# गर्दी टाळण्यासाठी भोर नगरपरिषेने विकसित केले ‘नगरसेतू’ मोबाईल ॲप; आता घरबसल्या मिळेल औषधी, किराणा साहित्य.

 

पुणे: कोरोना विषाणूला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियोजनपूर्वक आखणी करुन तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी लॉकडॉऊन कालावधीत भोरवासियांकरिता ‘नगरसेतू’ मोबाईल ॲप विकसित करुन जीवनाश्यक वस्तू ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे.

भोर नगरपरिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘नगरसेतू’ मोबाईल ॲपबद्दल श्री. थोरात म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रसार थांबवायचा असेल तर नागरिकांनी प्रथम गर्दी करणे टाळायला हवी. फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, घराच्या बाहेर न पडता जीवनावश्यक वस्तूची खरेदी ऑनलाईन करण्यासाठी या ॲपचा वापर करावा. या आवाहनाला नागरिकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे, औषधे, दूध, स्वस्त धान्य जीवनावश्यक वस्तूची ऑनलाईन आर्डर करुन खरेदी करता येते. जीवनावश्यक वस्तूची ऑनलाईन आर्डर दिल्यानंतर एका तासात औषधे आणि आठ तासाच्या आत किराणा माल स्वयंसेवकामार्फत घरपोच पाठविण्यात येते. याकरिता नगरपरिषदेने शहरातील 76 स्वयंसेवकाची नेमणूक केली असून घरपोच वस्तू वितरित करण्याच्या अनुषंगाने त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहेत. या ॲपला शहरातील किराणा मालाची 55 दुकाने, औषधांची 40 दुकाने जोडण्यात आली आहेत. नागरिकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्यांनतर दुकानदार व स्वयंसेवक यांना एसएमएसच्या माध्यमातून समजते. त्यांनतर दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीद्वारे माल कधी मिळेल यांची ऑर्डर करणाऱ्या नागरिकाला कल्पना दिली जाते. या ॲपमध्ये नागरिकांना देयक ऑनलाईन किंवा रोखीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना नगरसेतू ॲप स्वतःच्या मोबाईल मध्ये https://drive.google.com/file/d/1KnGB29yLo98Ey8f9W3xdzRDRss5EHrEO/view या लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करता येते. ॲप डॉऊनलोड केल्यानंतर नागरिकांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व पत्ता याबाबत माहिती भरणे गरजेचे आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास कोरोना विषाणूच्या विषयी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेले ‘आरोग्यसेतू’ ॲप डॉऊनलोड करण्याबाबतची लिंक देण्यात आलेली आहे. ॲपच्या मेनूमध्ये दुकानदारांचे नाव, डॉक्टरांचे व दवाखान्याचे नाव, रुग्णवाहिका असणाऱ्या दवाखान्याचे नाव, औषधालयाचे नाव व पत्ता, दुग्धालयाचे नाव, पोलीस स्टेशनचे नावाबरोबरच संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या ॲपच्या माध्यमातून घरपोच सेवा मिळू लागल्याने शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अंदाजे 90 टक्के कमी झाले आहे. परिणामी भोर नगरपरिषदेच्या हद्दीत अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. भोर नगरपरिषद कोरोनामुक्त ठेवण्याचे संपूर्ण श्रेय भोरवासियांना देण्यात येते, असेही श्री. थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *