अंबाजोगाई: येथील ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील स्वामी विवेकानंद सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा कै. भगवान जाधव गुरुजी स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार, 29 ऑक्टोबरला पट्टीवडगाव येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पट्टीवडगाव पंचक्रोशीत एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाणाऱ्या कै. भगवान जाधव गुरुजी यांच्या स्मृती निमित्ताने स्वामी विवेकानंद सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. यावर्षी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील कामासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकप्रभा चे उपसंपादक सुदर्शन रापतवार, डॉ. तुकाराम नेहरकर, रघुनाथ इंगळे, शकुंतला पेद्दे आणि महेश्वर नरवणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पट्टीवडगाव येथे 29 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक खरात व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.