्यिकांना १९९८ पासून पुरस्कार दिले जातात. २००० ते २००४ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व त्याकाळात नवलेखकांसाठी अनुदान योजनेत आमूलाग्र बदल घडविले. त्यामुळे पुस्तक प्रकाशित करण्यास आर्थिक सहाय्य मिळू लागले. ग्रामीण साहित्याची चळवळ त्यांच्या प्रेरणेने अधिक गतिमान झाली. मराठवाडा शिक्षण मंडळातील अनेक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नावलौकिक मिळविला आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य संस्थांचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचा यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, अंबाजोगाई त्यांना देण्यात आला. त्यांचे व भगवानराव लोमटे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.

रा. रं. बोराडे यांना आठवा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी, अंबाजोगाई यांच्या हस्ते शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भगवानराव लोमटे बापू यांच्या आठव्या स्मृतीदिनी दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थित वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात आयोजित केला जाईल, अशी माहिती दगडू लोमटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *