वाराणसी: राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर शिवैक्य झाले ही समस्त वीरशैव समाजासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. अहमदपूरकर स्वामीजी हे काशी विश्वाराध्य गुरुकुलाचे माजी विद्यार्थी होते. काशीपीठात वास्तव्य करून त्यांनी काही काळ ज्ञानसाधना केली. ते शिवैक्य झाल्यामुळे आम्हाला अतीव दुःख झाले आहे. आज खरोखर शिवाचार्यांमधील भीष्मपितामहच हरपले असेच वाटते, असे उद्गार श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले.
काशीपीठात डाॅ. शिवलिंग शिवाचार्य यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुलातर्फे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी आशीर्वचन करताना ते बोलत होते.
प्रारंभी सिद्धलिंग देव यांनी प्रास्ताविक केले. सुभाष वैद्य यांनी ‘श्री काशी विश्वाराध्य गुरुकुल’ या ग्रंथातील डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांची माहिती वाचून दाखविली. त्यानंतर पूज्य महास्वामीजींचे आशीर्वचन झाले. ते पुढे म्हणाले, काशीपीठात १९३९ मध्ये शिवलिंग शिवाचार्यांनी प्रवेश घेतला. काशीतील विद्वानांकडे नव्यन्यायशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. काशीपीठाच्या कोर्टातील कामकाजात तत्कालीन जगद्गुरू श्री पंचाक्षर शिवाचार्य महास्वामीजींना खूप सहकार्य केले. त्यानंतर विरक्त भावनेने तपश्चर्या करण्याकरिता ते हिमालयात निघून गेले. १९४० मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भाग घेऊन देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कार्य केले. १९४५ मध्ये लाहोर येथून वैद्यकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५२ मध्ये देशसंचार करून ते अहमदपूरला परत आले आणि त्यांनी मठाचा कारभार हाती घेतला.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना महास्वामीजी म्हणाले, त्यांनी महाराष्ट्रभर धर्मप्रचारासाठी संचार केला. काशी जगद्गुरू जेव्हा महाराष्ट्रात जात असत तेव्हा अहमदपूरकर स्वामीजी परंडकर स्वामीजींसह त्यांच्या सोबत राहत असत. त्यांनी महाराष्ट्रात, आंध्र-तेलंगणात आणि कर्नाटकाच्या काही भागांत फार मोठ्या प्रमाणावर समाजाचे प्रबोधन केले. वर्षानुवर्षे कपिलधारला पायी दिंडी काढून, परमरहस्याचे पारायण करून त्यांनी संतशिरोमणी मन्मथस्वामींचे माहात्म्य आणि कपिलधार क्षेत्राचे महत्त्व लोकमनावर बिंबविले. परमरहस्य आणि अभंगगाथा असे अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. श्री सिद्धान्तशिखामणी या संस्कृत ग्रंथावर संस्कृत भाषेत व्याख्यान लिहून ते प्रकाशित केले. श्री मन्मथस्वामी यांच्या जीवनकार्यावर आणि साहित्यावर त्यांनी स्वतः लेखन तर केलेच, परंतु अन्य अभ्यासकांना त्या साहित्याचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. शिवकीर्तनाची परंपरा जागवून गावोगावी शिवकीर्तनकार निर्माण केले. आज महाराष्ट्रात जेवढे शिवकीर्तनकार आहेत ते सगळे महाराजांचेच शिष्य आहेत. श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे २००८ मध्ये आयोजित केलेल्या साखरखेर्डा येथील दुसऱ्या अ.भा. वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
वीरशैवधर्माचा व्यासंग करून त्याचा सर्वत्र प्रचार-प्रसार करणारे ते एक अग्रणी शिवाचार्य होते. खरोखर शिवाचार्यांमधील ते भीष्मपितामह होते. त्यांनी शेवटपर्यंत शुद्ध आचरण सांभाळले. स्वतः अन्न शिजवून ते ग्रहण करीत असत. शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ ते निरोगी जीवन जगले, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. यामागे त्यांचे शुद्धाचरणच होते. आज या भीष्म पितामहाने शेवटचा श्वास घेतला. त्यांना शिवप्रभू आणि जगद्गुरू पंचाचार्य सद्गती देवोत. शेवटी पूज्य महास्वामीजींसह सर्वांनी स्तब्ध उभे राहून डाॅ. शिवलिंग शिवाचार्यांना श्रद्धांजली वाहिली.